सहकारमंत्र्यांमुळेच ‘दुष्काळा’तून उत्तर सोलापूर वगळले : साठे

सहकारमंत्र्यांमुळेच ‘दुष्काळा’तून उत्तर सोलापूर वगळले
सहकारमंत्र्यांमुळेच ‘दुष्काळा’तून उत्तर सोलापूर वगळले

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सपाटून पराभव झाल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उत्तर सोलापूर तालुक्‍याला दुष्काळी तालुक्‍याच्या यादीतून मुद्दामहून वगळल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे यांनी पत्रकार परिषदेत केला. या तालुक्‍याचा दुष्काळी तालुक्‍यात समावेश व्हावा, यासाठी लवकरच आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारच्या अपयशाचा पाढा वाचण्यासाठी साठे, सोलापूर शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद घेतली. केंद्र सरकारच्या नोटबंदी, महागाई, इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्य कर्जाच्या खाईत गेले आहे. कृषी विकासाचा दर उणे पातळीत, कायदा व सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्‍न, महिलांची सुरक्षितता ऐरणीवर, शेतकरी कर्जमाफीपासून हमीभावापर्यंत दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्‍न, सनातनी व जातीयवादी शक्तींना बळ मिळाल्यामुळे संविधान व लोकशाही विचारांची झालेली पायमल्ली आदींमुळे जनता वैतागली असल्याचे साठे यांनी सांगितले.  

मेक इन महाराष्ट्राची जुमलेबाजी, बेरोजगारीच्या प्रश्‍नावर सपशेल उताणे पडलेले सरकार, निम्म्या मंत्रिमंडळावर भ्रष्टचारचे आरोप असताना त्यांना पाठीशी घालणारे मुख्यमंत्री यामुळे जनता त्रस्त आहे. राज्य सरकारचा या चार वर्षांत केवळ पोकळ घोषणा आणि निष्क्रिय कारभार बघायला मिळाला. सरकारवर लोकांचा रोष आहे. तो व्यक्त करण्यासाठी आम्ही आंदोलने केली आहेत. पुढील काळातही आंदोलने करावी लागतील, अन्यथा जनता आम्हाला माफ करणार नाही, असेही साठे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com