निवडणुका फक्त घोषणांपुरत्याच : संतू पाटील झांबरे
निवडणुका फक्त घोषणांपुरत्याच : संतू पाटील झांबरे

शेतकऱ्यांसाठी निवडणुका फक्त घोषणांपुरत्याच : संतू पाटील झांबरे

देशात असो किंवा राज्यात ज्या वर्षात निवडणुका येतात त्या-त्या वर्षी शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय देऊन त्याला संपविण्याचा अन् इतरांना जगविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. शेतकरी असंघटित असल्याने त्याचा गैरफायदा घेतला जातो. निवडणुकांनतर त्याचा कुठेही फायदा होताना दिसत नाही. सर्वच पक्ष अनेक घोषणा करतात. शेतकऱ्यांना मोठ-मोठी आश्वासने दिली जातात. मात्र, स्वतंत्रपणे आणि ठळकपणे शेतकरी कधीच या पक्षांच्या जाहीरनाम्यात दिसत नाही. या निवडणुकीत नेतेमंडळी शेतीप्रश्नांपासून दूर गेलेली दिसते. कृषिप्रधान देशात शेतकऱ्याला विचारात घेतले जात नाही.  राज्यात कर्जमाफीवरून गोंधळ, शेतमालाचे पडलेले भाव अन्‌ यासह अनेक आश्वासने देऊन सरकारने शेतकऱ्यांचा अपेक्षभंग केला आहे. ‘शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण’ आहे. गेल्या ३ वर्षांपासून कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्याला खेळवले गेले. कर्जमुक्त करणार की नाही याबाबत अजूनही स्पष्ट बोलले जात नाही. यामुळे शेतकरी आणि संस्था अडचणीत आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त बाजारभाव नसल्याने कर्जाची परतफेड करताना शक्य नसल्याने आत्महत्या वाढत आहे. कर्जवसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनीवर बँकेचे नाव लावण्याचे पाप सुरू आहे. सहकारी बँका बुडत असताना सरकारचे सर्रासपणे दुर्लक्ष आहे. राजकीय नेत्यांनी बँका बुडविल्या. मात्र त्यांच्याकडून वसुली करण्याऐवजी शेतकऱ्यांना त्रास दिला जातोय. शेतकऱ्यांच्या चळवळीला व शेतकऱ्याला पद्धतशीरपणे संपविण्याचा डाव सुरू आहे.  सरकारने शेतकऱ्यांना बाजार स्वातंत्र्य व तंत्रज्ञान स्वातंत्र्य द्यावे. चालू वर्षी दुष्काळ असताना भरमसाठ विजबिले पाठवली. शेतीशिवाय विकास होऊ शकणार नाही, सरकारने शेतीक्षेत्राकडे गांभीर्याने पाहावे, नाहीतर सरकार अडचणीत येईलच मात्र त्याचे परिणाम भोगावे लागतील. आता निवडणुका आहेत. शेतकऱ्यांसाठी फसव्या घोषणा दिल्या गेल्या आहेत. यातून पुन्हा शेतकऱ्याला फसविण्याचा प्रयत्न सुरू आहे.  अगोदरच दुष्काळ आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यात कांद्याला भाव मिळू न देण्याचा डाव सरकारने आखला. सरकारच्या निर्णयामुळे कांद्याचे दर खाली आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यातच जमिनीचे लिलाव करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आणली आहे. देश शेतकरी विरहित बनवायचा का, असे असेल तर सांगा नाहीतर तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू द्या. नाहीतर शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.  - संतू पाटील झांबरे,  ज्येष्ठ नेते, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना (शब्दांकन : मुकुंद पिंगळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com