नियमित कर्जदारांसाठी सहकारी सेवा संस्थांचा एल्गार

नियमित कर्जदारांसाठी सहकारी सेवा संस्थांचा एल्गार
नियमित कर्जदारांसाठी सहकारी सेवा संस्थांचा एल्गार

कोल्हापूर : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडणाऱ्या सहकारी सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कोणतीच उपाययोजना न केल्याने शासनाच्या निषेधार्थ आता सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीच एल्गार पुकारला आहे. अनेक भागांतील संस्थांनी जोपर्यंत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांबाबतचा निर्णय होत नाही, तोपर्यंत शासनाला थकबाकीदारांची माहितीच सादर करायची नाही, असा निर्णय घेतला आहे. 

शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याच्या घोषणेनंतर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठी अस्वस्था निर्माण झाली आहे. त्यांनी थेट आपला मोर्चा सेवा संस्थांकडे वळविल्याने नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी शासनास थकबाकीदारांबाबतची माहिती न कळविण्याची तयारी केली आहे. याबाबतचा विचारविनियम विविध बैठकांतून होत आहे. संस्थांचे पदाधिकारी, सचिव अन्य संबधित अधिकाऱ्यांकडून संस्थेच्या थकबाकीचा आढावा घेण्यात येत आहे. 

संस्था मोठ्या प्रमाणात थकबाकीत आल्याने संस्थेच्या उत्पन्नाचे मार्ग बंद झाले आहेत. यातच नियमित कर्जफेडी केलेल्या कर्जदारांनी संस्थांना लक्ष्य केले आहे. सध्या गावोगावी याच प्रश्‍नावर प्रत्येक संस्थेमध्ये संस्थाचालक व शेतकऱ्यांत कर्ज वसुलीवरून खडाजंगी होत असल्याचे चित्र आहे.   

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना डावलल्याच्या निषेधार्त चंदगड तालुक्‍यातील धुमडेवाडीत शेतकऱ्यांनी गावातील सेवा संस्थेलाच कुलूप लावले. जोपर्यंत या शेतकऱ्यांबाबत निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही संस्थेचे कामकाज चालवू देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अशीच खदखद निर्माण होत आहे.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आजपर्यंत काहीच मिळाले नाही. त्यांनाही या कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी आम्ही थकबाकीदारांची माहिती न देण्याचे ठरविले. सातारा जिल्ह्यात अनेक तालुका सचिव संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. राज्यात इतर ठिकाणीही अशा निर्णयाच्या मानसिकतेत संस्था आहेत. - संदीप संकपाळ,  तालुकाध्यक्ष, गटसचिव संघटना, खटाव, जि. सांतारा

कर्ज भरण्याची मानसिकता नसतानाही अनेकांनी घरातील वस्तू गहाण ठेवून कर्जे भागविली. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या योजनेतील दमडीही मिळाली नाही. हे संतापजनक आहे. थकबाकीदारांना लाभ द्याच; परंतु नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ व्हायला हवा. - शीतल पाटील, कुरुंदवाड, जि. कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com