भारतातून पहिल्यांदाच गांडूळनिर्यात!

भारतातून केवळ सेंद्रिय पदार्थच नव्हे, तर सेंद्रिय शेतीत महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या जिवंत गांडुळांचीही चक्क निर्यात करण्यात आली आहे. देशातून गांडुळांची प्रथमच निर्यात असून, ओमान देशातून आलेल्या मागणीसाठीचा कंटेनर नुकताच सुखरूप पोहोचला आहे.
Earthworm exports from India for the first time!
Earthworm exports from India for the first time!

पुणे : भारतातून केवळ सेंद्रिय पदार्थच नव्हे, तर सेंद्रिय शेतीत महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या जिवंत गांडुळांचीही चक्क निर्यात करण्यात आली आहे. देशातून गांडुळांची प्रथमच निर्यात असून, ओमान देशातून आलेल्या मागणीसाठीचा कंटेनर नुकताच सुखरूप पोहोचला आहे. जगभरातील मृदा आरोग्य संपन्नतेचा अभाव असणाऱ्या देशांकरिता सेंद्रिय खत उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी भारताकरिता मोठी संधी मानली जात आहे. 

सेंद्रिय शेतीचे महत्त्व जगभरात वाढत असताना नवनव्या संधींचे निर्माण होत आहे. जगभरातील ग्राहक सेंद्रिय उत्पादनांची मागणी करू लागल्यामुळे भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण सेंद्रिय उत्पादनांपैकी २५ टक्के मालाची निर्यात सुरू झाली आहे. अशातच नवनव्या संकल्पना आणि गरजांतून निर्माण होणाऱ्या व्यवसायांना वाव मिळू लागल्याने निर्यात संधीही उपलब्ध होऊ लागल्या आहेत. 

पुणे येथील नेचर ॲग्रोटेक या संस्थेला ई-कॉमर्सच्या व्यासपीठावरून अशीच एक गांडूळ कल्चर निर्यातीची संधी उपलब्ध झाली. त्यांनी नफा-तोटा, जोखीम यांचा मेळ घालत या चार हजार किलो गांडुळांची यशस्वी निर्यात ओमानला केली. याबाबत बोलताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमरनाथ अंदुरे म्हणाले, ‘‘ई-कॉमर्सच्या व्यासपीठावरून गांडुळांची मागणी आमच्याकडे सप्टेंबरमध्ये नोंदविण्यात आली. देशांतर्गत गांडूळ पुरवठा करण्याचा आमचा अनुभव आहे. मात्र परदेशात गांडूळ आणि तेही जिवंत निर्यात करण्याचा कोणताही अनुभव नव्हता. देशातूनही यापूर्वी कधीही गांडूळनिर्मिती न झाल्यामुळे सर्व प्रक्रिया नव्याने राबविण्याची वेळ आमच्यावर होती. याकरिता पुणे, मुंबई, औरंगाबाद, दिल्ली आदी ठिकाणी कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, कस्टम विभाग यांच्याशी प्रत्यक्ष भेट आणि संपर्क करण्यात आला. वीसएक दिवसांच्या धावपळीनंतर सर्व आवश्‍यक प्रमाणपत्र, परवानग्या आणि कागदपत्रांची पूर्तता केली आणि २७ ऑक्टोबरला ओमान येथील सोहार बंदरात कंटनेर सुखरूप पोहोचला तेव्हाच हायसे वाटले.’’  

