महिनाभरात खडकपूर्णा भरले तुडुंब

महिनाभरात खडकपूर्णा भरले तुडुंब
महिनाभरात खडकपूर्णा भरले तुडुंब

बुलडाणा  ः विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्प गेल्या सहा वर्षांत प्रथमच तुडुंब भरला आहे. सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या या भागात आता खडकपुर्णामुळे दिलासा मिळणार आहे. पिण्याचे पाणी तसेच सिंचनासाठीही सोय उपलब्ध होणार आहे. दोन दिवसांपासून खडकपूर्णाच्या दोन गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खडकपूर्णाची क्षमता ९३.४० दलघमीची आहे. सद्यःस्थितीत प्रकल्पात ९१.६६ दलघमी म्हणजेच ९८.१४ टक्के साठा झालेला असल्याने दोन गेटमधून विसर्ग सुरू करण्यात आला. खडकपूर्णा प्रकल्पात ऑगस्टपर्यंत मृतसाठासुद्धा नव्हता. शिवाय बुलडाणा जिल्ह्यात या वर्षात देऊळगावराजा तालुक्यात सरासरीच्या ६६.९१ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. मात्र, धरणात मराठवाड्यातून पाण्याची आवक होते. धरणक्षेत्रातील नदी-नाल्यांना सातत्याने पाणी वाहल्याने प्रकल्पात चांगली आवक झाली. याचाच परिणाम खडकपूर्णा प्रकल्प सप्टेंबरमध्ये दर दिवसाला वधारत होता. अवघ्या महिनाभरात खडकपुर्णामध्ये ९१ दलघमी पाणीसाठा झाला आहे. खडकपूर्णा प्रकल्पात २०१३ मध्ये प्रथमच संचय करण्यात आला होता. त्यानंतर प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागला. मराठवाड्यातील गौताळा अभयारण्यातून उगम पावणाऱ्या पूर्णा नदीवर हा प्रकल्प उभारलेला आहे. हा प्रकल्प भरल्याने देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार तालुक्यांतील ४४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटला आहे. आता काठावरील गावांनाही थेट फायदा होणार आहे. 

खडकपूर्णा प्रकल्पाचा विसर्ग वाढवला देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पात पाण्याची आवक लक्षात घेता बुलडाणा पाटबंधारे विभागाच्या आदेशाने सोमवारी (ता. ३० सप्टेंबर) दुपारी अडीच वाजता प्रकल्पाचे पाच दरवाजे २० सेंटिमीटरने उघडण्यात आले. यामुळे नदीपात्रात ४९२० क्युसेक एवढा विसर्ग होत आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com