जलयुक्त शिवारमधून ११ हजार गावे जलपरिपूर्ण

जलयुक्त शिवारमधून ११ हजार गावे जलपरिपूर्ण
जलयुक्त शिवारमधून ११ हजार गावे जलपरिपूर्ण

मुंबई : राज्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांत १६ हजार ५२१ गावांची निवड करण्यात आली. त्यापैकी ११ हजार २४७ गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. उर्वरित गावे जून २०१८ अखेर पूर्ण करावीत आणि पुढील वर्षासाठी निवडण्यात आलेल्या ६२०० गावांमध्ये कामे तातडीने सुरू करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. तसेच राज्यात ७६ हजार १०६ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून ७७ हजार विंधन विहिरींचे काम प्रगतिपथावर आहे ते पूर्ण करण्यासाठी त्याला गती द्यावी, असा आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.   मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बुधवारी (ता. ११) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, विंधन विहिरी, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई व शबरी घरकुल योजनांचा आढावा घेतला. या वेळी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  योजनेचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले, या योजनेत निवडलेल्या गावांपैकी ११ हजार २४७ गावे जलपरिपूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी निवडण्यात आलेली ५०३१ गावे जून २०१८ अखेरपर्यंत जलपरिपूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावे. ज्या जिल्ह्यांमध्ये या योजनेची कामे पूर्ण झाली नाहीत तेथे गती देऊन वेळापत्रकानुसार काम पूर्ण करावे.  नागपूर, वर्धा, नंदूरबार, उस्मानाबाद, चंद्रपूर, भंडारा, सिंधुदुर्ग, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये योजनेचे काम ८० टक्क्यांपेक्षा जास्त झाले असून त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक केले. जेथे काम अपूर्ण आहे तेथे अधिक लक्ष देऊन वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा. यासंदर्भात आढावा घेण्यासाठी पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  २०१८-१९ साठी ६२०० गावांची निवड झाली असून त्यामध्ये कोकण विभागातील ३००, पुणे ९००, नाशिक ११००, औरंगाबाद १४००, अमरावती १३००, नागपूर १२०० गावांची निवड करण्यात आली आहे. ३० जून २०१८ पर्यंत टप्पा एकनुसार कार्यवाही करण्यात यावी. नोव्हेंबर ते मार्च २०१९ पर्यंत टप्पा एकमधील कामे पूर्ण करून ही गावे जलपरिपूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. जलयुक्त शिवार योजनेसाठी निधीची कुठलीही कमतरता नसून ही कामे वेळेत पूर्ण होण्याकरिता एक हजार कोटी रुपयांचा निधी उद्या वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकण भागात पावसाळ्यात भरपूर पाणी असते, मात्र उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. अशा भागात विशेष लक्ष देऊन योजनेची अंमलबजावणी करावी, जेणेकरून या भागाला भविष्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार नाही.  या वेळी मुख्यमंत्र्यांनी शबरी, रमाई घरकुल योजनेचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १० लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून त्यांना घर बांधणीचा पहिला हप्ता तातडीने वितरित करावा. या कामाबाबत सातत्याने नियंत्रण ठेवून ही कामे वेळेत पूर्ण होतील यासाठी पाठपुरावा करावा. २०१९ अखेर सर्व लाभार्थ्यांचे घरकुलांचे बांधकाम पूर्ण होईल यासाठी मिशन मोडमध्ये काम करावे, जेथे मनुष्यबळाची कमतरता आहे त्या ठिकाणी आऊटसोर्सिंगद्वारे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कामे पूर्ण करावीत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.

१ कोटी ४१ लाख घनमीटर गाळ काढला गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यातील २९०० धरणांमधून आतापर्यंत १ कोटी ४० लाख ९७ हजार ८५६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अभियानांतर्गत अधिक लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. शेतीच्या कामांसाठी गाळ वापरून उरलेल्या गाळाचा नावीन्यपूर्ण वापराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  ७६ हजार १०६ शेततळ्यांचे काम पूर्ण राज्यात मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत १ लाख १२ हजार ३११ शेततळ्यांचे उद्दिष्ट असून त्यापैकी ३४ जिल्ह्यांमध्ये ७६ हजार १०६ शेततळी पूर्ण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक ८ हजार ९९ शेततळे पूर्ण करण्यात आली आहे. नरेगा, धडक सिंचन विहिरी, ११ हजार सिंचन विहिरी योजनेअंतर्गत राज्यात आतापर्यंत १ लाख २६५ विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ३३ जिल्ह्यांमध्ये ७६ हजार ६८९ विहिरींचे काम प्रगतीपथावर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com