पंढरपुरात प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रातील अतिक्रमणे हटवा

पंढरपुरात प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रातील अतिक्रमणे हटवा
पंढरपुरात प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रातील अतिक्रमणे हटवा

पंढरपूर, जि. सोलापूर  : चंद्रभागा नदीपात्र, प्रदक्षिणा मार्ग परिसरातील अतिक्रमणे तत्काळ काढली जावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येथे दिल्या. माघ वारी निमित्ताने नुकतीच संत तुकाराम भवन येथे आढावा बैठक झाली. बैठकीत श्री. शंभरकर यांनी सूचना दिल्या. नगराध्यक्ष साधना भोसले, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी सागर कवडे, तहसीलदार वैशाली वाघमारे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, शंकुतला नडगिरे आदी या वेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, की नदीपात्रातील आणि प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी नगर परिषद आणि शहर पोलिसांनी संयुक्त आराखडा तयार करावा. या आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. याचबरोबर शहरात ठिकठिकाणी विक्रीसाठी बसणाऱ्या विक्रेत्यांची एकत्रित ठिकाणी व्यवस्था करावी. जेणेकरून वाहतुकीला कोणत्याही प्रकारे अडथळा येणार नाही. माघवारीत आरोग्याच्यादृष्टीने व्यवस्था चोख केली जावी. संभाव्य साथीच्या रोगांची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करावे. वारी कालावधीत विजेचा पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. सर्व वाहिन्या तपासून घ्याव्यात. वारीच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे दुरुस्तीचे काम काढू नये. वारी कालावधीत शहरातून वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी पोलिस, परिवहन विभाग आणि राज्य परिवहन सेवा यांनी एकत्रित नियोजन करावे. पंढरपुरात जड वाहतुकीला परवानगी देऊ नये, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी बैठकीनंतर पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरातील दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा नदीवरील घाट आणि ६५ एकर परिसरास भेट देऊन पाहणी केली. तसेच, आवश्यक त्या सूचना केल्या. त्याची अंमलबजावणी तातडीने करा, असेही ते म्हणाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com