सूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य ः फेलिक्‍स रिंडर्स

सूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य ः फेलिक्‍स रिंडर्स
सूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य ः फेलिक्‍स रिंडर्स

औरंगाबाद : सूक्ष्म सिंचनाची समज व गरज, त्यामधील नवतंत्रज्ञान, होत असलेल्या संशोधनाची जाणीव याचा संयोग करून सूक्ष्म सिंचन प्रणालीचा परिणामकारक वापर करणे शक्‍य असल्याचे मत आयसीआयडीचे अध्यक्ष, दक्षिण आफ्रिकेतील अभियंते फेलिक्‍स रिंडर्स यांनी येथे व्यक्त केले. 

जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे मंगळवारी (ता. १५) शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्‍घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानावरून श्री. रिंडर्स बोलत होते. या प्रसंगी मध्य प्रदेशातील युवा महिला शेतकरी सुषमा सिंह, यवतमाळ जिल्ह्यातील विडूळच्या शेतकरी शांताबाई इंगळे, नगर जिल्ह्यातील कोपरगावचे शेतकरी प्रभाकर भाकरे यांच्या हस्ते तसेच आयसीआयडीचे अध्यक्ष इंजी. फेलिक्‍स रिंडर्स, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी, वाल्मीचे प्रमुख तथा कार्यशाळा आयोजन समितीचे प्रमुख दीपक सिंगला, एमओडब्ल्यूआर नवी दिल्लीचे संचालक गिरिराज गोयल यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन झाले.

श्री. रिंडर्स म्हणाले, ‘‘पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यावर शेतकऱ्यांचा भर असावा. त्यासाठी सूक्ष्म सिंचन महत्त्वाचा पर्याय आहे. सूक्ष्म सिंचनाची सुरवात दक्षिण आफ्रिकेतून झाली. जगाचा विचार करता २० टक्‍के जमिनीवर ४० टक्‍के जागतीक अन्नपुरवठ्याची जबाबदारी आहे. त्यामुळे सूक्ष्म सिंचनाचे अन्न सुरक्षेतील स्थान अनन्यसाधारण आहे. १९७० पासून सातत्याने शेती क्षेत्र घटते आहे. १९५० ते २०१५ या कालखंडाचा विचार करता पहिल्या काही वर्षात सिंचनाचे क्षेत्र वाढल्याचे मात्र २००० नंतर त्यामध्ये अपेक्षित वाढ झाली नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. शुष्क देश म्हणून ओळख असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सूक्ष्म सिंचनाचा कार्यक्षम वापर व शेतकऱ्यांचा पुढाकार यामधून शेती यशस्वी केली आहे. दक्षिण आफ्रिकेतील शेतकऱ्यांची सूक्ष्म सिंचनाच्या विविध प्रकारांत मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे जवळपास १५ लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत झाली आहे. सूक्ष्म सिंचनाच्या कार्यक्षम वापरासाठी जमिनीचा मगदूर त्यानुसार पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.’’ दक्षिण आफ्रिकेतील ग्रीनड्रम तंत्रज्ञान, ऊस लागवड, सूक्ष्म सिंचनाच्या वापरातील खबरदाऱ्यांविषयी श्री. रिंडर्स यांनी माहिती दिली. श्री. गोयल म्हणाले, ‘‘वापरायला मिळणाऱ्या पाण्यापैकी ८० ते ९० टक्‍के शेतीसाठी उपयोगात आणले जाते. त्यामुळे पुढील काळात कमीत कमी जलामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याशिवाय पर्याय नाही. सूक्ष्म सिंचनात महाराष्ट्राची आघाडी आहे. राज्यातील कडवंचीचे जलव्यवस्थापनाचे मॉडेल इतरत्र विस्तारायला हवे. शासन धोरणात्मक व योजनात्मक निर्णय घेते परंतू ते शेवटच्या घटकापर्यंत पोचत नाही. त्याला पायाभूत सुविधांचा अभाव तोकडी यंत्रणा कारणीभूत आहे. स्वयंसेवी संस्थांना सोबत घेवून तंत्रज्ञानातील शोध शेतीला आधुनिक करण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत पोचावे लागतील. अलीकडच्या चार वर्षात देशाने सूक्ष्म सिंचनातून सिंचन क्षेत्र वाढीत केलेली प्रगती प्रशंसनीय आहे. 

प्रास्ताविकातून वाल्मीचे महासंचालक दीपक सिंगला यांनी कार्यशाळा आयोजनामागील भूमिका विषद केली. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी अशा कार्यशाळा शेतकऱ्यांच्या तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष वापराविषयी माहिती देण्यास सहायक ठरतील, असा आशावाद व्यक्‍त केला. आभार विद्या पुरंदरे यांनी मानले. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, हरीयाना, झारखंड आदी राज्यातील जवळपास १७८ शेतकरी सहभागी झाले होते. 

शंभरावर शेतकरी होणार आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी  वाल्मीमधील कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांपैकी जवळपास शंभर शेतकरी १६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com