ऊस, आले पिकासह जमिनीच्या विश्रांतीचे बसविले गणित

economics sugarcane and ginger crop production
economics sugarcane and ginger crop production

कोल्हापूर जिल्ह्यातील शेडशाळ (ता. शिरोळ) येथील प्रशांतकुमार महादेव गडगे यांनी ऊस शेतीसोबतच आले पिकाचे नियोजन बसवले आहे. जमिनीला विश्रांती आणि फेरपालट यातून जमिनीची सुपीकता साधली जाते. ऊस शाश्वत उत्पन्न देतो, तर आल्यातून पक्वतेनंतर गरजेनुसार टप्प्याटप्प्याने उत्पन्न मिळवता येते. शेडशाळ (ता. शिरोळ) येथे प्रशांतकुमार महादेव गडगे यांची एकत्र कुटुंबाची १४ एकर शेती आहे. त्यांचे बंधू प्रदीपकुमार हे बंगलोर येथे नोकरी करत असल्याने पूर्ण शेतीचा जबाबदारी प्रशांतकुमार यांच्याकडे आहे. कुटुंबामध्ये पत्नी, दोन मुले, आई-वडील अशा सहा व्यक्ती आहेत. शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाचे आर्थिक गणित पेलण्याचे त्यांचे नियोजन असते. भाजीपाल्याचा अनुभव

  • केवळ उसावर अवलंबून राहण्याऐवजी पूर्वी प्रशांतकुमार यांनी वांग्यासारखी पिके घेण्याचा प्रयत्न केला. या फेरपालट पिकांचे उत्पादन चांगले मिळाले. मात्र, दरवेळी दरातील चढउतारामुळे अशाश्वती अधिक वाटत असे.  
  • विशेषतः या पिकासाठी खर्च नेमका किती करावा, याविषयी निर्णय घेण्यात अडचण येते. कारण पिकासाठी अधिक खर्च करावा, आणि नेमके दर घसरल्याने उत्पन्न कमी हाती आल्यास नुकसान अधिक होणार, याची धास्ती लागलेली असे. त्या तुलनेमध्ये उसामध्ये दराची निश्चिती असते.  
  • परिणामी व्यवस्थापनासाठी खर्च करताना नफ्याचा अंदाज लक्षात घेऊन करता येतो. ही शाश्वती अन्य पिकात मिळत नाही. खोडवा गेल्यानंतर लागवडीसाठी अन्य एखाद्या पिकाचा शोध सुरूच होता. त्यातून आले पिकाचा पर्याय पुढे आला.
  • आले पिकाची लागवड

  • आले पिकाचा मार्ग फायदेशीर दिसत असला तरी शेडशाळ परिसरात हे पीक फारसे घेतले जात नाही. त्यामुळे व्यवस्थापन व अन्य बाबी जाणून घेण्यासाठी त्यांनी काही शेतकऱ्यांना भेटी दिल्या. साताऱ्याहून आल्याचे बियाणे आणून माळरानावरील जमिनीमध्ये आले लागवड केली.  
  • गेल्या दोन वर्षापासून ऊस गेल्यानंतर साधारणतः मे महिन्यात नांगरट करतात. रोटावेटरने रान भुसभुशीत केल्यानंतर गादीवाफ्यावर सुमारे दोन एकर क्षेत्रावर आल्याची लागवड करतात. एकरी एक टन बियाणे लागते. यासाठी सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचा खर्च येतो.  
  • लागवड केल्यानंतर नऊ महिन्यानंतर आल्याचे पीक काढणीस तयार होते. पीक पक्वतेनंतर गडगे सातत्याने कोल्हापूरसह अन्य शहरातील बाजारपेठेतील दराकडे लक्ष ठेवून असतात. ४० रुपये प्रति किलोपेक्षा अधिक दर मिळत असल्यास आल्याची काढणी जलद करण्याचे नियोजन असते. किमान आठ दिवस दरामध्ये फारशी घसरण होत नाही. दर चांगले असताना प्रसंगी जादा मजूर घेऊन अधिक आले बाजारपेठेत पाठवण्याचे नियोजन केले जाते.  
  • पीक पक्व झाल्यानंतर लगेच काढणी केल्यास १४ ते १५ टन उत्पादन निघते. पुढे वर्षभर ठेवल्यास २० टनांपर्यंत उत्पादन निघते. खर्च वजा जाता एकरी ४ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. ते वर्षभर मिळत असल्यामुळे ताजा पैसा उपलब्ध होतो. ही शेती फायदेशीर ठरली आहे.
  • आले पिकाचा ताळेबंद क्षेत्र २ एकर

  • उत्पादन - एकरी सरासरी १२ ते १५ टन  
  • लागवड, व्यवस्थापन खर्च - सुमारे १.६० लाख रु.
  • २०१८-१९

  • उत्पादन २८ टन  
  •  दर ६० रुपये प्रति किलो - १६.८० लाख रुपये
  • २०१९-२०

  • उत्पादन १२ टन - (६ लाख रुपये.) प्रति किलो ५० रुपये    
  • उर्वरित आले दर कमी झाल्याने शेतातच ठेवले आहे.
  • शाश्वत उत्पन्नासाठी ऊस शेती

