मते देण्याची विनंती, दुष्काळाबाबत शब्दही नाही

मते देण्याची विनंती, दुष्काळाबाबत शब्दही नाही
मते देण्याची विनंती, दुष्काळाबाबत शब्दही नाही

नगर ः लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अजून मतदानाला वीस दिवसाचा कालावधी असला तरी अारोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, सध्या ज्या भागात मते मागितली जात आहेत, त्या भागातील जनता दुष्काळाने हवालदिल असताना मते मागणारे मात्र दुष्काळावर चकार शब्दही बोलत नाहीत. त्यामुळे मते मागणाऱ्यांत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही दुष्काळाबाबत फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. 

नगर जिल्ह्यामधील एखाद्या तालुक्यातील काही पाणी उपलब्ध असलेल्या सधन भागाचा अपवाद सोडला तर सगळ्याच ग्रामीण भागात यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. जिल्ह्यामध्ये यंदा तर आक्टोबरपासूनच टॅंकरने पाणी सुरू आहे. मात्र, जनावरे जगवण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर तीन महिन्याने म्हणजे दोन महिन्यापासून जनावरांच्या छावण्या सुरू झालेल्या आहेत. 

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगरमध्ये नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. राष्ट्रवादीकडे असलेली नगरची जागा कॉंग्रेसला सोडली नसल्याचे कारण सांगून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजप प्रवेश करून उमेदवारी मिळवली. राष्ट्रवादीकडून एनवेळी आमदार संग्राम जगताप रिंगणात आले आणि अगदी सुरवातीला सहजपणे सोपी वाटणारी नगर दक्षिणची निवडणूक आजमितीला तरी ‘कॉंटे की टक्कर’ अशी झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात प्रचाराचा धुराळा उडत आहे. सभा, मेळावे, बैठकांवर जोर दिला जात असून प्रत्येक ठिकाणी एकमेकांची उणी-दुणी काढली जात आहे. असे असताना ज्यांच्याकडे आपण मते मागतो ती जनता दुष्काळात होरपळत असल्याचे चित्र असताना सत्ताधारी आणि विरोधक दुष्काळावर बोलायला तयार नाहीत. 

जनावरांच्या छावण्या करताना त्यात पाचशे जनावरे असण्याचा निकष आहे. आजमितीला साडेतीनशेच्या जवळपास छावण्या सुरू आहेत. मात्र सहाशेच्या जवळपास गावांत पाचशेपेक्षा जास्ती जनावरे असल्याची पशुसंवर्धन विभागाकडे नोंद आहे. त्यामुळे अजूनही अनेक गावे छावण्यापासून वंचित आहेत. अशी परिस्थितीकडे लक्ष देण्याएवजी मते मागताना नेते, कार्यकर्ते ‘कोणी काय केले’ याचा पाढा वाचताना एकमेकाच्या चुका काढत आहेत. त्यामुळे विजयाचा दावा करणारे नेते ग्रामीण भागातील परिस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून ज्यांची मते घ्यायची त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे. 

तुम्हाला हवेत मते, आम्हाला पाणी  नगर जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यातून सर्वाधिक मताची लीड मिळेल असा दावा केला जात आहे, त्या पाथर्डी, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यात प्रचार फेरीत अनेक अनुभव मते मागणाऱ्यांना येत आहेत. चार दिवसांपूर्वी एका ठिकाणी ‘‘आम्ही विकास करू, समस्या सोडवून, मते द्या’’ अशी मागणी प्रचार फेरीतून केली जात होती. त्या वेळी एका व्यक्तीने ‘‘काय खरं नाही कोणाचं, तुम्हाला पाहिजेत मते, आणि आम्हाला हवंय पाणी’’ असे सांगितले. त्यामुळे गडबडलेल्या कार्यकर्त्यांनी ‘‘हो व्यवस्था करू’’ असे सांगत तेथून काढता पाय घेतला, असे एका कार्यकत्याने ग्रामीण भागातील अनुभव सांगितला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com