ई-पॉस यंत्रणेबाबत तांत्रिक अडचणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
जळगाव  ः खतांच्या विक्रीमध्ये पारदर्शकता व सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने आणलेल्या ई-पॉस (पॉइंटर ऑफ सेल) यंत्रणेचा इंटरनेट व दुरुस्ती, देखभाल खर्च यावरून खत विक्रेत्यांमध्ये असंतोष पसरू लागला आहे.
 
यातच ग्रामीण भागातील खत विक्रेत्यांचे व्यवहार फारसे नसतात; त्यांना इंटरनेटचा खर्च परवडणारा नसल्याच्या प्रतिक्रिया खत विक्रेत्यांनी दिल्या आहेत.  
 
जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत ई-पॉस यंत्रणा सर्व नोंदणीकृत खत विक्रेत्यांकडे बसविण्याचे नियोजन केले होते. तसे आदेश सर्व विक्रेत्यांना बजावले होते. परंतु ई-पॉस अद्यापही बसविलेले नसल्याने या संदर्भात कृषी विभाग व खत विक्रेत्यांमध्ये उदासीनता, टाळाटाळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ई-पॉससंबंधी मुख्यालयात स्वतंत्र कृषी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. परंतु याच अधिकाऱ्यांवर आता तालुका कृषी अधिकाऱ्यांचाही प्रभार असल्याने ई-पॉससंबंधीच्या कामावरून दुर्लक्ष होत असल्याची माहिती मिळाली. 
 
ई-पॉसची यंत्रणा पुरविण्याची जबाबदारी खत कंपन्यांकडे दिली आहे. त्यानुसार आजघडीला सर्वच खत कंपन्यांनी या यंत्राचा पुरवठा केला आहे. हे यंत्र संबंधित कंपन्यांच्या कार्यालयात असून, ते नोंदणीकृत खत विक्रेत्यांनी आपापल्या विक्री केंद्रात न्यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 
 
केवळ ७२० यंत्रे बसविली
जिल्ह्यात १३६५ नोंदणीकृत खत विक्रेते आहेत, परंतु केवळ ७२० खत विक्रेत्यांकडे ई-पॉस बसविले. तेदेखील व्यवस्थितपणे कार्यरत नाहीत. विक्रेत्यांना ई-पॉसमधील सॉफ्टवेअरबाबत अडचणी येत आहेत. अनेकदा सॉफ्टवेअर शिलकी साठ्याची नोंद घेत नाही, सुरवात व शेवटचा साठा या संबंधीच्या नेमक्‍या नोंदींचाही घोळ होतो, तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे येत नाहीत, अशा अडचणी विक्रेते सांगत आहेत.
 
यातच आता महिन्याला २०० रुपये इंटरनेटचा खर्च व यंत्रणेची दुरुस्ती, देखभाल कुणी करावी, असा प्रश्‍न घेऊन काही खत विक्रेत्यांनी कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांची भेट घेतली आहे. ही जबाबदारी खत कंपन्यांची, केंद्र सरकारची, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाची की खत विक्रेत्यांची हा मुद्दा आता उपस्थित झाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com