सत्ताधाऱ्यांकडूनच ‘ईडी’चा ससेमिरा

सत्ताधाऱ्यांकडूनच ‘ईडी’चा ससेमिरा
सत्ताधाऱ्यांकडूनच ‘ईडी’चा ससेमिरा

मुंबई ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामागे सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) ससेमिरा लावत सत्ताधाऱ्यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत विरोधकांच्या पायात चौकशीच्या बेड्या टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, अशा चौकशीमुळे मतदारांची सहानुभूती विरोधकांना मिळण्याची शक्यता आहे.

राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात ईडीने मंगळवारी गुन्हा दाखल केला. पवार यांच्या सारख्या राज्यातील जुन्याजाणत्या नेत्यावर गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटातच नव्हे तर अन्य पक्षातही खळबळ माजली आहे. पवार कधीही राज्य बँकेवर संचालक म्हणून कार्यरत नव्हते. तरीही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती रोखण्यासाठी पवार गेल्या आठवड्यापासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सभांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. साताऱ्यात पवारांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दौऱ्याच्या निमित्ताने पवार राष्ट्रवादीच्या बाजूने वातावरण निर्मितीचा प्रयत्न करत असताना त्यांच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केला. चौकशीच्या निमित्ताने पवारांना अडकून ठेवण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहे. गुन्हा दाखल होऊन २४ तास उलटण्याच्या आत पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ईडीच्या चौकशीचे आव्हान स्वीकारले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ईडीचा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत.

याआधी ईडीने राज ठाकरे यांचीही चौकशी केली. ‘आयएल अॅण्ड एफसी’ कंपनीकडून कोहिनूर सीटीएनएल कंपनीने घेतलेल्या कर्जप्रकरणात राज यांची दिवसभर चौकशी करण्यात आली. ही चौकशी झाल्यापासून राज कमालीचे शांत झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात प्रचाराची राळ उडवली होती. परंतु, निवडणुकीनंतर लगेच राज यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावण्यात आले. विधानसभेची निवडणूक घोषित होऊन आज पाच दिवस उलटले तरी राज यांनी निवडणुकीबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ईडीचा दबाव टाकून विरोधकांना गप्प करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आराेप विरोधक सातत्याने करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com