आठ राज्यांना हमीभावाने खरेदीची मान्यता; महाराष्ट्रात कधी?
आठ राज्यांना हमीभावाने खरेदीची मान्यता; महाराष्ट्रात कधी?

आठ राज्यांना हमीभावाने खरेदीची मान्यता; महाराष्ट्रात कधी?

देशातील आठ राज्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवून परवानगी मिळवून खरेदीही सुरू केली. मात्र महाराष्ट्रात अद्याप खरेदी केंद्र सुरू का नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित करत तत्काळ केंद्रेसुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पुणे : राज्यातील कडधान्य उत्पादक पट्ट्यांत तब्बल १० ते १५ दिवसांपर्यंत पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या मिळेल त्या दराला मूग आणि उडीद विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. देशातील आठ राज्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवून परवानगी मिळवून खरेदीही सुरू केली. मात्र महाराष्ट्रात अद्याप खरेदी केंद्र सुरू का नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित करत तत्काळ केंद्रे सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हंगाम २०२१-२२ साठी केंद्र सरकारने मुगाला ७२७५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. तर उडीद आणि तुरीसाठी प्रत्येकी ६३०० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र राज्यातील बाजाराचा आढावा घेतला असता नगरमध्ये मुगाला सरासरी ५४००, उडदाला ४४०० आणि तुरीला ५०५० रुपये दर मिळाला. तर अकोल्यात मुगाला सरासरी ५०५०, उडदाला ५००० आणि तुरीला ५९०० रुपये दर मिळत आहे. तर लातूर बाजार समितीत उडदाला सरासरी ६९०० रुपये, मुगाला ६६०० रुपये आणि तुरीला ६१५० रुपये दर मिळत आहे. राज्यातील बाजार समित्यांत उडदाला काही वेळा हमीभाव मिळतो मात्र अनेक वेळा कमी दराने शेतकऱ्यांना उडीद विकावा लागत आहे. तर मुगाचे दर हे राज्यभर हमीभावाच्या खाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मूग आणि उडदाची विक्री केली. मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांकडे माल शिल्लक आहे. त्यांना तरी दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.   आठ राज्यांना परवानगी केंद्र सरकारने ५ ऑक्टोबर रोजी कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाना, गुजरात, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांनी प्रस्ताव पाठविल्यानंतर २५ लाख टनांपेक्षा अधिक कडधान्य आणि तेलबिया खरेदीसाठी परवानगी दिली आहे. 

कर्नाटकात खरेदी कर्नाटक सरकारने सप्टेंबर महिन्यात अहवाल पाठवून केंद्राकडे हमीभावाने खरेदीची परवानगी मागितली होती. त्यानुसार केंद्राने राज्याला ३० हजार टन मूग आणि १० हजार टन उडीद खरेदीची मान्यता दिली आहे. कर्नाटकाने शेतकऱ्यांची नोंदणी करून लगेच खरेदीला सुरुवात केली. राज्यात आतापर्यंत ४४९३.८० टन कडधान्याची हमीभावाने खरेदी केली. ४ ऑक्टोबरपासून ७ हजार ८९२ शेतकऱ्यांना हमीभाव खरेदीचा लाभ झाला आहे. 

तुरीची खरेदी गरजेची पीक हातात आल्यानंतर सरकारने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केल्यास दराला एक आधार असतो. राज्यात तो आधार मूग आणि उडदाला मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागली. मात्र तुरीच्या बाबतीतही असे घडू नये अशी इच्छा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. डिसेंबर-जानेवारीत नवीन मालाची आवक सुरू होईल. त्यापूर्वीच राज्याने खरेदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून परवानगी घ्यावी. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांनी आपला माल कमी किमतीत विकल्यानंतर खरेदी केंद्रे सुरू करून त्याचा काहीच फायदा होणार नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

राज्यातील बाजार समित्यांतील मुगाचे दर (प्रति क्विंटल)  लातूर : ४७०० ते ७२००  नगर  : ४५०० ते ६३००  अकोला  : ४१०० ते ६८००  राज्यातील बाजार समित्यांतील उडदाचे दर (प्रति क्विंटल)  लातूर : ४२३० ते ७२४६  नगर  : ४५०० ते ६५००  अकोला :  ४००० ते ६०००  राज्यातील बाजार समित्यांतील तुरीचे दर (प्रति क्विंटल)  लातूर  : ५७०० ते ६४५०  नगर ; ४००० ते ४८००  अकोला : ५४०० ते ६३११  देशातील महत्त्वाच्या बाजार समित्यांतील मुगाचे दर (प्रति क्विंटल)  नागौर (राजस्थान) : ४८०० ते ७१००  केकडी (राजस्थान) : ५५०० ते ६५००  दाहोद (गुजरात) : ६००० ते ६५००  ललितपूर (उत्तर प्रदेश) : ५५०० ते ६०००  देशातील महत्त्वाच्या बाजार समित्यांतील उडदाचे दर (प्रति क्विंटल)  केकडी : ५००० ते ७५००  दाहोद : ५००० ते ७०००  ललितपूर : ३५०० ते ६६५० 

प्रतिक्रिया... वेळेवर खरेदी केंद्र सुरू न झाल्याने मला ९ क्विंटल मूग ६५०० रुपयांनी विकावा लागला. तर उदडदाला ४००० रुपये दर मिळाला. खरेदी केंद्र असते तर मला आणखी जास्त दर मिळाला असता. मूग आणि उडीद तर गेला आता सरकारने तूर खरेदी केंद्र वेळेवर सुरू करून आधार द्यावा. खरेदी केंद्रे वेळेत सुरू केल्यास निश्‍चितच किमान हमीभावाची तरी शाश्‍वती असते. - तिपन्ना सूर्यकांत येसगे, कावळगाव, ता. देगलूर, जि. नांदेड

पाच ऑक्टोबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले. मात्र पोर्टलवर समस्या असल्याने ऑफलाइन नोंदणी सुरू झाली आहे. ५ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या दरम्यान नोंदणी होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष खरेदी सुरू होईल. - योगेश थोरात, व्यवस्थापकीय संचालक, महाएफपीसी, पुणे  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com