पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट

पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट
पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट

नांदेड  ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील उगवलेल्या तसेच पेरणी केलेल्या पिकांना पाण्याचा ताण बसला आहे. कपाशी, हळद या पिकांचा उगवण व्यवस्थित होत नाही. मूग, उडीद, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिके सुकू लागली आहेत. दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी धास्तावले आहेत. पावसाअभावी अनेक मंडळांतील पेरणी रखडलेलीच आहे. पीक परिस्थिती बिकट झाल्यामुळे शेतकरी चिंतेत झाले आहेत.

या तीन जिल्ह्यांत जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात अनेक तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन, तूर पेरणीसह कापूस, हळद लागवड करण्यात आली. परंतु त्यानंतर तब्बल १० ते १२ दिवसांच्या खंडानंतर पावसाचे आगमन झाल्यानंतर परत पेरणीस सुरवात झाली. आजवर ६० ते ७० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील सगरोळी, आदमापूर (ता. बिलोली), येवती, जहूर, चांदोला, बाऱ्हाळी, मुक्रमाबाद (ता. मुखेड), देगलूर, खानापूर, मरखेल, मालेगाव, हानेगाव (ता. देगलूर), ईस्लापूर, जलधारा, शिवणी, दहेली (ता. किनवट), जारिकोट (ता. माहूर) मंडळांमध्ये जून महिन्याच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यातील पेडगाव, जांब, सिंगणापूर, पिंगळी (ता. परभणी), राणीसावरगाव (ता. राणीसावरगाव), पाथरी, बाभळगाव (ता. पाथरी), जिंतूर, आडगाव (ता. जिंतूर), वालूर, कुपटा (ता. सेलू) या मंडळांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस, खंबाळा (ता. हिंगोली), वाकोडी, डोंगरकडा (ता. कळमनुरी), गिरगाव (ता. वसमत), सेनगाव, साखरा (ता. सेनगाव) मंडळामध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे या मंडलातील अनेक गावांतील पेरणी रखडलेलीच आहे. सरंक्षित पाणी असलेले शेतकरी पिके वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु कोरडवाहू शेतकरी मात्र अडचणीत असून दुबार पेरणीच्या सावटाने चिंतेत झाले आहेत.

आजवर मोठा पाऊस झालाच नाही. पाऊस येण्याच्या आशेने कापूस लागवड केली; पण आता कपाशीची वाढ खुंटली आहे. मूग पाणी देऊन वाचविण्याचा प्रयत्न करत आहोत. - बाळासाहेब रनेर, शेतकरी, बाभळगाव, ता. पाथरी, जि. परभणी.

पाऊस लांबल्यामुळे गतवर्षीपेक्षा बिकट परिस्थिती आहे. ४० एकर जमिनीवर अजून पेरणी केली नाही. - विठ्ठल गिराम, शेतकरी, बाभळगाव, ता. पाथरी, जि. परभणी.

पाच एकरवर सोयाबीनची दुबार पेरणी केली; परंतु सात दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे उगवण व्यवस्थित होत नाही. दुबार पेरणीही वाया जाती की काय. - दिलीप दराडे, शेतकरी, अनखळी वाडी, ता. औंढा, जि. हिंगोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com