  • दरवर्षी ४ ते ५ एकर नवीन ऊस लागवड आणि ४ ते ५ एकर खोडवा असतो. खोडवा काढल्यानंतर शेतामध्ये दोन एकर आले पीक असे नियोजन असते.  
  • दोन एकर क्षेत्राला तीन ते चार महिने विश्रांती दिली जाते. आले काढणीनंतर व विश्रांतीनंतर घेतलेल्या ऊस पिकांला त्याचा फायदा होतो. बहुतांशी ऊस आडसाली असतो. को ८६०३२, को २६५, १०,००१ या जातीचा ऊस ते घेतात. लागवडीचे उत्पादन सरासरी ६० ते ७० टन इतके आहे. खोडव्याचे उत्पादन ४० ते ५० टन इतके येते.
  • बेण्यासाठी ऊस विक्री

  • या वर्षी दीड एकरमधील ९० टन उसाच्या बेण्यासाठी विक्री झाली. त्याला प्रति टन ३००० रुपये या दराने २ लाख ७० हजार रुपये मिळाले. त्याचे पैसे रोखीने मिळतात. साधारण १२ महिन्यामध्ये पीक निघून जात असल्याने चार ते पाच महिने पुढील पिकासाठी अधिक मिळतात.  
  • उर्वरित उसाची कारखान्याला विक्री होते. कारखान्याद्वारे साधारण २८०० ते २९०० रुपये प्रति टन असा दर निघतो.
  • आपत्तीसाठी राहावे लागते तयार

  • ऊसामध्ये हवामानातील आपत्तीचा तसा फारसा परिणाम होत नाही. मात्र, या वर्षी अधिक पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे नदीकाठावरील शेतातील ऊस पाण्याखाली राहिला. परिणामी दोन एकर क्षेत्राचे नुकसान झाले. अशा आपत्तीसाठी आर्थिकदृष्ट्या तयार राहावे लागते. कारण गाळ व खराब झालेल्या पिकांचे अवशेष काढून टाकणे, पुनर्लागवड यासाठीचा खर्च वाढतो.  
  • शेतातील आपत्तीप्रमाणेच घरातील एखाद्या सदस्याचे आजारपणही खर्चिक ठरू शकते. या वर्षी वडिलांच्या आजारपणांमध्ये बंधूच्या कर्मचारी विम्यामुळे मदत झाली. त्यामुळे विम्याचे महत्त्व कळले आहे.  
  • प्रशांतकुमार यांची मुले अद्याप लहान (नर्सरी व पहिली) आहेत. मात्र, त्यांच्या शिक्षणासाठी आताच प्रति वर्ष एक लाखापर्यंत खर्च होतो. भविष्यात हा खर्च वाढत जाणार आहे. त्याचे नियोजन आतापासून करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रशांतकुमार सांगतात.
  • आर्थिक वैशिष्ट्ये

  • शाश्वत उत्पन्नासाठी ऊस पिकावर अवलंबून. यामध्ये मिळणाऱ्या दराप्रमाणे व्यवस्थापन खर्चाचे नियोजन करता येते.  
  • दर काही टप्प्याने आले पिकातून उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे दरम्यान काळातील पैशांची गरज त्यातून भागू शकते.  
  • भाजीपाला पिकांचे उत्पादन चांगले येत असले तरी दरामध्ये प्रचंड अनिश्चितता असते. परिणामी व्यवस्थापनामध्ये आर्थिक नियोजन ठरवताना अडचणी येतात.  
  • शेतजमिनीला तीन ते चार महिन्यांसाठी विश्रांती दिली जाते. केवळ पिके घेत राहिल्याने जमिनीचा पोत बिघडतो. त्याचा फटका एकूण उत्पादनामध्ये बसतो.  
  • खोडव्यानंतर आल्याचे साधारण दोन एकर क्षेत्रावर पीक, नवीन ऊस लागवड आणि जमिनीला विश्रांती यांचे गणित बसवविण्यात त्यांना यश आले आहे.
  • शेतकरी प्रतिक्रियाः

    आमचे पारंपरिक पीक ऊस असून, पिकाच्या फेरपालटीसाठी बहुतांश शेतकरी कमी कालावधीच्या भाजीपाला पिकांची निवड करतात. मात्र, मला त्यातील आर्थिक अनिश्चितता आवडत नाही. त्याऐवजी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी दर मिळू शकणाऱ्या आले पिकाची निवड केली आहे. दर कमी असल्यास हे पीक शेतात वर्षापर्यंत राहू शकते. या काळातही त्याची वाढ होत असल्याने नुकसान होत नाही. एकूण वर्षाच्या नियोजनासाठी उसातून वर्षातून एकदा उत्पन्न, तर आल्यातून टप्प्याटप्प्याने उत्पन्न उपयुक्त ठरते. - प्रशांतकुमार गडगे संपर्क-प्रशांतकुमार गडगे, (८६२५०६७०५१, ७०२०२१५४८९)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com