खाद्याच्या दरवाढीमुळे पोल्ट्री उद्योग मेटाकुटीला

पुणेः मार्च महिन्याच्या सुरवातीलाच ब्रॉयलच्या दरात सुधारणा झाली. जिवंत पक्ष्याचे दर प्रतिकिलो १३० रुपयांवर पोचले. मात्र दोन वर्षांपासून संकटात असणाऱ्या पोल्ट्री उद्योगाला सध्या खाद्य दरवाढीचा फटका बसतोय.
Due to rising food prices Poultry industry exhausted
Due to rising food prices Poultry industry exhausted

पुणेः मार्च महिन्याच्या सुरवातीलाच ब्रॉयलच्या दरात सुधारणा झाली. जिवंत पक्ष्याचे दर प्रतिकिलो १३० रुपयांवर पोचले. मात्र दोन वर्षांपासून संकटात असणाऱ्या पोल्ट्री उद्योगाला सध्या खाद्य दरवाढीचा फटका बसतोय. खाद्याचे दर ६० टक्क्यांपर्यंत वाढले. तर सप्लीमेंटच्या दरात दोन पटींपर्यंत वाढ झाली, असे पोल्ट्री उद्योजकांनी सांगितले. आधीच संकटात असलेल्या पोल्ट्रीला या दरवाढीने फार दिलासा मिळणार नाही. त्यासाठी सरकारने अनुदानावर गहू आणि तांदूळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. 

भारत जागतिक अंडी उत्पादनात तिसरा, तर ब्रॉयलर्स उत्पादनात चौथा आहे. देशातील पोल्ट्री मार्केट २०२० मध्ये दोन लाख कोटींवर पोचले. सध्या देशात वर्षाला जवळपास ११ हजार ५०० कोटी अंडी उत्पादन होते. तर ४३ ते ४५ लाख टनांच्या दरम्यान चिकन उत्पादन झाले. अलीकडच्या काळात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी पोल्ट्रीला अधिक पसंती देतात. पोल्ट्री उत्पादनातील ८० टक्के खर्च मका व सोयामिलवर होतो. पोल्ट्री उद्योगात वर्षाला १४५ ते १५५ लाख टन मका वापरला जातो. तर ५२ लाख टनांच्या दरम्यान सोयापेंडचा वापर होतो. देशात आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा ही राज्ये पोल्ट्री उत्पादनात अग्रेसर आहेत. पान २ वर 

महाराष्ट्रात ब्रॉयलर पोल्ट्री उद्योगावर सुमारे दहा हजार पोल्ट्रीधारक शेतकरी कुटुंबे थेट अवलंबून आहेत. सुमारे १२ हजार लोकांना पोल्ट्री कंपन्यांत थेट रोजगार मिळाला आहे. तर १५ हजार लोकांना चिकन सेंटर्सवर रोजगार मिळतोय.   मागील दोन वर्षांपासून पोल्ट्री उद्योग संकटात सापडला. कोरोना काळात अफवांमुळे उद्योगाला मोठा फटका बसला. नंतर दर सुधारले. मात्र तोपर्यंत अनेक उद्योग बंद पडले होते. आताही उद्योगासमोरील अडचणी कमी झालेल्या नाहीत. सध्या देशात जिवंत पक्ष्याचा प्रतिकिलोचा दर १२० ते १३६ रुपयांवर पोचला. तर महाराष्ट्रात हा दर १२८ रुपयांवर आहे. मागील दोन वर्षांनंतर मिळालेला हा सर्वाधिक दर असल्याचं उत्पादकांनी सांगितलं. मात्र कोरोना काळापासूनच खाद्याच्या दरात मोठी वाढ होत गेली. ती आजपर्यंत कायम आहे. 

आवश्यक सप्लीमेंट्सचे दरही ६० टक्क्यांपासून दोन पटींपर्यंत वाढले. याचा थेट परिणाम पोल्ट्रीच्या उत्पादन खर्चावर होत आहे. त्यामुळे वाढलेल्या दराचा फार मोठा फायदा उत्पादकांना होताना दिसत नाही. पोल्ट्री खाद्याचे दर तीन महिन्यांपूर्वी ३५ वरून ४५ रुपये प्रति किलोंवर पोहोचले आहेत. चेन्नई येथील वितरकांच्या मते गेल्या दीड वर्षात खाद्याचे दर प्रति किलो १५ रुपयांनी वाढले आहेत. हरियानामध्ये सोयापेंडचे दर सुमारे ७० हजार प्रति टन आहेत, तर मक्याचे दर २३ हजार प्रति टन आहे.

