जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरू

जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरू
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरू

जळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, जळगाव व पाचोरा भागात अर्ली केळी लागवड सुरू झाली आहे. ही लागवड उष्णता वाढण्यापूर्वी शेतकरी पूर्ण करतील, असे चित्र आहे.  उष्णतेमुळे केळीचे कंद अंकुरत नाहीत. केळी रोपांना उष्णतेचा फटका बसून नांग्या अधिक भराव्या लागतात. यामुळे जिल्ह्यात अनेक शेतकरी मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर केळीची लागवड करतात. तर काही शेतकरी उष्णता वाढण्यापूर्वी म्हणजेच कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर पोचण्यापूर्वी फेब्रुवारीच्या मध्यापासून अर्ली केळी लागवड करतात. ही लागवड सध्या जळगावमधील कानळदा, पिलखेडा परिसर, यावलमधील न्हावी, भालोदचा भाग, रावेरातील निंभोरा, रसलपूर, पाचोरामधील नगरदेवळा, बाळद, मुक्ताईनगरमधील चांगदेव, नायगाव भागांत सुरू आहे. अनेक शेतकरी या लागवडीसाठी कंद व उतिसंवर्धित रोपांना पसंती देत आहेत. यंदा ही अर्ली केळी लागवड सुमारे दीड ते दोन हजार हेक्‍टरपर्यंत पोचू शकते. परंतु मार्चच्या पहिल्या आठवड्यापूर्वी ही लागवड पूर्ण होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  या अर्ली केळी लागवडीला शेतकरी आंबेबहार किंवा रामबागही म्हणतात. गिरणा, तापी, वाघूर, तितूर नदीकाठी ही केळी लागवडीची परंपरा आहे. केळी लागवडीसाठी मजूरही सध्या पुरेसे उपलब्ध होत आहेत. ही केळी लागवड झाल्यानंतर महिनाभरात केळीचे कंद किंवा रोपांभोवती शेतकरी धैंचाचे बियाणे टाकतील. यामुळे अतिउष्णतेत केळी रोपांचे संरक्षण होईल. यानंतर एप्रिलच्या अखेरीस धैंचा उपटून तो शेतातच केळी रोपांनजीक आच्छादन म्हणून टाकला जाईल. यामुळे जमीन सुपीकतेसाठी लाभ होईल तसेच पिकात नैसर्गिक आच्छादन होईल. यंदा जलसाठे मुबलक असल्याने अर्ली केळी लागवड सुमारे ३०० ते ४०० हेक्‍टरने वाढेल. मागील वर्षी सातपुडा पर्वतालगतच्या सर्वच गावांना टंचाईचा फटका बसला. यामुळे अर्ली केळी लागवड अपवादानेच झाली होती, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com