जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच गुढी

अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज पाणीवापर संस्थेने जलतंत्रज्ञानाचा वापर करून शेती व जलसिंचन व्यवस्थापन क्षेत्रात उत्तम कार्य साधले आहे. परिणामी संस्थेच्या सर्व सभासदांना पुरेसे व वेळेवर पाणी उपलब्ध होऊन त्यांची जिरायती शेती बारमाही बागायती झाली आहे.
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच गुढी
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच गुढी

अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज पाणीवापर संस्थेने जलतंत्रज्ञानाचा वापर करून शेती व जलसिंचन व्यवस्थापन क्षेत्रात उत्तम कार्य साधले आहे. परिणामी संस्थेच्या सर्व सभासदांना पुरेसे व वेळेवर पाणी उपलब्ध होऊन त्यांची जिरायती शेती बारमाही बागायती झाली आहे. अ न्वी- मिर्झापूर (ता. जि. अकोला) येथील केशवराज पाणीवापर संस्थेने पाणी व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपली ओळख तयार केली आहे. संस्थेची स्थापना ३१ जानेवारी, २००१ रोजी झाली. जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या २००५ च्या नव्या कायद्यानुसार पाच एप्रिल, २००५ रोजी नोंदणी झाली. संस्थेकडे २००२-२००३ पासून काटेपूर्णा प्रकल्प कालव्यातील पाणी व्यवस्थापन व सिंचन करण्यासाठी कार्यभार आला, तेव्हापासून आजतागायत संस्था उत्तम प्रकारे सभासदांना कालव्याच्या पाण्याचा ओलितासाठी पुरवठा करीत आहे. संस्थेचे २१० शेतकरी सभासद आहेत. पैकी ४० सभासद दुसऱ्यांची शेती कराराने करणारे आहेत. संस्थेला ४५० एकरांपेक्षा अधिक शेतीवर सिंचनासाठी कार्यक्षेत्र आहे. संस्था दरवर्षी यापेक्षा सव्वा ते दीडपट क्षेत्रावर सिंचनाचे काम अधिक करीत असते. जलतंत्रज्ञानाचा वापर 

  • जलतंत्रज्ञानाचा वापर करून संस्थेने जलसंधारण कामे पूर्ण केली. संस्थेच्या कार्यक्षेत्रात एलाई व खारा नाला नाले येतात. दोन्हींमध्ये दरवर्षी सिमेंटच्या पोत्यात काळी माती भरून ८ ते १० ठिकाणी बांध बांधतात. 
  • काळाची गरज ओळखून संस्थेने लोकसहभागातून नाल्यांचे खोलीकरण केले. 
  • जवळपास दोन किलोमीटर अंतराच्या नाल्यांमध्ये दरवर्षी लाखो लिटर पाणी साठते, त्यामुळे पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. 
  • नाल्यांच्या शेजारी शेतकऱ्यांनी विहिरी खोदल्या, बोअरवेल्स तयार केले. याद्वारे सिंचन सुरू केले. 
  • शेतकऱ्यांनी सिंचनाची आपली गरज पूर्ण केल्यानंतर शिल्लक पाणी इतरांना दिले. या समन्वयातून सिंचनवाढीस हातभार लागला.
  • २००२-०३ पासून हे कार्य सुरू आहे. त्यातून १५० एकरांत बारमाही शेती ओलिताखाली आली आहे. 
  • कामांची दखल घेत जागतिक बँकेमार्फत ३० लाखांचे अर्थसाहाय्य मिळाले. त्यातून संस्थेच्या हद्दीतील कालव्याचे एक किलोमीटरपर्यंत सिमेंट- काँक्रिटचे काम, दोन्ही बाजूंनी रस्ता व नाला खोलीकरण अशी कामे झाली. कामांची पाहणीसाठी जानेवारी २०१३ मध्ये जागतिक बँकेच्या चमूने या ठिकाणी भेट दिली.
  • वीजजोडणी यशस्वी 

  • सुमारे ८० सभासदांना कृषिपंपच्या वीजपुरवठ्यासाठी संस्थेने पाच वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. या भागात १२ वीज रोहित्रे मिळविले. यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी प्रयत्न केले. चार वर्षांत ८०, तर यंदा २० जोडण्या करण्यात आल्या. आणखी १० शेतकऱ्यांचे अर्ज वीज कंपनीकडे दिल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान सचिव एस. टी. नायडेकर यांनी सांगितले.
  • तंत्र आत्मसात केले 

  • आम्ही अभ्यासदौरे करतो. यातून सभासद पश्‍चिम महाराष्ट्रातील फळबागा, भाजीपाला उत्पादनाचे तंत्र शिकले. त्यामुळे शिवारात पेरू, संत्रा, मोसंबी, आंब्याच्या बागा उभ्या रहात आहेत. वर्षभर भाजीपाला पिकतो. पाण्याचा योग्य वापर होण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर वाढला. कालव्याद्वारे नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत पाणी उपलब्ध होते. उर्वरित काळात विहीर, कूपनलिकेद्वारे सिंचन असते. जलक्रांती झाल्याने गावशिवार हिरवेगार बनण्यास मोठा हातभार लागल्याचे नायडेकर म्हणाले.
  • 'अ' वर्गात ऑडिट 

