ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनांचे वीजबिल थकले

ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनांचे वीजबिल थकले
ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनांचे वीजबिल थकले

सांगली ः म्हैसाळ, ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे ४२ कोटी ५१ लाखांचे वीजबिल थकले आहे. यामध्ये एप्रिलच्या दहा कोटी ६० लाखांच्या वीजबिलाचा समावेश असल्यामुळे ते भरण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगली पाटबंधारे विभागाकडे नोटीस बजावली आहे. पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टंचाई निधीतून पैशाची मागणी केली आहे. पण, त्यांच्याकडून प्रतिसाद नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.

यंदा जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळात होरपळत असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना सुरू आहेत. दुष्काळात योजना चालू राहिल्यामुळे जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज अशा सात तालुक्यांतील १२० गावांमध्ये टंचाईची तीव्रता कमी झाली आहे. शासनाचा टंचाई निवारणावर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचला आहे. मात्र, शासनाकडून टंचाईतून वीजबिल भरण्यासाठी पाटबंधारे विभागाला सहकार्य नसल्यामुळे शासकीय यंत्रणांच्या वादात ऐन दुष्काळात योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

म्हैसाळ योजनेची ३१ मार्च २०१९ पूर्वीची २३ कोटी सहा लाख रुपये वीजबिलाची थकबाकी होती. यामध्ये एप्रिलच्या बिलाची पाच कोटी ८६ लाखांची भर पडून तो आकडा २८ कोटी ९२ लाखांपर्यंत गेला आहे. ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनांच्या वीज बिलाचा प्रश्न काही प्रमाणात कमी आहे. कारण, तेथील साखर कारखाने व शेतकरीही नियमित पाणीपट्टीचे पैसे भरत असल्यामुळे या योजनांची थकबाकी कमी आहे. हे जरी खरे असले तरी, काही कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून वसूल केलेले पैसेही वेळेवर पाटबंधारे विभागाकडे भरले नाहीत. परिणामी थकबाकीचा प्रश्न निर्माण होत आहे.

सावळ्या गोंधळामुळेही पाणीपट्टी थकीत  पाटबंधारे विभागाकडे पाणीपट्टी वसुलीची यंत्रणाच नसल्यामुळे थकबाकी दिसत आहे. या सावळ्या गोंधळामुळेही पाणीपट्टी थकीत राहिली आहे. काही गावांमध्ये तर पाणीपट्टी १०० टक्के वसूल झाल्यानंतर ती पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात ५० टक्केच पोचते, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

उपसा सिंचन योजना व थकीत रक्कम
टेंभू  ३ कोटी ९१ लाख
ताकारी  ९ कोटी ६७ लाख
म्हैसाळ २८ कोटी ९२ लाख
एकूण ४२ कोटी ५१ लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com