माझे गुरू : प्रा. रिचर्ड थॅलर

अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थॅलर
अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थॅलर

वर्तनवादी वित्त विषयातील योगदानाबद्दल प्रा. रिचर्ड थॅलर यांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचे विद्यार्थी विकास सिंग यांनी आपल्या गुरूविषयी व्यक्त केलेल्या भावना...

माझ्या ‘एमबीए’च्या शिक्षणादरम्यान प्रोफेसर रिचर्ड थॅलर यांच्याकडून शिकण्याचे भाग्य मला लाभले. २०१४ मध्ये शिकागो येथे थॅलर यांनी मला ‘बिहेव्हियरल इकॉनॉमिक्‍स’ (वर्तणुकीचे अर्थशास्त्र) आणि ‘मॅनेजरिअल डिसिजन मेकिंग’ शिकवले. मला आठवतंय की, क्‍लासची वेळ आमच्यासाठी सोयीची नव्हती. एकदा ही गोष्ट प्रा. थॅलर यांच्या कानावर गेली आणि पुढच्याच दिवशी त्यांनी आमच्या सोयीच्या वेळेत क्‍लास घेण्यास सुरवात केली.
 
ते नेहमीच आपल्या चांगल्या गोष्टींचे श्रेय आपल्या ‘टीचिंग असिस्टंट’ लीनिया गांधी यांना देत. ते म्हणत, ‘गांधींनी आम्हाला हे शिकवले, संकल्पना सहजपणे शिकवण्याकरिता त्यांनी नेहमीच कठोर मेहनत घेतली.’ प्रा. थॅलर यांचे ‘नज’ हे बेस्ट सेलर पुस्तक वाचल्यानंतर मी माझ्या पूर्वीच्या फर्ममधील सहकाऱ्यांना ते पाठवले.
 
नंतर या पुस्तकामुळे या सहकाऱ्यांना चांगले निर्णय घेण्यास कशी मदत झाली, हे मी प्रा. थॅलर यांना ई-मेल पाठवून कळविले. त्यावर ‘हे सगळे मला गांधींनीच शिकविले असे तुमच्या सहकाऱ्यांना सांगा,’ असे उत्तर त्यांनी पाठविले.  पूर्वग्रहविरहित निर्णय घेण्यास त्यांचा ‘नज’ हा ग्रंथ मदत करतो. कारण, व्यक्तीच्या वर्तणूकविषयक अर्थशास्त्राद्वारे जीवनात येणाऱ्या महत्त्वाच्या अडचणींवर मात कशी करायची, हे सोप्या शब्दांत त्यांनी त्यात विशद केले आहे. ]
 
अर्थशास्त्रातील एका वर्तनात्मक पद्धतीला त्यांनी ‘एन्डोमेंट इफेक्‍ट’ असे नाव दिले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, आपल्या मालकीची एखादी वस्तू आपण इतरांना देण्यास सहजासहजी उत्सुक नसतो.  समजा आपल्याकडे एक कप आहे आणि त्याच्या बदल्यात आपल्याला कोणी पेन देत असेल, तर ते आपल्याला मान्य होणार नाही. कारण आपल्या वस्तूचे मूल्य आपल्याला अधिक असते. त्यामुळे एखाद्या वस्तूच्या बदल्यात आपली वस्तू देण्यास आपण उत्सुक नसतो. थोडक्‍यात, एखादी वस्तू आपल्याकडे नसताना नंतर ती आपल्याकडे आल्यानंतर त्या वस्तूचे मोल जास्त का वाटते याचा उलगडा त्यांनी ‘एन्डोमेंट इफेक्‍ट’मध्ये केला आहे.
 
थॅलर यांनी अर्थशास्त्रातील निर्णयप्रक्रियेच्या विश्‍लेषणाद्वारे मानसशास्त्रीय वास्तववादी कल्पनांचे गृहितक मांडले आहे. जेणेकरून लोकांशी कसे वागावे, याबद्दल तर्कसंगत निर्णय घेण्यास मदत होते. 
मला त्यांनी शिकवलेला दुसरा आवडता विषय म्हणजे ‘पूर्वग्रह’. पूर्वग्रह आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मर्यादा आणतात. आपल्या कृतीचे समर्थन करणारा आणि इतरांची मते विचारात न घेणारा फाजील आत्मविश्वासाला बळी पडतो. मात्र आत्मविश्वास बाळगणारी व्यक्ती कठीण प्रसंगातून सहज मार्ग काढते.
 
डॉ. थॅलर यांनी व्यक्तींमधील आर्थिक आणि मानसशास्त्रीय घडामोडी यांच्यातील संबंधांबाबत काम केले आहे. त्यामुळे समाज आणि सार्वजनिक धोरणात सुधारणा होण्यास मदत झाली आहे. माझ्या मते, या क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे अर्थशास्त्राच्या विस्ताराला हातभार लागला असून, सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने अर्थशास्त्र हा विषय अधिक सोपा झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com