साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद 

सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस अल्प प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील १ हजार ७१५ गावांमधील ७ लाख ४४ हजार ९४२ पैकी रविवारअखेर केवळ १ लाख ४२ हजार ५१२ म्हणजे केवळ १९.१३ टक्के खातेदारांनी पाहणी केली.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस अल्प प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील १ हजार ७१५ गावांमधील ७ लाख ४४ हजार ९४२ पैकी रविवारअखेर केवळ १ लाख ४२ हजार ५१२ म्हणजे केवळ १९.१३ टक्के खातेदारांनी ई-पीक पाहणी केली आहे. त्यात महाबळेश्‍वर तालुका अव्वल असून, या तालुक्यातील ६ हजार ५६६ पैकी ४ हजार ६४९ म्हणजे ७०.८० टक्के खातेदारांनी नोंदणी केली आहे. सर्वांत कमी पाटण तालुक्यातील १ लाख ५७ हजार ५५१ पैकी केवळ १२ हजार ६८४ म्हणजे ८.०५ टक्के खातेदारांनी ई-पीक पाहणी केली आहे.  ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यव्यापी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे परंपरागत पद्धतीने तलाठी स्तरावरील पीक पाहणीतील त्रुटी आणि अपूर्तता अथवा तक्रारी विचारात घेऊन आता शेतकऱ्याला स्वत:च्या शेतातील उभ्या पिकांचे फोटो काढून पीक पाहणी अपलोड करण्याचे स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका मोबाइलवरून २० खातेदारांची पीक पाहणी अपलोड करावयाची सोय असल्याने एका वस्ती/वाडीवर काही शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन असले तरी ई-पीक पाहणी १०० टक्के होण्यास काहीही अडचण येणार नाही. ई-पीक पाहणी मोबाइल ॲप वापरण्यास अत्यंत सोपे असून, त्यासाठी सर्व खातेदार शेतकऱ्यांना गावचे तलाठी व कृषी सहायकांमार्फत मार्गदर्शन केले जाते.  खरीप हंगाम ई-पीक पाहणी करण्यासाठीची १५ सप्टेंबर ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यास मान्यता दिली आहे आणि त्यानंतर १५ ऑक्टोबरपर्यंत तलाठी स्तरावरून पीक पाहणी करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. ई-पीक पाहणी शेतकरी करू न शकल्यास पीककर्ज, पीकविमा किंवा अन्य शासकीय योजना यांचा लाभ मिळणार नाही, असा निर्णय अद्याप शासनाने घेतलेला नाही. मात्र ई-पीक पाहणीमुळे पीकविमा, पीककर्ज, तसेच शासकीय योजनांचा लाभ सुलभ होणार हे मात्र नक्की. डिजिटल स्वाक्षरीत सात-बारा आता सर्वच योजनांसाठी जसे पंतप्रधान पीकविमा योजना, आधारभूत किमतीवरील धान/पीक खरेदी, नैसर्गिक आपत्तीमधील नुकसानभरपाई, पीक कर्जासाठी बँक पोर्टल, महाडीबीटी पोर्टल इत्यादीमुळे सात-बारावर अचूक पीक पेरा नमूद असणे शेतकरी बांधवांच्या हिताचे आहे. ई-पीक पाहणी मोबाइल ॲपमधील बहुसंख्य त्रुटीही दूर करण्यात आल्या असून, खातेदारांनी लवकरात लवकर ई-पीक पाहणी करावी, असे आवाहन शासन स्तरावरून करण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com