फळबाग अन् प्रक्रिया उद्योगांवर भर

grading and packing unit
grading and packing unit

जर्मनीमधील शेतकरी नियोजनबद्ध पद्धतीने दूध, मांस, पोल्ट्री तसेच बटाटा, शुगर बीट, फळे, भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. मजूरटंचाईमुळे यांत्रिकीकरणावर भर आहे. प्रक्रिया उद्योगातून नफा वाढविला जातो. स्थानिक परिस्थितीनुसार सरकारदेखील शेती विकास आणि पायाभूत सुविधांसाठी मदत करते.   जर्मनीतील लोकसंख्येच्या केवळ दीड टक्के लोक शेती करत असले तरी हा अजूनही मुख्य व्यवसाय आहे. जर्मनीमध्ये बहुतांश जमीन शेती व जंगलाखाली आहे. १९४९ ते १९९८ या कालावधीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी यांत्रिकीकरणाचा वापर झाल्याने पूर्वी एक शेतकरी दहा लोकांना अन्नपुरवठा करीत होता, तोच आता ११० लोकांना अन्नधान्य पुरवठा करतो. नियोजनबद्ध पद्धतीने दूध, मांस, पोल्ट्री, बटाटा, शुगर बीट, फळे, भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते. उत्तर जर्मनीमध्ये शुगर बीट, पूर्व जर्मनीमध्ये प्लम आणि इतर फळपिकांची लागवड आहे. डोंगरी भागात भाजीपाला, पशुपालन, मांस उत्पादन, फळबागा, भाजीपाला लागवड आहे. ऱ्हाईन नदीच्या खोऱ्यात द्राक्ष लागवड आहे. बहुतांश द्राक्ष उत्पादन वाईननिर्मितीसाठी जातात. युरोपीय संघाच्या धोरणांचा परिणाम शेती क्षेत्रावर होत असतो. त्यामुळे संबंधित विभागामध्ये शेती विकास व पायाभूत सुविधांसाठी स्थानिक परिस्थितीनुसार सरकार मदत करते. डीआरएल सेंटर

  • जर्मनीमध्ये संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसाराचा चांगला वेग आहे. त्यामुळे विविध जातींवर संशोधन होऊन तीन वर्षांत या जाती शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिल्या जातात. अभ्यास दौऱ्यामध्ये आम्ही फ्रँकफर्टमधील फळ संशोधन विभागाला भेट दिली.  
  • येथे १३ हेक्टर क्षेत्रावर सफरचंद, ब्लूबेरी, द्राक्ष, ब्लूम, स्टोन फ्रूट, चेरी या पिकांची लागवड पाहता आली. या ठिकाणी पीक लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत कसे नियोजन करावे, याबाबत सविस्तर माहिती दिली जाते. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध आहे.  
  • प्रक्षेत्रावर काही ठिकाणी पावसाच्या पाण्यावर वाढणारी झाडे, ठिबकने पाणी दिलेली झाडे आणि काही क्षेत्रावर शेडनेटचा वापर असे प्रयोग पाहता आले. दर गुरुवारी केंद्रातील प्रक्षेत्र पहाण्यासाठी खुले ठेवण्यात येते. केंद्रातर्फे परिसरातील शेतकऱ्यांना ठरावीक रक्कम आकारून स्वतंत्रपणे हवामान अंदाज, पाऊस यासंबंधी माहिती दिली जाते.
  • फळबाग लागवडीचे क्षेत्र

