जेजुरीत १७ तास रंगला मर्दानी दसरा

दसऱ्यानिमित्त जेजुरी येथे तलवार उचलण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली
दसऱ्यानिमित्त जेजुरी येथे तलवार उचलण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली

जेजुरी,जि. पुणे  ः सनई-चौघड्याचा मंगलमय सूर, फटाक्‍यांची आतषबाजी, शोभेच्या दारूचा लख्ख उजेड व भंडाऱ्याची उधळण, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात जेजुरीत मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता  श्री खंडोबाच्या दोन्ही पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला. कडेपठारच्या डोंगररांगांना जागविणाऱ्या या मर्दानी दसरा उत्सवाची सतरा तासांनंतर सांगता झाली. 

जेजुरीचा दसरा उत्सव मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झाला व बुधवारी सकाळी अकरा वाजता गडावर तलवार उचलण्याच्या स्पर्धेनंतर संपला. सायंकाळी सहा वाजता पेशव्यांनी इशारा देताच पालखी सोहळा सुरू झाला. भाविकांनी सज्जावरून पोत्याने पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली. पालखी मुख्यद्वारातून रमणा परिसराकडे मार्गस्थ झाली. या वेळी देवसंस्थानचे मुख्य विश्‍वस्त ॲड. अशोक संकपाळ, विश्‍वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, तुषार सहाणे, ॲड. प्रसाद शिंदे, खांदेकरी मानकरी मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे आदी उपस्थित होते.

कडेपठारावरील खंडोबाचा पालखी सोहळा रात्री नऊ वाजता सुरू झाला. सुसरटिंगीवरून दोन्ही पालख्या दिसल्यानंतर रमणाकडे दोन्ही पालख्या मार्गस्थ झाल्या. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कडेपठारच्या डोंगरातील रमणा परिसरात आरशामध्ये दोन्ही पालख्यांची भेटाभेट झाली. त्या वेळी फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर गडावरची पालखी जुनी जेजुरीमार्गे शहरात आली. नगरपालिकेच्या पटांगणातील रावणाचे दहन करण्यात आले. त्यानंतर नंदी चौकात धनगर समाजबांधवांनी ओव्या म्हणत लोकर उधळली.

कडेपठारच्या पालखीबरोबरच्या भाविकांना खाली उतरण्यासाठी या वेळी देवसंस्थानच्या वतीने दोर लावले होते. दोर धरून भाविक खाली उतरत होते. त्यामुळे घसरण्याचा धोका टळला. देवसंस्थानने विजेची सोय केली होती. महाद्वार रस्त्यावर पालखीचे स्वागत करण्यासाठी ग्रामस्थांनी रांगोळ्या काढल्या होत्या. गडावर कलावंतांनी पालखीपुढे हजेरी लावली. देवसंस्थानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. रोजमारा वाटून पालखी सोहळ्याची सांगता झाली. मार्तंड देवसंस्थानच्या वतीने मानकऱ्यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला.

पालखी गडावर आल्यानंतर तलवार उचलण्याची स्पर्धा घेण्यात आली. एका हाताने तलवार उचलून धरणे व कसरत, अशा दोन प्रकारच्या स्पर्धा होत्या. एकूण ४६ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. माजी विश्‍वस्त सुधीर गोडसे, सोमनाथ उबाळे, कृष्णा कुदळे व जालिंदर खोमणे यांनी पंच म्हणून काम पाहिले. दोन्ही प्रकारांतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे एकवीस हजार, पंधरा हजार व अकरा हजार; तर उत्तेजनार्थसाठी प्रत्येकी पाच हजार व गौरवचिन्हे देऊन सन्मान करण्यात आला.

तलवार स्पर्धेत शेरे, कुदळे प्रथम एका हाताने तलवार उचलून धरण्याच्या स्पर्धेत रमेश दत्तात्रेय शेरे (१७ मिनीट १३ सेकंद) यांनी प्रथम, मंगेश चव्हाण ( ५ मिनीट ३८ सेकंद) याने द्वितीय; तर हेमंत माने (५ मिनीट ३० सेकंद) याने तृतीय क्रमांक मिळविला. अक्षय खोमणे (२ मिनीट ५४ सेकंद) व विजय कामथे (२ मिनीट ३१ सेकंद) यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. तलवार कसरतीच्या स्पर्धेमध्ये सचिन शिवाजी कुदळे, शिवाजी माणिक राणे व नितीन शिवाजी कुदळे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले. विशाल माने व अक्षय गोडसे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com