नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा रब्बीवर परिणाम

नांदेड: खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.
Effect of cloudy weather on rabbi in Nanded district
Effect of cloudy weather on rabbi in Nanded district

नांदेड : खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. यंदा सुरवातीपासूनच थंडी कमी - अधिक होत आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. 

जिल्ह्यात दरवर्षी दोन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. सिंचनाची सोय असलेल्या भागात तसेच जमिनीतील ओलाव्यावर पिके घेतली जातात. रब्बीच्या काळात नैसर्गिक आपत्तीची शक्यता खरिपाच्या तुलनेत कमी असते. यामुळे शेतकऱ्यांना रब्बीतील उत्पादनाची खात्री असते. परंतु, यंदा म्हणावी तशी थंडी पडली नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. यानंतर मात्र ढगाळ वातावरण तयार झाल्याने तापमानाचा पारा २१ अंश सेल्सिअसपर्यंत वर गेला. 

जिल्हा तेलंगणा सीमेलगत आहे. त्यामुळे दक्षीण भारतात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्याला जाणवतो. अशावेळी राज्याच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत नांदेडमध्ये पावसाचे सावट असते. सोमवारी (ता. ३०) जिल्ह्याचे कमाल तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. आगामी काही दिवसही ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला. यामुळे हरभरा, गहू, करडी, रब्बी ज्वारी या पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याचे जाणवत  आहे.

एक लाख हेक्टरवर पेरणी 

जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख हेक्टरवर रब्बी पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक हरभरा आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र एक लाख ३६ हजार हेक्टर आहे. यात मागील काही काळात वाढ होत आहे. धरणातील पाणीसाठा तसेच जिल्ह्यालगत असलेल्या येलदरी, सिद्धेश्वर व इसापूर प्रकल्पातील पाणी पाळ्या मिळत आहेत. त्यामुळे पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे. 

तीन लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज

मागील वर्षी जिल्ह्यात दोन लाख ७५ हजार ६४६ हेक्टरवर पेरणी झाली होती. यात सार्वधिक एक लाख ९० हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली. तर, ४० हजार हेक्टरवर गहू व ३४ हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली. यंदा यात कृषी विभागाकडून वाढ व्यक्त केली आहे. जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात तीन लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com