पवारांसह ७० नेते ‘ईडी’च्या रडारवर; राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहार प्रकरण

पवारांसह ७० नेते ‘ईडी’च्या रडारवर; राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहार प्रकरण
पवारांसह ७० नेते ‘ईडी’च्या रडारवर; राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहार प्रकरण

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या कर्जवाटपातील गैरव्यवहाराचे प्रकरण सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ताब्यात घेतले असून ‘मनी लाँडरिंग’ प्रतिबंधक कायद्याखाली या प्रकरणाची नोंद केली आहे. या प्रकरणी मुंबईत दाखल झालेल्या गुन्ह्यात अजित पवार, आनंदराव आडसूळ आदी ७० नेत्यांचा समावेश आहे.  ‘ईडी’कडील अनुषंगिक कागदपत्रांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव असल्याने हे सर्व नेते ‘ईडी’च्या रडारवर अाले आहेत. या बँकेचा मी सभासदही नाही, असे स्पष्टीकरण देतानाच पवार यांनी आपल्या सभांना मिळत असलेल्या प्रतिसादाचा हा परिणाम असल्याचा टोला लगावला.    ‘ईडी’च्या अधिकृत प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत या प्रकरणी अजित पवार यांच्यासह ७० जणांवर गुन्हा दाखल झाला होता. हेच प्रकरण ‘ईडी’ने ताब्यात घेतले आहे. यातील संशयित आरोपींच्या यादीत शरद पवार यांचे नाव नाही. मात्र, अनुषंगिक दस्तावेजांमध्ये त्यांचे नाव आहे. पवार ‘ईडी’च्या रडारवर आल्याच्या वृत्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात ऐन निवडणुकीच्या काळात खळबळ माजली आहे.  तांत्रिकदृष्ट्या हे प्रकरण ताब्यात घेताना ‘ईडी’तर्फे संबंधित एफआयआरचाच आधार घेतला जातो. त्यामुळे आज हे प्रकरण ताब्यात घेऊन ‘मनी लाँडरिंग’ प्रतिबंधक कायद्याखाली नोंद करताना मुंबई पोलिसांचा एफआयआर व त्याबाबतची पुष्टी करणारी कागदपत्रेच आधारभूत धरण्यात आली आहेत. या कागदपत्रांनुसार सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा हा आर्थिक गैरव्यवहार असल्याचा उल्लेख आहे. कारखाने व सूतगिरण्यांना कर्जे देताना कोणतेही तारण घेण्यात आले नव्हते, असा संदर्भही यात देण्यात आला आहे. यामध्ये संगनमताने बॅंकेच्या निधीचा गैरव्यवहार आणि बॅंकेला अपरिमित आर्थिक नुकसान करण्यात आल्याचेही या टिपणात म्हटलेले आहे. थेट उल्लेख नाही ‘ईडी’ने हे प्रकरण दाखल करताना शरद पवार यांच्या नावाचा त्यात समावेश केला आहे किंवा नाही, याबाबत उलटसुलट माहिती दिली जात होती. परंतु, यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पवार यांच्या नावाचा थेट उल्लेख त्यात नाही. पण, ‘एफआयआर’ दाखल करताना त्यातील माहितीच्या पुष्टीसाठीची काही कागदपत्रे व दस्तावेज जोडले जातात आणि त्यात शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचा उल्लेख असल्याने या प्रकरणाची नोंद करताना त्यांच्या नावाचाही समावेश असल्याची माहिती प्रसारित केली गेली. शरद पवार यांच्या बरोबर दिलीप देशमुख, ईश्‍वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील आदींच्या नावाचाही समावेश या टिपणात आहे.  तुरुंगात जाण्यास तयार : शरद पवार मी ज्या बॅंकेचा कधीही संचालक अथवा सभासदही नव्हतो, त्या बॅंकेतून एक पैसाही कधी काढला नाही. त्या बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. राज्य सहकारी बॅंकेच्या कोणत्याही व्यवहाराशी माझा कधी संबंध आला नाही, मी कधीही कोणत्याही सहकारी बॅंकेचा संचालक नव्हतो, असेही पवार यांनी सांगितले. राज्यभरातील माझ्या दौऱ्यादरम्यान मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून माझ्यावर कारवाई झाली नसती, तरच मला आश्‍चर्य वाटले असते, असे ते म्हणाले. चिदंबरम यांच्याप्रमाणेच तुमच्यावर कारवाई होणार का, असे विचारले असता, चुकीच्या आरोपांखाली मला तुरुंगात टाकायचेच असेल तर त्यास माझी तयारी आहे. अशी कारवाई करणाऱ्यांना मी धन्यवाद देतो, असा टोमणाही पवार यांनी मारला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com