जनावरांच्या छावण्यात लोकसभेच्या प्रचाराचा ‘माहोल’

चारा छावणी
चारा छावणी

नगर ः जिल्ह्यात सध्या प्रचार आणि ऊन या दोहोंचा पारा चढलाय. क्षेत्रफळ मोठे असल्याने दक्षिण आणि शिर्डी या दोन्ही मतदारसंघातील उमेदवार व कार्यकर्त्यांची सध्या पळापळ सुरू आहे. सभा, बैठका व फेऱ्यांची सध्या राळ उठली आहे. दक्षिण मतदारसंघाचा विचार केला, तर साडेअठरा लाख मतदारांपैकी म्हणजे सुमारे आठ टक्के मतदार सध्या चारा छावण्यांवर जनावरांसह मुक्कामी आहेत. त्यामुळे प्रचारासाठी छावण्याही महत्त्वाचे ठिकाण ठरत असल्याने सध्या दुष्काळी भागात जनावरांच्या छावण्यात प्रचाराचा ‘माहोल’ पाहायला मिळत आहे.    नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळीची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे जनावरे जगवण्यासाठी गावगावी छावण्या सुरू केल्या आहेत. त्यात आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची राळ उठली आहे. गावगावांत प्रचार सभा होत आहेतच, पण उमेदवार आणि त्यांच्या कार्यकत्यांनी थेट लोकांना भेटण्यावर भर दिला आहे. मात्र उन्हाचा कडाका एवढा वाढला आहे की सकाळी दहानंतर गावे सुनसान होत आहेत. सध्या नगर जिल्ह्याच्या दक्षीण भागात सर्वाधिक छावण्या आहेत. शेतात पेरणी नाही, पीक नाही त्यामुळे कुठलिही शेतीची कामे नाहीत. सध्या फक्त जनावरे जगवणे एवढेच काम शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा मुक्काम छावणीत आहे. मते मागणाऱ्या उमेदवार आणि कार्यकत्यांना सध्या खात्रीशीरपणे किमान दोनशे ते चारशे शेतकरी छावणी भेटतात. त्यामुळे सध्या जनावरे जगवण्यासाठी दुष्काळी भागात असलेल्या छावणीत प्रचाराचा माहोल असल्याचे चित्र आहे. उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेतील सात तालुक्‍यांतील छावण्यांना मंजुरी मिळाली. येथील ३९९ छावण्यांमध्ये सुमारे तेवीस लाख जनावरे दाखल आहेत. प्रत्येकी चार जनावरांचा हिशेब करता सुमारे साठ हजारांहून जास्त पशुपालक या छावण्यांवर मुक्कामी आहेत. त्यामुळे साहजिकच चारा छावण्यांना भेटी व तेथे शेतकऱ्यांशी संवाद साधत सुरू असलेला प्रचार सध्या रामबाण ठरू पाहत आहे. काही का असेना, पण चारा छावण्या सध्या प्रचाराचे महत्त्वाचे केंद्र ठरत आहेत. दक्षिणेतील कर्जत तालुक्‍यात सर्वाधिक ७६ छावण्या आहेत. त्याखालोखाल पारनेर (६७), पाथर्डी (६७), नगर (५४), श्रीगोंदे (४९), जामखेड (४५) आणि शेवगाव (४१) यांचा क्रमांक लागतो. या सात तालुक्‍यातील दोन लाख ३० हजार ६०६ जनावरे छावण्यांमध्ये आहेत. एका पशुपालकाकडे प्रत्येकी चार जनावरांचा हिशोब करता ५७ हजार ६५२ शेतकरी छावण्यांवर मुक्कामी आहेत. प्रचार करायचा म्हटल्यावर उमेदवारांना या साठ हजार पशुपालकांपर्यंत जाणेही महत्त्वाचे ठरणार आहेत. हिच आकडेमोड करून सध्या उमेदवारांनी छावण्यांना ‘लक्ष'' केले आहे.  शेतकरी म्हणतात ‘आम्ही तुमचेच’ दक्षिणेत युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. या दोघांनीही चारा छावण्यांतील पशुपालक हेरून त्यांच्या भेटी घेण्याची नामी संधीही साधली. याच छावण्यांवर जगताप यांनी ‘शेतकरीविरोधी'' व डॉ. विखे यांनी ‘शेतकरी हिताचे'' सरकार पशुपालकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही आरोप-प्रत्यारोपही केले. पशुपालकांनी दोघांचीही भूमिका शांतपणे समजून घेत आम्ही तुमचेच असे सांगत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com