`दत्त’ देणार एकरकमी  ‘एफआरपी’ २९२० रुपये  Dutt will give a lump sum ‘FRP’ Rs
`दत्त’ देणार एकरकमी  ‘एफआरपी’ २९२० रुपये  Dutt will give a lump sum ‘FRP’ Rs

`दत्त’ देणार एकरकमी  ‘एफआरपी’ २९२० रुपये 

शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या उसाला एकरकमी प्रति टन २९२० रुपये ‘एफआरपी’ देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी बॉयलर प्रदीपन प्रसंगी केली.

कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या उसाला एकरकमी प्रति टन २९२० रुपये ‘एफआरपी’ देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी बॉयलर प्रदीपन प्रसंगी केली. शेतकऱ्यांचे व कामगारांचे हित जपणे हेच दत्त कारखान्याचे ब्रीद असून, सर्वांना पुढे घेऊन जाण्याची दृष्टी ठेवली आहे. महापुरात बुडित झालेल्या उसाला गाळपासाठी प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

कारखाना संचालक इंद्रजित पाटील, राजश्री पाटील यांच्या हस्ते पूजाविधी आणि बॉयलर प्रदीपन करण्यात आले. येत्या २१ ऑक्टोबरपासून कारखाना सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून अध्यक्ष पाटील म्हणाले, ‘‘कामगारांना दिवाळीला २१ टक्के बोनस एकरकमी देण्यात येणार आहे. या वर्षी साडेअकरा ते बारा लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट असून, १२.१०च्या वर रिकव्हरी होईल, असा अंदाज आहे. गेल्या वेळी ऊर्जांकुरच्या माध्यमातून १६ कोटी युनिट वीजनिर्मिती झाली असून, त्यातील ४ कोटी युनिट वापरून उर्वरित १२ कोटी युनिट वीज ग्रीडला दिली आहे.’’ 

पाटील म्हणाले, ‘‘शेती शास्त्रज्ञ व शेती तज्ज्ञांची कार्यशाळा आयोजित करून यामध्ये महापूर क्षेत्रात कोणती नवी पिके घेता येतील यावर सखोल चर्चा करण्यात आली आहे. आंबा, चिकू आणि बीट यांचे प्रायोगिक तत्त्वावर उत्पन्न घेण्यास सुरुवात झाली आहे. ५० एकरांवर बिटाचे उत्पादन घेऊन त्याचे गाळप करण्यात येणार आहे. बचत गटांच्या १५० महिलांच्या माध्यमातून देशी वाणांचे संगोपन करण्याचे कामही सुरू असून, लवकरच बीज बँक तयार होईल. कारखान्यात इथेनॉल आणि डिस्टिलरीचे उत्पन्नही घेण्यात येणार असून, दररोज ८० ते १०० सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी २०० टन ऊस उत्पादन घ्यावे यासाठी कारखान्याकडून सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.’’ 

‘वारणा’ देणार २९७७ रुपये एकरकमी ‘एफआरपी’ : कोरे 

वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामात येणाऱ्या उसास प्रति टन २९७७.१६ रुपये एकरकमी ‘एफआरपी’ देणार असल्याची घोषणा वारणा समूहाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली. चालू गळीत हंगामात सुमारे १४ लाख टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे डॉ. कोरे यांनी सांगितले. 

येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या ६३व्या ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कारखाना कार्यक्षेत्रातील पाच गटांतील ज्येष्ठ शेतकरी मारुती पाटील (कोडोली), शशिकांत निकम (पोखले), सर्जेराव खोत (भादोले), विलास पाटील गुरुजी (शिगाव), रामचंद्र संकपाळ (सागाव) या पाच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हस्ते व वारणा समूहाचे अध्यक्ष व आमदार डॉ विनय कोरे व वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गव्हाणीत उसाची मोळी टाकून झाला. या वेळी मिल बुकचे पूजन आमदार डॉ. कोरे यांच्या हस्ते झाले. 

डॉ. कोरे म्हणाले, ‘‘ऊसतोडणी व वाहतुकीची कमिशनसह सर्व देणी कारखान्याने दिली आहेत. अनेक वाहतूकदारांना अॅडव्हान्स देखील अदा केला आहे. कारखाना व डिस्टिलरीमध्ये अनेक तांत्रिक सुधारणा केली असल्याने साखर व उपपदार्थांची प्रतही उत्तम दर्जाची व गुणवत्तापूर्ण असणार आहे. ४४ मेगावॉटचा वीजप्रकल्प वारणा कारखान्याच्या स्वमालकीचा झाला असून, यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ऊस उत्पादकांना जादा दर देण्यास हातभार लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ३० कोटी रुपये शिल्लक ठेवून कारखान्याचा हा गळीत हंगाम सुरू केला आहे. गत हंगामात नोंद केलेल्या उसाची अन्य विल्हेवाट केलेल्या शेतकऱ्यांसाठी आकारण्यात येणारा दंड रद्द केला आहे. डिझेलची दरवाढ झाल्याने ऊस वाहतूकदारांना तोही फरक देण्याचा प्रयत्न कारखाना करणार आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com