गांडूळ पाठविण्याचा अनुभव कोणत्याही शॉपिंग कंपनीला नव्हता. क्वारंटाइनसह माल व्यवस्थित पोहोचविण्याची जोखीम होती. याकरिता काही कंपन्यांना विषय समजावण्यात आला. सरकारच्या परवानग्या दाखविण्यात आल्या. अखेर बरेच प्रयत्न केल्यानंतर एका कंपनीने बुकिंग दिले आणि निर्यात पूर्ण केली. श्री. अंदुरे म्हणाले, ‘‘आर्डर मोठी होती. माझे गांडूळ शेड आहेत, मात्र एकट्याला ऑर्डर पूर्ण करणे शक्य नव्हते. माळीवाडगाव (जि. औरंगाबाद) येथील शेतकरी गोरखनाथ गोरे यांची आर्डरची पूर्तता करण्यास मोठी मदत झाली. प्राथमिक पातळीवर गांडूळनिर्मिती आणि उपलब्धतेचा प्रश्‍न मिटला असला, तरी निर्यातीकरिता एकूण २० दिवसांचा कालावधी आवश्यक होता. पॅकिगमधून गांडुळे बाहेर न निघणे, त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळणे, याकरिता शास्त्रशुद्ध पॅकिंग करणे, या कालावधीत लागणारे खाद्य असणे, योग्य तापमान या सर्व बाबींची व्यावसायिक पातळीवर योग्य व्यवस्थापन करण्यात आले. पहिलाच प्रयत्न असल्याने गांडुळे २० दिवसांनंतर जिवंत ओमानपर्यंत पोहोचण्याबाबत धाकधूक होती, मात्र जेव्हा आयातदार कंपनीकडून उद्दिष्टपूर्तीचे कळविण्यात आले, तेव्हाच स्वप्नपूर्तीचे समाधान वाटले.’’

गांडूळ निर्यातीकरिता कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, कस्टम विभाग, शिपिंग कंपनी आदींचे सहकार्य लाभले. विशेषत: कृषी निर्यात सल्लागार गोविंद हांडे, संदीप आहेर, शिपिंग कंपनीचे अजय थाम्पी, स्वाती मानसिंग यांनी मला सातत्याने मार्गदर्शन आणि मदत केली. यामुळेच मला गांडूळ निर्यात करणे सुकर झाले, असे श्री. अंदुरे म्हणाले.

बरीचशी शेतकऱ्यांची मुले आता निर्यातीकडे वळत आहेत. अमरनाथ अंदुरे हे बीडमधील शेतकरी पुत्र आहे. इंटरनेटवरून ओमानमधील गांडुळाच्या मागणीचा शोध घेतला. मात्र ही निर्यात करायची की नाही, संधी तर आहे, मात्र यात अडचण खूप होती. आम्ही मार्गदर्शन केले. या निर्यातीत गांडुळे जिवंत पाठविणे हेच मोठे जोखमीचे काम होते. त्यांनी हे आव्हान पत्कारले. यशस्वीरीत्या गांडुळे ओमानला पोहोचली. तिकडील कंपनीचा ‘फिडबॅक’ही चांगला आला. शेतकऱ्यांच्या मुलांनी अशाप्रकारच्या संधी शोधणे आवश्‍यक आहे. केवळ फळे-भाजीपालाच नाही, तर शेती पूरक व्यवसायातील संधी शोधणे आवश्‍यक आहे. अमरनाथ यांची गांडूळ निर्यात यामुळेच सर्वांना प्रेरणादायक उदाहरण आहे.  - गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, कृषी निर्यात कक्ष, कृषी आयुक्तालय, पुणे  

ओमानची ऑर्डर आमच्या करिता एक मोठी संधी होती. भारतापेक्षा कमी दर मिळणार असला, तरी ऑर्डर मोठी असल्याने जोखीम पत्करायची ठरविले. गांडूळनिर्मितीपासून ते ओमानच्या बंदरात ते जिवंत पोहोचविण्यापर्यंत सर्वच पातळ्यांवर मोठ्या जोखमीचे काम होते. दर्जेदार गांडूळनिर्मिती, आरोग्य प्रमाणपत्र, शास्त्रशुद्ध पॅकिंग याकडे चांगले लक्ष दिले. भारतातून यापूर्वी कोणीही गांडूळ निर्यात केले नव्हते, शेवटच्या क्षणापर्यंत गांडुळाची आणि आर्थिक जोखीम होती. देशाकरिता ही मोठी संधी होती. गांडुळाची पहिलीच निर्यात असून ती आम्ही केली, याचा आम्हाला अभिमान आहे.  - अमरनाथ अंदुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी,  नेचर ॲग्रोटेक, पुणे. संपर्क - ९५४५६४१९९१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com