सांगली जिल्ह्यातील २४६ गावांवर दुष्काळाचे सावट

सांगली जिल्ह्यातील २४६ गावांवर दुष्काळाचे सावट
सांगली जिल्ह्यातील २४६ गावांवर दुष्काळाचे सावट

सांगली ः जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने पेरणी आणि पीकपाहणी करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी तालुक्‍यांतील २४६ गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याने या गावांवर दुष्काळाचे संकट ओढवले आहे.

हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणे वेळेवर पावसाला सुरवात झाली. यामुळे बळिराजा आनंदी होता. पलूस, मिरज, कडेगाव, शिराळा या तालुक्‍यांत दमदार पाऊस झाला. यामुळे या भागातील पिके चांगलीच बहरली. मात्र, दुष्काळी पट्ट्यात उन्हाळ्यातील वादळी पडलेल्या पावसावर पेरणी केली. त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकाची पुरेशी वाढ झाली नाही.

अनेक पिके वाळून गेल्याने शेतकरी हतबल झाला. त्यामुळे प्रशासनाने पीकपाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ग्रामस्तरावरील समितीने पाहणी केली. त्यात २४६ गावांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी लागली आहे. या गावांचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत सरकारकडे सादर करण्यात आला आहे. सुधारित अहवाल या महिनाअखेरपर्यंत आणि अंतिम अहवाल डिसेंबरपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्याच्या पूर्व भागात यंदा पावसाची बिकट स्थिती आहे. परतीचा पाऊसही अद्याप पुरेसा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे

प्रशासनाची सतर्कता गेल्या वर्षीच्या खरिपात २५८ गावांत ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी लागल्याने दुष्काळसदृश स्थिती जाहीर होती. वीजबिल, शैक्षणिक शुल्कात सवलत दिली आली. त्यात आटपाडी तालुक्‍यातील एकाही गावाचा समावेश नव्हता. हा मुद्दा लोकप्रतिनिधींनी उचलून धरल्याने ग्राम समितीकडून पीक, पाऊस याची पाहणी व्यवस्थित करावी, असे आदेश जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी दिले.

योजना पूर्ण क्षमतेने चालवण्याची आवश्‍यकता जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पाणी योजना पूर्ण क्षमतेने चालवण्याची गरज आहे. टेंभू, ताकारी, आरफळ या योजना सुरू झाल्या असल्या, तरी म्हैसाळ योजना अद्याप सुरू झालेली नाही. सध्या पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी मतभेद विसरून एकत्रित या पाणी योजना पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा लोकांचे, जनावरांचे हाल होणार आहेत.

तालुका गावांची संख्या
तासगाव ६९
मिरज ३७
कवठेमहांकाळ ६०
जत ५४
आटपाडी २६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com