  • संस्थेने आर्थिक व्यवहार चोख सांभाळले आहेत. दरवर्षी संस्थेच्या व्यवहारांचे ऑडिट करण्यात येते. २००५ पासून संस्थेला सातत्याने 'अ' वर्गातील ऑडिट दर्जा मिळाला आहे. संस्थेला काटेपूर्णा प्रकल्पाच्या दहीगाव मायनर कालव्यातून ओलितासाठी पाणी मिळते. यावर संस्थेचे सभासद प्रामुख्याने रब्बीत हरभरा, गहू, मका, भाजीपाला पिकवतात. तूर, कापूस पिकालाही अंतिम टप्प्यात पाण्याच्या पाळ्या दिल्या जातात. संस्थेने सातत्याने शेतकरीहिताचा विचार करून पाणीवाटपाचे नियोजन केले. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर पिकांसाठी केला जात असल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. या भागातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने अनेकांना खरिपातच पिके घेणे शक्य व्हायचे. आता रब्बी हंगाम साधला जात आहे. एकरी १० क्विंटल येणारा गहू आता १८ ते २० क्विंटलदरम्यान येत आहे.
  • पाणी वितरणात शेवटच्याला प्राधान्य 

  • जलसिंचन वितरण पद्धतीत बदल करून त्यातील उणिवा दूर करण्यात आल्या. प्रथम शेवटचे, नंतर मध्यातील व सर्वांत शेवटी पहिल्या गेटच्या शेतकऱ्यांना पाणी दिले जाते. या उलट क्रमामुळे शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाण्याचा वेग कायम राहून पाणी पुरेसे मिळत असल्याने पिकांचे नुकसान टळले आहे. 
  • संस्थेची उल्लेखनीय कामे 

  • सन २००२-०३ पासून वसूल केलेली पाणीपट्टीची रक्कम शासनाच्या खात्यात जमा केली.
  • व्यवस्थापक पंच कमिटीच्या नियमित बैठका. 
  • संस्थेने स्वतःकडील दोन लाख रुपये रक्कम, शासनाची दोन लाख ५५ हजार आणि २०१३-१४ मध्ये मिळालेल्या पुरस्काराची तीन लाख रुपये रक्कम एकत्र करीत इमारत उभारली.
  • संस्थेने सुरुवातीपासून नफ्याचे सूत्र सांभाळले आहे. अलीकडील वर्षांपासून तीन लाखांपासून ते दोन व एक लाखापर्यंत नफा संस्थेच्या खात्यात जमा झाला आहे.   
  • वृक्षारोपण व संवर्धन 
  • संस्थेकडून बोरगाव वितरिका तसेच दहीगाव मायनर या कार्यक्षेत्रात तब्बल दोन हजार वृक्षांचे रोपण.
  • सन २०१९ मध्ये पुन्हा दीड हजार वृक्षांचे रोपण. यांत आवळा, बेल, जांभूळ, बांबू, कडुनिंब, उंबर, रामफळ, पिंपळ, वड, बोर, सुबाभूळ आदींचा समावेश.   
  • पुरस्कारांनी सन्मान 
  • महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्याअंतर्गत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पाणीवापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार. 
  • लोकसहभागातून उपलब्ध पाण्याचा सुयोग्य, नियंत्रित व काटकसरीने वापर करीत उत्पादन व उत्पन्न वाढविण्यासाठी सातत्याने केलेल्या कामगिरीसाठी अमरावती विभागातून संस्थेची निवड. 
  • विभाग स्तरावर तीन लाख रुपयांचा पुरस्कार देऊन २०१४ मध्ये गौरव.
  • प्रतिक्रिया... पाणी बहुमूल्य असल्याने त्याचा योग्य वापर करीत आहोत. कालव्यांची सातत्याने निगा ठेवली जाते. सिंचन सुविधा मिळाल्याने रब्बीत १०० टक्के क्षेत्र लागवडीखाली आले आहे. संस्थेच्या पुढाकाराने दोन किलोमीटरपर्यंत शेतरस्त्याचेही काम झाले. - एस. टी. नायडेकर, संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान सचिव, मोबाईल संपर्क  - ९६५७३६०१७६ माझी २४ एकर शेती आहे. संस्थेच्या पुढाकाराने कालवा स्वच्छता ठेवली जाते. आम्ही पाणी वितरणात शेवटच्या टोकावरील शेतकरी असूनही पुरेसे पाणी मिळते. प्रकल्पात पाणी असले, की रब्बीत गहू, हरभऱ्याचे दरवर्षी उत्पादन घेतो.   - गजानन भीमराव नांदूरकर, दहिगाव गावंडे, ता. जि. अकोला

    चार एकर शेती कसतो. दरवर्षी रब्बीत गहू, हरभरा घेतो. गव्हाचे एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादन मिळते. दुसरा हंगाम घेता येत असल्याने शेतीतील उत्पन्न वाढले आहे. - गणेश वसू, अन्वी मिर्झापूर

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com