औरंगाबाद दूध संघावर एकता पॅनेलचे वर्चस्व 

औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघाच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अखेर सर्वपक्षीय एकता सहकार विकास पॅनेलने बाजी मारली आहे.
Ekta panel dominates Aurangabad milk team
Ekta panel dominates Aurangabad milk team

औरंगाबाद : जिल्हा सहकारी दूध संघाच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अखेर सर्वपक्षीय एकता सहकार विकास पॅनेलने बाजी मारली आहे. आमदार हरिभाऊ बागडे यांच्यासह गोकुळसिंग राजपूत, संदीप बोरसे, कचरू डिके, शिलाबाई कोळगे, अलका पाटील व पुंडलिकराव काजे यांनी भरघोस मतांनी विजय मिळविला आहे.  जिल्हा दूध उत्पादक संघाच्या औरंगाबाद, कन्नड, फुलंब्री, वैजापूर, महिला राखीव मतदारसंघाच्या दोन, तर व्हीजेएनटी मतदारसंघाच्या एका जागेसाठी ही निवडणूक झाली. सात जागांवरील उमेदवार आधीच बिनविरोध निवडले गेले होते. बिनविरोध निवडल्या गेलेल्या उमेदवारांमध्ये खुलताबाद मतदारसंघातील सविता अधाने, गंगापूर मतदारसंघातून दिलीप निर्फळ, पैठणमधून नंदलाल काळे, सिल्लोडमधून श्रीरंग साळवे, सोयगावमधून सुमित्रा चोपडे, अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघातून इंदूबाई सुरडकर, तर इतर मागासवर्ग मतदारसंघातून राजेंद्र जैस्वाल यांचा समावेश आहे.  निवडणूक होऊ घातलेल्या या जागांसाठी १५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. एक बाजूला सर्वपक्षीय एकता सहकार विकास पॅनेल तर दुसऱ्या बाजूला राजमाता जिजाऊ दूध संघ बचाव पॅनेल यांच्या मध्ये आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले गेले. सर्वपक्षीय एकता पॅनेलमध्ये सर्वच पक्षाचे नेते एकत्र आल्याने निवडणूक एकतर्फीच होण्याचा अंदाज वर्तविला गेला होता, अखेर तो अंदाज खरा ठरला.  औरंगाबाद सर्वसाधारण मतदारसंघात आमदार हरिभाऊ बागडे यांनी २७४ मते घेऊन विजय नोंदविला त्यांचे प्रतिस्पर्धी सुरेश पठाडे यांना ६५ मते मिळाली या मतदारसंघात सात मतदान अवैध ठरले. कन्नड सर्वसाधारण मतदारसंघात सर्वाधिक २६९ मते मिळवत गोकुळसिंग राजपूत यांनी विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी सुरेश चव्हाण व संतोष पवार यांना प्रत्येकी ३६ मते पडली. या मतदारसंघात पाच मतपत्रिका अवैध ठरल्या. फुलंब्री तालुका सर्वसाधारण मतदारसंघात ३३० मध्ये घेऊन संदीप बोरसे यांनी सर्वाधिक मताने निवडून येण्याचा विक्रम नोंदविला. त्यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र पात्रीकर यांना केवळ १४ मतांवर समाधान मानावे लागले. या मतदारसंघात दोन मतपत्रिका अवैध ठरल्या. वैजापूर तालुका सर्वसाधारण मतदारसंघात कचरू डिके यांनी सर्वाधिक २८६ मते घेत विजय संपादन केला. त्यांचे प्रतिस्पर्धी नंदकिशोर जाधव यांना केवळ ५८ मते मिळाली, तर २ मतपत्रिका अवैध ठरल्या. महिला राखीव प्रतिनिधींच्या दोन जागांवर अलका पाटील व शिलाबाई कोळगे यांनी बाजी मारली. अलका पाटील यांना २८३ तर शिलाबाई कोळगे यांना २७३ मते पडली. या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणातील शारदा गिते यांना २५ रुखमाबाई सोनवणे यांना ६३ मते मिळाली. दोन मतपत्रिका या मतदारसंघात अवैध ठरल्या. भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागासवर्गीय राखीव प्रतिनिधी मतदारसंघातून पुंडलीकराव काजे यांनी २५० मते घेऊन विजय संपादन केला. त्यांचे प्रतिस्पर्धी मारोती ताठे यांना ८८ मते पडली ८ मतपत्रिका या मतदारसंघात अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तुळशीराम भोजने यांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com