अमरावती : टंचाईग्रस्त गावांतील पाणीटंचाई दूर करा ः ठाकूर

टंचाईग्रस्त गावांतील पाणीटंचाई दूर करा ः ठाकूर
टंचाईग्रस्त गावांतील पाणीटंचाई दूर करा ः ठाकूर

अमरावती  ः महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आहे. येत्या काळात ज्या गावांना एकत्रित पाणीपुरवठ्याच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत; त्या तातडीने उन्हाळ्यापूर्वी पूर्ण कराव्यात. यामध्ये टंचाईग्रस्त गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याचे निर्देश महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे राबविण्यात येत असलेल्या शहरी, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. या वेळी आमदार बळवंत वानखेडे, जीवन प्राधिकरणाचे अभियंता सुरेश चारथळ, कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर, सतीश बक्षी, आनंद जवंजाळ, उपकार्यकारी अभियंता जितेंद्र गजबे, जयंत देशमुख, वैभव वानखडे, प्रकाश टेकाडे, विक्रम धोटे उपस्थित होते.  जीवन प्राधिकरणाच्या वतीने पाणीपुरवठ्यासाठी ७० गावे आणि १०७ योजना आहेत. येत्या काळात उन्हाची तीव्रता वाढीस लागत पाण्याचे स्रोत कमी झाल्यानंतर या गावांची पाण्याची मागणी होईल. या गावांची सहमतीपत्रे घेण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी. अधिकाऱ्यांनीही या गावांत जाऊन नागरिकांशी संवाद साधून सहमतीचे ठराव मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. अधिकाधिक गावांची सहमती मिळाल्यानंतर या ठिकाणची कामे सुरू करावीत. उन्हाळ्यापूर्वी येथील कामे झाल्यास टंचाईग्रस्त गावांना पाणी मिळाल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण होणार नाही. योजनांची अंमलबजावणी तातडीने करावी. कामांमध्ये अडचणी येत असल्यास तातडीने उपाययोजना कराव्यात. पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालविण्यात आल्यास विजेच्या देयकात मोठी बचत होते. यासाठी सौरऊर्जा प्राधिकरणाकडे पाठपुरावा करावा. जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात नळयोजनाही अत्यावश्‍यक असल्याने या ठिकाणच्या योजना कशाप्रकारे पूर्ण करण्यात येतील, याबाबतही प्राधिकरणाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. एकत्रित पाणीपुरवठा योजनांमध्ये गावांची संख्या मोठी असते. परंतु, पाण्याची मागणी करणारे ठराव देण्यास ग्रामपंचायती वेळ लावतात. त्यामुळे ज्या गावांनी पाण्याच्या मागणीचे ठराव पारीत करून दिलेले आहेत; त्या गावांत पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com