अकोला जिल्ह्यात दुष्काळस्थिती गंभीर

अकोला जिल्ह्यात दुष्काळस्थिती गंभीर
अकोला जिल्ह्यात दुष्काळस्थिती गंभीर

अकोला : पावसातील खंडामुळे जिल्ह्यातील पीकपरिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली अाहे. सोमवारी (ता. २२) पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अधिकाऱ्यांसह बाळापूर तालुक्यात ठिकठिकाणी भेट देऊन पाहणी केली. जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, तुरीच्या पिकांसह विविध पिकांचे उत्पन्न कमी होणार आहे. शेतकऱ्यावर आलेल्या या संकटातून सावरण्यासाठी शासन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करेल, असे पाटील यांनी या वेळी सांगितले.

जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत दुष्‍काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे  पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. जमिनीला भेगा पडल्यामुळे शेतात तग धरून असलेल्या पिकांची स्थिती बिकट असल्याचे दिसून येत आहे.  

पालकमंत्री डॉ. पाटील यांनी बाळापूर तालुक्यातील निमकर्दा, मोरगाव सादीजन, अंदुरा आदी गावांना भेट देऊन पिकांची पाहणी केली. या वेळी माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, बाळापूरचे उपविभगीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार दीपक पुंडे, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर, तालुका कृषी अधिकारी जांभूरणकर आदींची उपस्थिती होती.  

निमकर्दा येथील अरुण बळिराम जामोदे यांच्या शेतातील तुरीचे उत्पादन पाणी नसल्यामुळे घटणार आहे. अशीच परिस्थिती निमकर्दा मंडळामधील इतर शेतातील आहे. पावसाच्या दोन पाण्यात खंड पडल्यामुळे सोयाबीनचे अत्यंत कमी म्हणजेच एकरी दीड क्विंटल झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सोयाबीन तूर, कपाशी आदी पिकांच्या उत्पादनात घट झाली असल्याचे शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कागदपत्रांच्या नोंदीनुसार नाही, तर प्रत्यक्ष पाहणी करून शासनाकडे अहवाल पाठविणार असल्याचे डॉ. पाटील यांनी या वेळी शेतकऱ्यांना सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com