agriculture news in marathi, Editorial on future cotton rate | Agrowon

कशी टिकेल पांढऱ्या सोन्याची झळाळी?

विजय सुकळकर
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

देशांतर्गत बाजारापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे दर कमी असले की आयात करायची, तसेच अधिक असल्यास निर्यात होऊ द्यायची नाही, असा खेळ कापड उद्योजक नेहमीच खेळत असतात.
 

राज्यात कापूस वेचणीला सुरवात होऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर बऱ्याच शेतकऱ्यांनी विक्रीही चालू केली आहे. मात्र, सीसीआयची कापूस खरेदी अजूनही सुरू झालेली नाही. आवक कमी असल्यामुळे सध्याचे दर प्रतिक्विंटल ५६०० ते ६००० रुपये म्हणजे हमीभावापेक्षा (५४५० रुपये) अधिक आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील जिरायती कापूस कमी पावसामुळे जवळपास उध्वस्त झाल्यात जमा आहे. परतीच्या पावसाच्या आशाही मावळल्याने कापसाच्या स्थितीत काही सुधारणा होईल, याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या मुख्य कापसाच्या हंगामातही आवक कमीच राहून दर टिकून राहतील अथवा ते थोडेफार वधारतीलही, असे जाणकारांचे मत आहे.

कापसाचे दर हमीभावापेक्षा अधिक राहण्यासाठी सीसीआयची खरेदी शक्‍य तेवढ्या लवकर सुरू व्हायला पाहिजे. याकरिता दर आणि इतर अटीशर्तीसाठी सीसीआय आणि जिनींग प्रेसिंग यांच्यात सुरू असलेले मतभेद लवकर दूर व्हावेत. मागील हंगामात राज्यात ऑक्‍टोबर-नोव्हेंबरनंतर गुलाबी बोंड अळीचा उद्रेक होऊन कापसाच्या उत्पादकतेत मोठी घट झाली होती. या वर्षी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव फारसा पुढे आलेला नाही. कापसाची पहिली, दुसरी वेचणी झाली की लाल्या विकृतीही बळावते. लाल्या विकृतीचा प्रादुर्भाव झाला, की कापूस लाल पिवळा पडून वाळू लागतो. गुलाबी बोंडअळी आणि लाल्या विकृती कापूस पिकात येऊ नये म्हणूनही शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला हवी. 

देशात या वर्षी ३५० लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने ३६५ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. देशाची एकूण कापसाची गरज ३३० लाख कापूस गाठीची आहे. अर्थात, उत्पादन आणि गरजेत जवळपास २० ते ३५ लाख गाठीचा फरक आहे. जागतिक कापूस उत्पादन, जागतिक बाजारपेठेतील कापसाचे दर, कापसाची होणारी आयात-निर्यात यावरही भारतातील कापसाचे दर अवलंबून असतात. कापूस उत्पादक प्रमुख देशांत वाढलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे जागतिक कापूस उत्पादनही घटण्याचा अंदाज आहे. सध्याचे जागतिक बाजारातील कापसाचे दर देशांतर्गत बाजारातील दरापेक्षा अधिक आहेत. अशा परिस्थितीमध्ये अतिरिक्त कापसाची निर्यात व्हायला पाहिजे. देशांतर्गत बाजारापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे दर कमी असले की आयात करायची, तसेच अधिक असल्यास निर्यात होऊ द्यायची नाही, असा खेळ कापड उद्योजक नेहमीच खेळत असतात.

कापड उद्योजकांची लॉबी सरकारवर दबाव आणून आपला डाव साधूनही घेतात. यात त्यांचा फायदा असला, तरी कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान आहे. अशा दबावाला शासनाने बळी पडू नये. देशात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र महाराष्ट्रात आहे. परंतु, राज्याची कापूस उत्पादकताही सर्वांत कमी आहे. राज्यातील बहुतांश कापसावर दक्षिण भारतात प्रक्रिया होते आणि याच कारणांमुळे कापूस उत्पादकांची आर्थिक स्थिती अधिकाधिक हलाखीची होत आहे. राज्यातील कापूस उत्पादकांना चांगले दिवस आणायचे असतील, तर राज्यातच कापूस ते कापड प्रक्रिया व्हायला पाहिजे. याबाबतच्या गप्पा राजकीय पातळीवर अनेक वेळा रंगल्या, परंतु आत्तापर्यंतच्या कोणत्याही सरकारने याबाबत ठोस पावले उचलली नाहीत, हे वास्तव नाकारता येणार नाही.


इतर संपादकीय
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...
दर्जानुसारच हवा दरराज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक...
उपयुक्त मधुमक्षिकापालन दुर्लक्षितच! मधमाशी हा निसर्गाने निर्माण केलेला अत्यंत हुशार,...
दुष्काळ हटविण्याचा ‘जंगल मार्ग’ मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत कायम दुष्काळ असतो....
कृत्रिम रेतन हवे नियंत्रितचकृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या...
श्रमसधन उद्योग उभारणीवर हवा भरआजच्या घडीला सरकार कृषी संशोधन आणि विकास...
माणुसकीलाच काळिमापशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची...
वणवा पेटतोयअखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे तिसरे...
कार्यक्षम खत व्यवस्थापनेतून साधूया...हरितक्रांतीच्या यशात अधिक उत्पादनक्षम गहू बियाणे...
घरात असावे एकमत‘शेतात खत, गावात पत अन् घरात एकमत असावे’ अशी एक...
काटेरी राजमुकुटमहाराष्ट्रात अवघ्या चार-सहा दिवसांत झालेल्या...
गोसमृद्धीची अग्निपरीक्षा तीन दिवस पुणे ‘गो'' रंगात सजणार आहे. गाय आणि...
योजना माझ्या हातीकृषी विभागाच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत...
दारिद्र्यनिर्मूलनासाठी हवा ठोस कार्यक्रमआज रोजी देशातील कोट्यधीशांची संख्या वाढत असताना...
आमदार बंधूभगिनींनो पत्रास कारण की...आमदार बंधूभगिनींनो नमस्कार,  आजघडीला...
अखेर फासे उलटलेच!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी...
गोवंशहत्याबंदी अव्यवहार्यच!महाराष्ट्र या (तथाकथित) पुरोगामी राज्यात...
फसवणूक थांबणार कधी?नाशिक जिल्ह्यात दोन व्यापाऱ्यांनी ४० टोमॅटो...
पाहणी-पंचनाम्यांचा फार्सराज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी...