वऱ्हाडात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शिगेला 

ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रीया सुरू असून, वऱ्हाडात गावोगावी राजकारण तापू लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे चार दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांची कागदपत्रांसाठी एकच पळापळ सुरू आहे.
grampanchayat
grampanchayat

अकोला ः ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रीया सुरू असून, वऱ्हाडात गावोगावी राजकारण तापू लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे चार दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांची कागदपत्रांसाठी एकच पळापळ सुरू आहे. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत २२५, तर वाशीममध्ये १६३ ठिकाणी निवडणूक रणधुमाळी रंगणार आहे. 

निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झालेली आहे. त्यासाठी इच्छुकांच्या दस्तऐवज गोळा करण्याची धावपळच सुरू आहे. जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान, तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रमांतर्गत बुधवार (ता. २३)पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. इच्छुकांना बुधवार (ता. ३०)पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. नाताळ, चौथा शनिवार व रविवार अशी तीन दिवस सलग शासकीय सुट्टी आल्याने या काळात प्रत्यक्ष अर्ज स्वीकारण्याचे काम बंद होते. आता सोमवारी (ता. २८) अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी उसळण्याची चिन्हे आहेत. वाशीम जिल्ह्यात १६३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. 

वाशीम जिल्ह्यातील ४९० ग्रामपंचायतींपैकी १६३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये वाशीम तालुक्यातील २४, रिसोड तालुक्यातील ३४, मालेगाव तालुक्यातील ३०, मंगरूळपीर तालुक्यातील २५, कारंजा तालुक्यातील २८ व मानोरा तालुक्यात २२ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. 

चारित्र्य प्रमाणपत्रासाठी एकच गर्दी  या वेळेस ग्रामपंचायत सदस्याला उमेदवारी अर्ज दाखल करताना पोलिस प्रशासनाकडून चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ज्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक आहे त्या गावांमधील इच्छुक उमेदवार चारित्र्य प्रमाणपत्रासाठी पोलिस ठाण्यात रांगा लावून बसले आहेत. पोलिस ठाण्यात ऑनलाइन प्रमाणपत्र प्रणालीत एका दिवशी फक्त ३० ते ३५ प्रमाणपत्र सादर करण्याची क्षमता आहे. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात प्रचंड गर्दी होत आहे. 

पॅनेल प्रमुखांना मिळाला वेळ  नाताळ सणानिमित्त तीन दिवस सुट्टी असल्याने कोणता उमेदवार योग्य व कोणाचे उमेदवारी अर्ज भरायचा यावर नियोजन व बैठक घेऊन चर्चा केली जात आहे. विरोधी गटाच्या उमेदवाराला तोडीसतोड उमेदवार देण्यासाठी वेळ मिळाला आहे. त्यामुळे योग्य उमेदवाराची छाननी केली जात आहे. 

जाचक अटी रद्द करण्याची मागणी  ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान नवीन बँक खाते, मोबाईल लिंकिंगसारख्या जाचक अटी रद्द कराव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे भरताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. जात पडताळणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरताना ओटीपी येत नसल्याने अर्ज भरायला खूप वेळ लागत आहे. त्यामुळे राखीव जागेवर जातपडताळणी अर्ज भरला जात नाही. सोबतच नव्याने बँक खाते उघडण्याचा नियम असल्याने जुने खाते असताना किमान दोन हजार रुपये भरून नव्याने बँक खाते उघडण्यासाठी बँकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे. त्यात देखील मोबाईल लिंक नसल्याने आधी आधार केंद्राच्या चक्कर घालावी लागते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com