शेतकऱ्यांना उच्चदाब वीजप्रणालीद्वारे वीजजोडणी

शेतकऱ्यांना उच्चदाब वीजप्रणालीद्वारे वीजजोडणी
शेतकऱ्यांना उच्चदाब वीजप्रणालीद्वारे वीजजोडणी

नाशिक : हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणजेच उच्चदाब वीज वितरण प्रणालीतून शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याच्या प्रक्रियेस सुरवात झाली असून, योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांना या प्रणालीचा लाभ होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिली.

परिमंडळातील जवळपास ३० हजार शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजजोडणी देण्यासाठीच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात परिमंडळात ४०९ कोटी रुपये खर्चून होणाऱ्या कामांच्या निविदा महावितरणने प्रसिद्ध केल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात यातील २४८ कोटी रुपयांच्या कामातून शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरणप्रणालीद्वारे वीजजोडणी मिळणार आहे.

पैसे भरूनदेखील वीजजोडणी प्रलंबित असलेल्या राज्यभरातील अडीच लाख शेतीपंपांना मार्च-२०१८ पर्यंत उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे जोडणी देण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेतून नाशिक परिमंडळातील २९ हजार ४४० शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. याबरोबरच परिसरातील इतर शेतकऱ्यांना योजनेतून होणाऱ्या कामांचा लाभ मिळणार आहे. योजनेद्वारे एक किंवा दोन, कमाल तीन कृषिपंप वीजजोडणीसाठी १०, १६ किंवा २५ किलोवॉटचे स्वतंत्र रोहित्र उभारण्यात येणार आहेत.

परंपरागत लघुदाब वाहिनीद्वारे दिलेल्या जोडण्यांमध्ये वाहिन्यांची लांबी वाढून गळती वाढते व आकडे टाकून वीजचोरी करण्यास वाव मिळतो. सध्या ६५ व १०० किलोवॉटच्या रोहित्राद्वारे २० ते २५ शेतीपंपांना जोडणी देण्यात येते. या व्यतिरिक्त आकडे टाकून चोऱ्या करण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. परिणामी, रोहित्रांवर ताण येऊन वीजपुरवठ्यात येऊन ते जळण्याचे प्रमाण वाढते. योग्य दाबाने वीजपुरवठा होत नाही. नवीन प्रणालीमुळे या सर्वच समस्या दूर करता येणे शक्य होणार आहे.

उच्चदाबाने थेट वीजपुरवठा केल्याने गळतीच्या प्रमाणात कमालीची घट होईल. या प्रणालीत आकडे टाकता येणार नसल्याने वीजचोरीला आळा बसेल. एका रोहित्रावर अधिकाधिक तीन वीजजोडण्या देण्यात येणार असल्याने रोहित्र नादुरुस्त होण्याच्या तक्रारी दूर होतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com