नाथाभाऊ काय चीज आहे, दाखवून देऊ : शरद पवार

नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता संपूर्ण खानदेश राष्ट्रवादीमय होईल, यात मला शंका नाही. एकदा शब्द दिला म्हणजे त्यावरून नाथाभाऊ मागे हटत नाहीत.
eknath khadse
eknath khadse

मुंबई: नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता संपूर्ण खानदेश राष्ट्रवादीमय होईल, यात मला शंका नाही. एकदा शब्द दिला म्हणजे त्यावरून नाथाभाऊ मागे हटत नाहीत, असे गौरवोद्गार काढतानाच नाथाभाऊ काय चीज आहे, हे दाखवून देऊ, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला.  गेली ४० वर्षे भाजपला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन भाजपचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचे योगदान देणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी (ता.२३) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले.  श्री. पवार पुढे म्हणाले, की खानदेश हा संपूर्ण परिसर गांधी-नेहरुंच्या विचाराचा होता. मध्यंतरी त्याला उतरती कळा लागली. या काळात नवी पिढी तयार झाली. ही पिढी घडवण्याचे काम नाथाभाऊंनी केले. त्यांनी जिल्हा परिषद, खासदार, नगरपरिषद, पंचायत समित्या आणल्या. इतिहासाचा हा पहिला टप्पा संपला आहे. आता दुसरा टप्पा सुरु झाला आहे. एकनाथ खडसे म्हणाले, की आयुष्याची ४० वर्षे भाजपमध्ये काम केले, ४० वर्षे ज्या ठिकाणी राहिलो, त्यामुळे एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही‌. विधानसभेत माझी किती बदनामी झाली, छळ केला गेला हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. माझे काय चुकले? या प्रश्नाचे उत्तर मला या क्षणापर्यंत मिळाले नाही. मंत्रिमंडळातही मला संघर्ष करावा लागला.  या वेळी नंदुरबार-तळोदाचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, बोदवडच बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद जंगले, बोदवडचे सभापती किशोर गायकवाड, भुसावळचे सभापती मनिषा पाटील, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सदस्य कैलास सुर्यवंशी, जिल्हा दूध फेडरेशनच्या अध्यक्षा मंदाताई खडसे, मुक्ताई सहकारी सूतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी, सुदाम सोनवणे अशा ७२ नेत्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. भाजपने अडगळीत टाकले उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या वाट्याला सहा जागा यायच्या, त्यातील पाच जागा कायम निवडून आणल्या. समोरासमोर लढलो पण एकमेकांबद्दल द्वेष ठेवला नाही. पाठीत खंजीर कधी खुपसला नाही. भारतीय जनता पक्षाने मला अडगळीत टाकले, आता संधी मिळेल अशी अपेक्षा नव्हती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com