कापूस गाठींच्या साठ्यासाठी होतोय आटापिटा

कापूस दरवाढ पुढे अपेक्षित आहे. सध्या न्यूयॉर्क वायदा फ्युचर बाजारात थोडी सुधारणा कापसासंबंधी दिसत आहे. आयातीबाबतचा कल मोठ्या उद्योगांमध्ये सध्या दिसत नाही. कारण डॉलर मजबूत होत आहे. - अरविंद जैन, माजी अध्यक्ष,खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशन, जळगाव
कापूस गाठी
कापूस गाठी

जळगाव ः गुलाबी बोंड अळीने कापूस उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळविले, तशी भीती कापूस उद्योगातही वाढली असून, पुढील हंगामाची चिंता निर्यातदार, खरेदीदार व उद्योगात सुरू झाली आहे. कापूस गाठींचा साठा (कॅरी फॉरवर्ड) करून घेण्याचा आटापिटा सुरू असून आंतरराष्ट्रीय कापूस बाजार मागील दोन दिवसांत तीन टक्के वधारला आहे. यातच येणाऱ्या एप्रिल महिन्यात कापूस दरामध्ये वाढ होईल, असा अंदाज बाजारपेठ विश्‍लेषकांनी व्यक्त केला आहे.  आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात महत्त्वाच्या असलेल्या न्यूयॉर्क वायदा या फ्युचर मार्केटसंबंधीच्या संकेतस्थळावर बाजार तीन दिवसांत 75 सेंटवरून 78 सेंटवर पोचला आहे. कापसाची आवक कमी झाली असून, डॉलरही रुपयाच्या तुलनेत मजबूत होत असल्याने कापूस आयातीला काहीसा ब्रेक लागला आहे. अर्थातच अमेरिका व ऑस्ट्रेलियाची खंडी (356 किलो रुई) भारतीय खरेदीदारांना 45 हजारांत पडू लागली आहे. आपला कापूस दर्जेदार असल्याने परदेशातील निर्यातदार सौद्यांमध्ये कुठलीही तडजोड करायला तयार नाहीत. मोठ्या कापड उद्योगांनी परदेशातून आयातीचा लावलेला धडाका थांबविला आहे. भारतीय रुईची खंडी देशांतर्गत उद्योगांना 40 हजार रुपयांत मिळत आहे. एक डॉलर महिनाभरापूर्वी 63 रुपयांपर्यंत होता. आजघडीला डॉलरची किंमत 65 रुपये दोन पैशांपर्यंत गेली आहे. परिणामी रुईची आयात आणखी महाग झाल्याची माहिती मिळाली.  देशातील कापूस प्रक्रिया उद्योगाला दरवर्षी 315 लाख गाठी कापसाची किमान गरज असते. यातील कमाल गरज ही देशांतर्गत कापसाद्वारे भागविली जाते. काही प्रमाणातच आयात होते. गाठींची गरज भागविण्यासाठी पुढे ओढाताण होऊ शकते, असे संकेतही मिळत आहेत.  साठवणुकीला सुरवात देशात गुलाबी बोंड अळीवर कोणताही ठोस   उपाय शासकीय यंत्रणा व इतर संस्थांना अद्याप सापडलेला नाही. प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये म्हणजेच महाराष्ट्र, तेलंगण, सीमांध्र, कर्नाटकात कापूस उत्पादक संभ्रमात असून, ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे व ज्यांना खरिपासह रब्बीत मिळून दोन, तीन पिके घेणे शक्‍य आहे, ते शेतकरी कापसाची लागवड टाळतील, असे कापूस निर्यातदार, जिनर्स, व्यापारी यांनी गृहीत धरले असून, कापूस उत्पादन पुढील हंगामात मोठ्या प्रमाणात घटेल म्हणून आतापासून गाठींची साठवणूक (कॅरी फॉरवर्ड) सुरू झाली आहे. देशात यंदा 40 लाख गाठी शिल्लक राहतील, असा अंदाज होता. परंतु गुलाबी  बोंड अळीने सर्व भाकितांवर, नियोजनावर पाणी फिरविले आहे. कॅरी फॉरवर्डसंदर्भात अंतिम भाकीत येत्या बुधवारी (ता. 28) मुंबईत होणाऱ्या कॉटन असोसिएशनच्या राष्ट्रीय बैठकीत केले जाणार आहे. यानंतर कापूस बाजाराची दिशा आणखी स्पष्ट होईल, असे या असोसिएशनचे सदस्य अनिल सोमाणी म्हणाले.  प्रतिक्रिया एप्रिलमध्ये कापसाची आवक आणखी कमी होईल. पुढे काहीशी दरवाढ अपेक्षित आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजार अनिश्‍चितच आहे. कापसाची गरज आयातीवर अवलंबून भागविणे शक्‍य नाही. आयात आता मोठ्या उद्योगांना महाग पडू लागली आहे. पुढील हंगामासाठी निर्यातदार, जिनर्स, व्यापारी यांना गाठींची गरज आहे. ४० लाख गाठी शिल्लक राहतील, असा अंदाज होता.  - अनिल सोमाणी,  सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com