पुणे, साताऱ्यात दवबिंदू गोठले, पिकांचे नुकसान

पुणे, साताऱ्यात दवबिंदू गोठले, पिकांचे नुकसान
पुणे, साताऱ्यात दवबिंदू गोठले, पिकांचे नुकसान

पुणे, सातारा : जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून वाऱ्यांमुळे बोचरी थंडी जाणवत होती. मात्र शनिवारी (ता.९) पहाटे थंडीचा कडाका वाढुन जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये दवबिंदू गोठुन हिमकण तयार झाले. हिमकणांमुळे पिकांसह पशुधनालाही फटका बसला आहे. यामध्ये द्राक्ष, टोमॅटो, कलिंगड, पालेभाज्यांचा समावेश आहे.

जुन्नर तालुक्यातील पश्‍चिम घाट परिसरातील आदिवासी भागात अनेक ठिकाणी दवबिंदू गोठले. नारायणगाव, पिंपळवंडी, गुंजाळवाडी, नेतवड, बनकरमळा आदि भागात अनेक ठिकाणी दवबिंदू गोठले. अनेक चारचाकी, दुचाकींवर देखील हिमकण तयार झाले. अनेक ठिकाणी साठवलेल्या सुक्या चाऱ्यावर हिमकण गोठा झाल्याने त्या चाऱ्याला बुरशीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. उघड्यावरील पशुधनाला थंडीचा फटका बसल्याने अशक्तपणा येण्याचा धोका आहे. ही थंडी गहू, कांदा, ज्वारी, हरभरा या पिकांना थंडीचा फायदा होणार असली तरी द्राक्ष आणि फुलोऱ्यातील कलिंगडासह इतर पिकांना मारक ठरण्याची शक्यता आहे.

भीमाशंकर (ता. आंबेगाव) तालुक्‍याच्या आदिवासी डोंगरी भागातील निगडाळे, राजपूर, भागीतवाडी, सावरली, तिरपाड, तळेघर आदी गावात मोठ्या प्रमाणात थंडी पडली. निगडाळे येथील पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी शेकोटी पेटवून अध्ययन केले. श्री. क्षेत्र भीमाशंकर येथे या मोसमात अतिथंडीमुळे सात अंश सेल्सिअस इतक्‍या नीचांकी तापमानाची पहिल्यांदाच नोंद झाल्याचे अनेकांनी सांगितले. सर्वत्र दवबिंदूचा बर्फ झाल्याचे पहावयास मिळत होते. निगडाळे, राजपूर, भागीतवाडी, सावरली, तिरपाड, तळेघर आदी शाळांमध्ये स्वेटर, कानटोपी, मफलर, हातमोजे, घोंगडी घेऊनच विद्यार्थी शाळेत दाखल झाले. थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी शाळेला दांडी मारल्याने उपस्थितीवर परिणाम जाणवला.

सातारा गारठला ...

जिल्ह्यात अचानक पडलेल्या कडक्याच्या थंडीमुळे पिके गारठली आहेत. द्राक्ष, स्ट्रॅाबेरी, आंबा फळ पिकांना अतिथंडीचा फटका बसणार आहे. या थंडीमुळे महाबळेश्‍वर परिसरात तिसऱ्यांदा हिमकण तयार झाले आहे.  जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून अचानक थंडीचे प्रमाण वाढले होते. थंड वाऱ्यांची झुळक सातत्याने येत असल्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा निर्माण झाला होता. शनिवारी पहाटेपासून थंडी वाढल्याने महाबळेश्‍वरसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी हिमकण वर्षाव झाला आहे.

महाबळेश्‍वर येथील लिंगमळा, वेण्णालेक परिसरात हिमकणाची अक्षरशः चादर परसली होती. या परिसरात पारा दोन अंशांवर गेल्याचे बोलले जात आहे. स्ट्रॅाबेरीची हिरवी पाने पांढरी दिसत होती. या थंडीत तिसऱ्यांदा दवबिंदू गोठले आहेत. थंडीचा काही प्रमाणात स्ट्रॅाबेरीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हिमकणांच्या वर्षावामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. दुष्काळी माण, खटाव, फलटण या तालुक्यांतील अांबिया बहर धरलेल्या डाळिंबाची फुलगळीची शक्यता आहे. खटाव तालुक्यातील निर्यातक्षम द्राक्षाची मोठी हानी होणार आहे. तसेच द्राक्षाचे क्रॅकिंग होण्याबरोबरच भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची धोका आहे. तसेच तोडणीस आलेली द्राक्ष गुलाबी पडत आहेत. त्यामुळे द्राक्ष निर्यातीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

आंबा फळाचीही हानी होणाची भीती आहे. मोहरात अती वाढ झाल्याने पोषण होणार नाही. याचा फळावर परिणाम होणार आहे. ऊसतोडीसाठी खोपटात वास्तव्यास असलेल्या ऊसतोड मजूर थंडीमुळे पुरते काकडून निघाले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com