ई-पीक पाहणी योजना देशपातळीवर राबवली जाईल ः महसूल मंत्री थोरात 

देशाच्या शेतीमाल उत्पादन आणि विपणन क्षेत्रातील अचूक अंदाजासाठी ई-पीक पाहणी योजना देशपातळीवर राबविली जाईल, असा विश्‍वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
E-Crop Survey Scheme to be implemented at national level: Revenue Minister Thorat
E-Crop Survey Scheme to be implemented at national level: Revenue Minister Thorat

पुणे ः देशाच्या शेतीमाल उत्पादन आणि विपणन क्षेत्रातील अचूक अंदाजासाठी ई-पीक पाहणी योजना देशपातळीवर राबविली जाईल, असा विश्‍वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. दोनदिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेचा समारोप शनिवारी (ता.१३) मंत्री थोरात यांच्या उपस्थितीत झाला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये थोरात बोलत होते.  थोरात म्हणाले, ‘‘राज्यातील महसूल कायद्यांमध्ये विविध बदलांसाठी दोन दिवसीय महसूल परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये विविध जिल्हाधिकारी नवनवीन उपक्रम आणि योजना राबवित असतात. या योजना राज्यस्तरीय राबविण्याबरोबर, महसूल विभागाच्या अनेक कायद्यांमधील बदल करण्याच्या देखील सूचना प्रस्ताव परिषदेच्या निमित्ताने देण्यात आले. या पूर्वीच्या सूचनांनुसार राज्य शासनाच्या वतीने ई-पीक पाहणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, थोडा वेळ लागेल परंतु राज्यातील अनेक शेतकरी ऑनलाइन पीक पाहणीची नोंद करतील. यामुळे विविध पिकांच्या अचूक लागवडीचा अंदाज येणार आहे. यामुळे गाव, तालुका, जिल्हा आणि राज्यातील विविध पिकांची अचूक माहिती मिळणार आहे. याद्वारे शेतीमाल उत्पादन, बाजारभाव यांचा अंदाज बांधणे शक्य होणार आहे.’’  ई-पीक पाहणीमध्ये कृषीसह पणन आणि नियोजन विभागाला सामावून घेतले जाईल. त्यामुळे शेतीमाल विपणनाला चांगला उपयोग होणार आहे. तर शेतकऱ्यांसह कृषी उद्योगांना शेतमाल उत्पादन आणि बाजारभावाचे अंदाज मिळणार आहे. राज्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यावर ही योजना देशपातळीरवर राबविली जाईल. असा विश्‍वास मंत्री थोरात यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.  वाळू लिलाव, अकृषक जमिनींसाठी लवकरच नवीन शासन निर्णय  राज्यातील वाळू उपसा धोरण अधिक चांगले करण्याबरोबरच, जमिनी अकृषक करण्याची यंत्रणा अधिक सुलभ आणि सुटसुटीत करण्यासाठी नवीन शासन निर्णय लवकरच काढण्यात येतील. तर अकृषकसाठी महसूल विभाग जमिनींची प्रत बघून मालकांना पत्र देणार आहे. त्यामुळे अकृषक करण्याचा त्रास कमी होणार आहे, असेही मंत्री थोरात यांनी या वेळी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com