नगर, शिर्डीत ‘काँटे की टक्कर’ मतात उतरलीच नाही

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कामावर ग्रामीण भागात शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी, व्यावसायिक नाराज आहेत, असे चित्र रंगवले गेले. त्यातूनच नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघांत एकतर्फी नव्हे, तर काँटे की टक्कर दिसून आली. मात्र प्रत्यक्षात असे काहीच नव्हते, हे दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांना मिळालेल्या मताधिक्यातून स्पष्ट झाले. विशेष म्हणजे दोन्ही पराभूत उमेदवारांना आपापल्या विधानसभा मतदारसंघातही मताधिक्यही राखता आले नाही. 

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ कॉँग्रेसला न सोडल्यामुळे ऐनवेळी पक्ष बदलून भाजपकडून लढलेल्या डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात नगर शहराचे आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादीकडून लढले. सुरवातीला काँटे की टक्कर वाटली. प्रत्यक्षात मात्र ती मतात उतरलीच नाही. विखे पावणेतीन लाख मतांनी निवडून आले. जिल्ह्यात उत्तर व दक्षिण, असा राजकीय वादही फोल ठरला. विशेष म्हणजे दक्षिणेतील एकाही राष्ट्रवादीच्या नेत्यांला आपल्या मतदारसंघात भाजपला रोखता आले नाही. स्वतः संग्राम जगताप यांच्या नगर मतदारसंघातूनही ५० हजार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे, राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांचा प्रभाव असलेल्या राहुरीत ७० हजार, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांचा प्रभाव असलेल्या शेवगाव- पाथर्डीत ६० हजार, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांच्या श्रीगोंद्यात तीस हजारांचे मताधिक्य विखे पाटील यांना आहे. विखे परिवाराच्या व्यक्तिरिक्त डॉ. सुजय यांनी गेल्या तीन वर्षांपासून मतदारसंघात केलेला जनसंपर्कही कामी आला. 

शिर्डीत मतदारसंघात खासदार सदाशिव लोखंडे पाच वर्षे फिरकलेच नाहीत, असा सूर आवळत विरोधकांनी शिवसेना व भाजपवर जनतेची नाराजी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्ने केला. प्रत्यक्षात राहुल गांधी यांची सभा, माजी महसूलमंत्री व कॉँग्रेसचे प्रभावी नेते बाळासाहेब थोरात यांचा प्रभावही लोखंडे यांचे मताधिक्य रोखू शकला नाही. अकोले विधानसभेचा अपवाद वगळला तर थोरात यांच्या संगमनेर, स्वतः कांबळे यांच्या श्रीरामपूर मतदारसंघातूनही लोखंडे यांना मताधिक्य आहे. यामुळे दोन्ही मतदारसंघांतील काँटे की टक्कर प्रत्यक्ष मतांमध्ये उतरलीच नाही. दोन्ही मतदारसंघांत भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालेले मताधिक्य पाहता ‘कोणी कोणाचे काम केले’ याचे आता पक्षीय पातळीवर काउंट डाउन सुरू झाल्याचे बोलले जात आहे. 

विधान सभेपर्यंत प्रभाव टिकवण्याचे नियोजन  नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघांत भाजप-शिवसेनचे उमेदवार मोठ्या मतांनी निवडून आल्याने मताधिक्य जाहीर होताच अनेकांना आता विधानसभेलाही धोका वाटू लागला आहे. विधानसभेला कोण कोणासाठी अडचणीचे ठरेल यांची गणिते बांधली जाऊ लागली आहेत. भाजप-शिवसेनेचा मात्र लोकसभेतील प्रभाव विधानसभा निवडणुकीसाठीही टिकवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com