जलसंधारणामुळे पाटस तळ्यात पाणीसाठा

जलसंधारणामुळे पाटस तळ्यात पाणीसाठा
जलसंधारणामुळे पाटस तळ्यात पाणीसाठा

पुणे : जलसंधारणाच्या कामातून पाटस (ता. दौंड) येथील नागनाथ तलाव या गावतळ्यातील हजारो ब्रास गाळ काढण्यात आला. त्यामुळे दहा टीसीएम पाणीसाठा असलेल्या तळ्याची क्षमता वाढून सुमार ७० टीसीएम झाली आहे. पाणीसाठा वाढल्याने ओढ्यालाही पाणी वाहत असून, लगतच्या विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. तळ्यातून काढलेला गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य देण्यात आल्याचे उपसरपंच अशा शितोळे यांनी सांगितले.

पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जलसंधारणाच्या कामांची पाहणी करण्यासाठी मंगळवारी (ता. ३०) दौऱ्याचे आयोजन केले होते. त्या वेळी पाटस (ता. दौंड), लोणी भापकर (ता. बारामती) येथे भेटी देण्यात आल्या. पाटस येथे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, बारामतीचे माहिती सहायक विलास कसबे, ग्रामसेवक नृसिंह राठोड, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र पानसरे, संभाजी चव्हाण आदी उपस्थित होते. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अहवालानुसार पाटस येथील पाणीपातळीत अर्धा मीटरने वाढ झाली आहे.

याबाबत बोलताना उपसरपंच शितोळे म्हणाल्या, गावातील पिण्याच्या पाण्यासाठी वरवंड येथील व्हिक्टोरीया तलावातून पाणी आणले आहे. यंदा टंचाई असल्याने आत्तापासूनच पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

राजेंद्र पानसरे म्हणाले, नागनाथ तलावाला खडकवासला धरणाच्या कालव्यातून पाणी मिळते. मात्र, साठवण क्षमता कमी असल्याने हे पाणीही अपुरे पडत होते. त्यामुळे ग्राम निधीतून तळ्यातून हजारो ब्रास गाळ काढल्याने यंदा एक महिना कालवा बंद असूनही तळ्यामुळे मुबलक पाणी आहे.

संभाजी चव्हाण म्हणाले, तळ्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे ओढ्याला पाणी आहे. लोणी भापकर येथे पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, सरपंच विजय बारवकर, कृषी सहायक आर. डी. कदम यांनी जलसंधारण कामांची माहिती दिली. सकाळ रिलीफ फंड, सिद्धिविनायक ट्रस्ट, एन्व्हार्मेंटल फोरम आणि लोकसहभागातून ओढा खोलीकरणाची कामे करण्यात आली.

सरपंच बारवकर म्हणाले की, यंदा पाऊसच पडला नसल्याने जलसंधारण कामात पाणी साचले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com