  • जर्मनीमध्ये सफरचंदाची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. सफरचंदाच्या एल्स्टर आणि जोनागोल्ड या प्रमुख जाती आहेत. सफरचंदानंतर स्ट्रॉबेरी, पिअर्स, गोड आणि आंबट चेरी, प्लम तसेच मीराबेल्स लागवड आहे. काही प्रमाणात ग्रीनहाउसमध्ये स्ट्रॉबेरी लागवड आहे.  
  • बहुतांश लागवड बॅडन-वर्स्टमबर्ग, लोअर सक्सनी, राईनलँड-पॅलेटिनेट आणि सक्सोनी या भागांमध्ये केंद्रित आहे. सुमारे ८७ टक्के सफरचंद उत्पादन खाण्यासाठी आणि उर्वरित प्रक्रियेसाठी वापरले जाते.  
  • सफरचंद, स्ट्रॉबेरीच्या बरोबरीने चेरी, प्लम्स, पिअर, पीच, अक्रोड, जर्दाळू या पिकांची देखील काही भागांत लागवड आहे. यातील सुमारे १५ टक्के उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतले जाते. अक्रोडच्या एकूण क्षेत्रापैकी ४५ टक्के क्षेत्र सेंद्रिय आहे. हा अक्रोड अत्यंत दर्जेदार असल्याने जागतिक मागणी आहे.  
  • गेल्या पाच वर्षांमध्ये फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये ४ टक्के घट झाली असली तरी फळपिकांच्या लागवड क्षेत्रात सुमारे १० टक्के वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे लहान शेतकरी मोठ्या शेतकऱ्यांना किंवा कंपन्यांना आपले लागवड क्षेत्र भाडे कराराने देण्याचे प्रमाण वाढले आहे. जर्मनीतील २ हेक्टरपेक्षा कमी फळबाग क्षेत्र असणारे लहान शेतकरी नोकरी किंवा व्यवसाय करतात. अशा शेतकऱ्यांना शेतीतील नवीन तंत्रज्ञान अवगत करणे तसेच त्यांच्यानंतर शेतीसाठी वारसदार मिळण्यास अडचणी येत असल्याने ते मोठे शेतकरी किंवा व्यावसायिक कंपनीला शेती भाडेतत्त्वावर देतात.  
  • जर्मनीमध्ये प्रति वर्षी प्रति माणसी फळांचे सेवन ८८ किलो आहे. यांपैकी सफरचंदाचा वाटा २५ किलो आहे. भारतातील ग्रामीण भागात प्रति वर्षी प्रति माणसी फळ सेवनाचे प्रमाण २५ ते ६१ किलो तर शहरी भागात ४६ ते ८५ किलो असून सरासरी ५६ किलोची आहे.
  • प्लम आणि चेरीलादेखील मागणी

  • ज्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची चांगली क्षमता आहे, तेथे प्लम लागवड मोठ्या प्रमाणात आहे. बहुतांश पीक पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या पिकासाठी सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर केला जातो. लागवडीनंतर चौथ्या वर्षी उत्पादन सुरू होते. मार्च, एप्रिल महिन्यांमध्ये तोडणी होते. प्रति हेक्टरी सरासरी १२ टन उत्पादन मिळते.  
  • बाजारपेठेत प्रति किलोस १२० रुपये दर मिळतो. सुमारे ७० टक्के फळांवर प्रक्रिया केली जाते. उर्वरित ३० टक्के फळांची विक्री स्थानिक बाजारापेठ आणि मॉलमध्ये होते. फळांच्या साठवणुकीसाठी शीतकरण यंत्रणेचा वापर केला जातो. फळबागेच्या कामासाठी मजूर टंचाई असल्याने यांत्रिकीकरणावर शेतकऱ्यांचा भर आहे.  
  • जर्मनी मधील ग्राहकांच्याकडून चेरीला देखील चांगली मागणी आहे. ९० टक्के उत्पादन प्रक्रियेसाठी वापरले जाते. लागवडीनंतर दोन वर्षांनी फळांचे उत्पादन सुरू होते. जुलै व ऑगस्ट महिन्यांत उत्पादन मिळते. हे फळपीक देखील पावसावर अवलंबून आहे. प्रति हेक्टरी १६ ते २० टन उत्पादन मिळते. स्थानिक बाजारपेठेत फळांना ८० रुपये दर मिळतो.
  • संपर्क - डॉ. राजेंद्र सरकाळे, ९८५०५८६२२० (लेखक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com