एकनाथ खडसे उद्या ‘राष्ट्रवादी’त

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली.
Eknath Khadse in 'NCP' tomorrow
Eknath Khadse in 'NCP' tomorrow

मुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली.

एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केला आहे. शुक्रवारी (ता. २३) खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. दरम्यान, खडसेंनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर स्वत:चं ट्विटर अकाऊंटही डिलीट केले आहे. गेले तीन दशके भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्याचे सांगितले. शुक्रवारी दुपारी २ वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांची जाण असलेला नेता राष्ट्रवादीत येत आहे, त्यांचे स्वागत, सध्या प्रवेशाची बातमी, त्यांना कोणते पद मिळणार हे योग्य वेळी समजेल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. भाजपमध्ये एकनाथ खडसेंवर होणारा अन्याय सर्वांनी पाहिला आहे, त्यामुळे त्यांनी पक्षाचा त्याग केला, आणखी कोण येणार, याचा उलगडा हळूहळू होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.

यासंदर्भात एकनाथ खडसे म्हणाले की, मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या ४० वर्षांत मी भाजपचे काम केले. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली. काही मिळाले, नाही मिळाले याचे दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला, असे खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर एकनाथ खडसे महाविकास आघाडीत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. नाथाभाऊ रागावतील पण ही स्टेप घेतील असे वाटले नव्हते, त्यांनी राजीनामा दिला हे कटू सत्य, त्यांनी नेतृत्व करावे ही इच्छा होती, ज्या पक्षात जात आहेत, तिथे चांगले काम करावे, यासाठी शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

रक्षा खडसे भाजपमध्येच? एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र, एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपमध्येच राहणार असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

एकनाथ खडसे यांची राजकीय कारकीर्द १९८० मध्ये खडसे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते. एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र, पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, १९८७ मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. १९८९ मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com