मुसळधारेमुळे रब्बी हंगाम लांबण्याची शक्यता

मुसळधारेमुळे रब्बी हंगाम लांबण्याची शक्यता
मुसळधारेमुळे रब्बी हंगाम लांबण्याची शक्यता

सांगली, कोल्हापूर  : जिल्ह्यात सोमवारी (ता. २१) दिवसभर पावसाने उघडीप दिली. सायंकाळी सातनंतर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने हजेरी लावली. रब्बी हंगामास हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. गेल्या आठवड्यात अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी केली होती. मात्र, शेतात पाणी साचल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. पाऊस असाच राहिला तर रब्बी हंगाम सुरू होण्यास पंधरा दिवस विलंब होण्याची शक्यता असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून धो-धो बरसणाऱ्या पावसाचा जोर सोमवारी (ता. २१) रात्रीपासून मंगळवारपर्यंत (ता. २२) सकाळपासून पुन्हा सुरूच राहिला. सोमवारी दिवसभर थांबलेल्या पावसाने सायंकाळी सात वाजल्यापासून जिल्ह्यात पुन्हा बरसायला सुरवात केली. रात्रभर संततधार पाऊस सुरू असल्याने नाले, ओहोळ, ओढे भरून गेले. अनेक ठिकाणी मंगळवारी सकाळी रस्ते बंदची स्थिती राहिली.

चांदोली धरणातून मंगळवारी (ता. २२) ३ हजार ६०७ क्युसेकने पाणी विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे वारणा नदीतील पाणी पात्राबाहेर येऊ लागले आहे. मांगले-काखे पूल पाण्याखाली गेला आहे.  दुष्काळी टापूत मुसळधार पाऊस झाला. यामुळे बळिराजा सुखावला आहे. पाण्याचा प्रश्न मिटला आहे. कर्नाटकातील पावसाने जत तालुक्यातील बोर नदी दुथडी वाहू लागली आहे. सोमवारी (ता. २१) रात्री झालेल्या पावसाने औंदुबर (ता. पलूस) कृष्णा नदीच्या पातळी वाढ झाल्याने दत्त मंदिर पाण्याखाली गेले. हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील अग्रणी नदीवरील असणारा पूल खचत चालला आहे.

जिल्ह्यातील ऊस पट्ट्यात आडसाली, सुरूच्या लागणी केल्या आहेत. ऊसात पाणी साचले आहे. त्यामुळे मशागतीची कामे रखडली आहेत. शिराळा तालुक्यात गेल्या आठवड्यापासून भात काढणीला सुरवात झाली आहे. कापणी केलेल्या भात मळ्यांमध्ये पाणी साचले आहे. गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचे पाणी शेतात साचून राहिले आहे. त्यामुळे नुकसान होण्याचा अंदाज आहे. 

शेतात पाणी साचून राहिल्याने काढणीयोग्य झालेली खरीप पिके सध्या कुजू लागली आहेत. गेले दोन दिवस झाले परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन, भात व भुईमूग ही पिके पाण्यात तरंगू लागली आहेत. 

गेल्या चार दिवसांपासून ठरविल्याप्रमाणे पाऊस बरसत आहे. काही ठिकाणी संततधार, तर काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस होत असल्याने स्थानिक जलस्रोत मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. धरणक्षेत्रात पाऊस झाल्याने वाढणाऱ्या नद्याचे पाणी स्थानिक ठिकाणी पाऊस झाल्यानेही वाढत असल्याचा अनुभव नदीकाठावरील प्रत्येक गावात येत आहे. यामुळे नद्यांचे पाणी वाढून काही तास मार्ग बंद रहात आहेत. 

खरीप पिकांची अवस्था मोठी चिंताजनक बनत आहेत. अनेक शेतात पाणी साचून राहिल्याने वाफसा सोडाच, परंतू आहे ती पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऊस शिवारातही पाणी साचून राहिल्याने उसाच्या मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. दिवसभर उघडीपीने दिलासा मिळण्याची शक्‍यता असतानाच रात्रभर पाऊस बरसला. त्यामुळे जिल्ह्याचे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले. 

दुष्काळी भागात अनेक बंधारे कोरडेच वास्तविक पाहता दुष्काळी पट्ट्यात मुसळधार पाऊस झाला असला तरी बंधारे पाण्याने भरलेले नाहीत. काही बंधाऱ्यांत पावसाचे अत्यल्प पाणी आले आहे. दुष्काळी भागात हा पाऊस रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी उपयुक्त ठरेल. तरीही भविष्यात बंधारे, विहिरी भरण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com