महाराष्ट्र पोल्ट्री ब्रीडर्स अॅन्ड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वसंतकुमार शेट्टी म्हणाले, ‘‘पशुखाद्याचे दर वाढल्याने अनेक पोल्ट्री उद्योग बंद पडले. परिणामी उत्पादन घटले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुरवठा कमी होऊन अंडी आणि चिकनचे दर आणखी वाढू शकतात. त्यामुळे सरकारने पोल्ट्रीला गहू आणि तांदूळ कमी दरात द्यावा, अशी मागणी आम्ही केली आहे. सध्या एका अंड्याचा उत्पादन खर्च ४ रुपये २५ पैसे पडतो आणि दर मिळतो ३ रुपये ३० पैसे. त्यामुळे उत्पादकांना एक रुपया खिशातून टाकावा लागतो. चिकन आणि अंड्याचा मुख्य ग्राहक मध्यम वर्ग आहे. त्यामुळे दर वाढल्यास चिकन आणि अंडी कमी खातात. त्यामुळे दर कमी होतात आणि पुन्हा उत्पादन कमी होते. त्यामुळे कमी दरात खाद्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.

काही शेतकरी जास्त वयाचे पक्षी ठेवतात. त्यांना खाद्यही जास्त लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी असे पक्षी लवकर काढावे. यातून उत्पादन खर्चही कमी होईल. शेतकरी दर कमी झाले की लगेच विक्री करतात. असे न करता थांबायला हवे. अंड्याचा पुरवठा संतुलीत ठेवल्यास दरही टिकून राहतील. ८ ते १५ दिवस वाट पाहायची मनःस्थिती ठेवायला हवी.  लातूर येथील पोल्ट्री उद्योजक विजय जाधव म्हणाले, ‘‘पोल्ट्रीचा उत्पादन खर्च ६० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मागील पाच वर्षांतील सरासरीच्या तुलनेत मक्याचे दर सरासरी ५०० रुपयांनी वाढले. तर सोयापेंडचे दर क्विंटलमागे ३०० रुपयांनी अधिक झाले. सध्या पोल्ट्री पक्ष्यांचा दर वाढला असला तरी खर्चाच्या तुलनेत ही वाढ कमीच   आहे.

सध्या शेतकरी माल राखून विकत आहेत. त्यामुळे दर वाढून कोरोनामुळे पोल्ट्रीच्या फूड सप्लीमेंट्सचे दरही ६० टक्के ते दोन पटींपर्यंत वाढले. व्हिटॅमिन्स, मिनरल्स आदी मालांचे दर वाढले. जे खाद्य २७०० रुपयांपर्यंत मिळत होते, ते ४५०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. सध्या पोल्ट्रीचा उत्पादन खर्च ९५ ते १०० रुपयांवर पोचला आहे. मात्र आत्तापर्यंत मिळणारा दर कमी होता. मागील काही दिवसांत दर सुधारले.

मागील वर्षभरापासून ही समस्या आहे. सोयापेंडचे दरही वाढले. मका जो १२ ते १५ रुपये मिळत होता तो आता २५ रुपयांपर्यंत गेला. त्यामुळे छोटे पोल्ट्री उद्योग बंद पडतात. एक हजार ते ५ हजार पक्षी फार्म्स बंद होत आहेत. मोठे फार्म्स कर्ज घेऊन काम करत आहेत. आम्ही सर्व खासदारांकडे याबाबत निवेदन दिले आहेत. दरवाढ होण्यास युद्धाची स्थितीही कारणीभूत आहे. - वसंतकुमार शेट्टी, अध्यक्ष, पोल्ट्री ब्रीडर्स अॅन्ड वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र 

खाद्याचे दर तर वाढत आहेच. शिवाय दरात मोठे बदलही होत आहेत. आठवड्यातच १ हजार रुपयांपर्यंत दर बदलत आहेत. त्यामुळे खाद्याचा साठा करणे शक्य होत नाही. तसेच सध्या बाजारात खाद्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाला खाद्याचा साठा करण्यात अडचणी येत आहेत.   - विजय जाधव, पोल्ट्री उद्योजक, लातूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com