agriculture news in marathi Emphasis on sustainable villages, agriculture and skills development | Agrowon

शाश्वत ग्राम, शेती अन कौशल्य विकासावर भर

राजकुमार चौगुले
रविवार, 13 सप्टेंबर 2020

शाश्वत ग्रामविकास, शेती, आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी घुंगुर(ता.शाहूवाडी,जि.कोल्हापूर) येथील वसुंधरा सामाजिक कौशल्य विकास संस्था कार्यरत आहे. राज्यातील ३५ तालुक्यात संस्थेचे कार्य विस्तारलेले आहे.

शाश्वत ग्रामविकास, शेती, आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी घुंगुर(ता.शाहूवाडी,जि.कोल्हापूर) येथील वसुंधरा सामाजिक कौशल्य विकास संस्था कार्यरत आहे. राज्यातील ३५ तालुक्यात संस्थेचे कार्य विस्तारलेले आहे. जैवविविधतेबरोबरच सेंद्रिय शेती आणि ग्रामस्थांना रोजगाराभिमुख करण्यासाठी संस्थेच्या वतीने निरंतर प्रयत्न सुरु आहेत.

घुंगुर(ता.शाहूवाडी,जि.कोल्हापूर) येथील वसुंधरा सामाजिक कौशल्य विकास संस्था गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यातील ३५ तालुक्यामध्ये कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून सुमारे एक हजार गावांमध्ये ग्राम विकासाच्या बरोबरीने कृषिपूरक उपक्रमांना सुरवात झाली आहे. ग्रामस्थांची जीवनशैली उंचावून त्यांना स्वयंपूर्ण करण्याचे काम सुरू आहे.

जैवविविधतेबरोबरच सेंद्रिय शेती आणि ग्रामस्थांना रोजगाराभिमुख करण्यासाठी संस्थेच्या वतीने निरंतर प्रयत्न सुरु आहेत. संस्थेची स्थापना २०१५ मध्ये झाली. संस्थेचे एकूण नऊ संचालक आहेत. शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, गगनबावडा या परिसरातील संचालक मंडळ आहे. मानसिंग सावरे हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सावरे हे यशदा, पुणे येथे राज्यस्तरीय व्याख्याते आहेत.

स्थानिक पदाधिकाऱ्यांचे सहकार्य
संस्थेचे काम कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, लातूर, अकोला, गोंदिया परभणी आदि जिल्ह्यात विस्तारलेले आहे. राज्याच्या सर्व विभागातील जिल्ह्यात संस्था कार्यरत आहे. ग्रामविकासाचे काम करताना प्रशिक्षकांची मदत घेतली जाते. पुण्यातील यशदा संस्थेत प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक आहेत. ते राज्यातील विविध भागातील आहेत. त्यांनी एकत्र येऊन ग्रामविकासाचे कार्य विस्तारलेले आहे. विविध भागातील हे प्रशिक्षक आपापल्या जिल्ह्यात संस्थेच्या वतीने काम करतात. यामुळे अंतराची अडचण येत नाही. यशदाचे प्रशिक्षक संबंधित भागात नवे स्थानिक प्रशिक्षक तयार करून कौशल्य आधारित कामांना गती देतात.

आदिवासी पाड्यामध्ये प्रभावी काम
संस्था रायगड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यामध्ये कार्यरत आहे. आदिवासी भागात नागरिकांना शिक्षणाबाबत जागृती नसल्याने तिथे अनेक प्रश्न निर्माण होतात. या भागात जावून संस्थेच्या सदस्यांनी पाड्यावरील ग्रामस्थांना विविध स्तरावर प्रशिक्षण दिले आहे. व्यसनाधिनतेतून बाहेर काढून त्यांना शेळी पालन प्रशिक्षण, रानभाजी लागवड, शेतीचे कौशल्य आणि गवंडी व्यवसायाचे प्रशिक्षण दिले. यातून अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे.

जैवविविधतेवर भर

  • प्रत्येक गावात पिकांबरोबर इतर उपयुक्त वनस्पतीही टिकल्या पाहिजेत यासाठी संस्थेच्या वतीने जैवविविधता विषयासंबंधी जागृती केली जाते. गावांतील पिकांचा अभ्यास करून तेथील जैवविविधता कशी वाढेल, याबाबत गावकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.
  • औषधी वनस्पतींचे संवर्धन, स्थानिक बियाणांचे संकलन करून परिसरातील शेतकऱ्यांच्यामध्ये प्रसार, उपयुक्त ठरणाऱ्या वनस्पतींची शेती तसेच परसबागेत लागवडीबाबत प्रशिक्षण वर्ग तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत घेतले जातात. संस्थेचे तेरा प्रशिक्षण यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्या गावात काम करायचे आहे, तिथे जैवविविधता हा महत्त्वाचा घटक मानून काम केले जाते.

ग्रामविकासात ४२ विभागांचा सहभाग

  • एखाद्या गावात काम करत असताना ४२ विभाग लक्षात घेतले जातात. ग्रामसुधारणा करताना प्रत्येक स्तरावर प्रशिक्षण देवून संबंधित घटकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जातो. महिला बचत गट उभारणे, महिला आरोग्य तपासणी शिबिर, किशोरवयीन बालकांबाबत समुपदेशन ही कामे या गावपातळीवर निरंतर केली जातात.
  • डिजिटल इंडिया या संकल्पनेवरही संस्थेने भर दिला आहे. लोकांकडे ॲड्राइड मोबाईल आहेत. परंतु त्यांचा वापर उपयुक्त कारणासाठी कसा करायचा याची माहिती नसते. अशा लोकांना एकत्र करून संबंधित विषयावर एकत्रित प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. मोबाईल बँकीग, बिले भरण्याची पद्धत, सोशल मिडियाचा वापर, शासनाकडे तक्रार करण्याच्या पद्धती या विषयांबाबत ग्रामस्थांना प्रशिक्षण दिले जाते. त्याचा चांगला फायदा ग्रामस्थांना झाला आहे.
  • संस्थेला आर्थिक पाठबळाची सातत्याने गरज असते. संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत, कृषी विभाग आदींकडून काही उपक्रमांकरिता अनुदान घेण्यात येते. याशिवाय सीएसआर (सामाजिक विकास निधी) फंडातूनही संस्थेच्या वतीने निधी उभारला जातो. ना नफा ना तोटा पद्धतीने काम केले जाते. राज्यभरातील तेरा प्रशिक्षक आणि पाच कर्मचाऱ्यांमार्फत संस्थेचा ग्रामविकासाचा कारभार सुरू आहे.

लोकसहभागातूनच ग्रामविकास 
संस्थेच्या उपक्रमात यशदामधील १३ प्रशिक्षक सहभागी आहेत. त्यांच्याकडून विविध विषयांच्याबाबत मार्गदर्शन घेतले जाते. कोणत्या भागात कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे याची माहिती संबंधित प्रशिक्षकाकडून संस्थेला मिळते. यानुसार संस्थेच्या उपक्रमाचे नियोजन केले जाते. संस्थेच्या वाटचालीत यशदा संस्थेच्या प्रशिक्षकांचा मोठा वाटा आहे. हे प्रशिक्षक सामाजिक दायित्व म्हणून संस्थेला मदत करतात. विशेष करून सगळ्या घटकांना एकत्रित आणणे हे महत्त्वाचे असते. संस्थेच्या माध्यमातून विकासापासून दुर्लक्षित असलेल्या गावांना प्राधान्य दिले जाते. प्रत्येक गावाच्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर कोणता मार्ग निघेल यावर संस्थेची तांत्रिक टीम काम करते. त्यानुसारच आराखडे तयार केले जातात. संबंधित घटकांचे सहकार्य घेतले जाते.

संस्था करते ग्रामविकासाचा आराखडा

  • विकास कामासाठी गाव निवडल्यानंतर पहिल्यांदा सर्व विभागातील स्थानिक अधिकाऱ्यांना बोलावले जाते. या बैठकीत गावाची गरज, अडचणी तसेच ग्रामसुधारणेसाठी काय करणे आवश्यक आहे, याबाबत चर्चा केली जाते. अगदी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही बोलावून वाहतुकीच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जातो.
  • कृषी सह अन्य संलग्नीत विभागांची सांगड घालून बैठकीत ग्रामविकासाचा आराखडा तयार केला जातो. या आराखड्यावर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत अभ्यास करुन तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जातो. या आराखड्यात शेती, पर्यावरण रक्षण, आरोग्य, महिला, शिक्षण, पूरक उद्योग आदी विषयांबाबत कालबद्ध कार्यक्रम सादर केला जातो. यानंतर प्रत्यक्षात लोकसहभागातून ग्रामविकासाचे काम सुरू केले जाते.

शेती तंत्रज्ञान प्रसार 

  • संस्थेचे मुख्य काम कौशल्य आधारित उपक्रम हे आहे. हा उद्देश ठेवून संस्थेने राज्यातील ग्रामीण भागात सेंद्रिय शेती प्रसाराचे काम सुरु ठेवले आहे. राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत संस्थेने मार्गदर्शन केले आहे. कृषी विभागाच्या आत्मा विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येतो.
  • कृषी विभागाशी संपर्क करून संबंधित गावांमध्ये शेतकऱ्यांचे गट स्थापन करणे, त्यांना विविध योजना समजावून सांगणे, प्रशिक्षित करणे तसेच शासकीय निर्णय याबाबत जनजागृती केली जाते. संस्थेच्या माध्यमातून सेंद्रिय शेती, व्यवस्थापन आणि शेतमाल विक्रीबाबत गटातील शेतकऱ्यांना माहिती देण्यात येते. आत्तापर्यंत संस्थेने सात जिल्ह्यातील एक हजार गावांमधील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला आहे.

संपर्क- मानसिंग सावरे (अध्यक्ष), ७९७२७१७००४


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
औरंगाबाद जिल्ह्यात करटोलीची व्यावसायिक...कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील...
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात कादे...योग्य नियोजन, व्यवस्थापनाच्या बळावर सुमारे १५ एकर...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
भात शेतीला मिळाली कुक्कटपालनाची जोडनिवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) येथील मारुती सहदेव...
शेळी, कोंबडीपालनातून बसवली शेतीची घडीनेमके काय करायचे याची स्पष्टता असली की शेती किंवा...
गृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना...कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची क्षमता प्रत्येक...
शाश्वत ग्राम, शेती अन कौशल्य विकासावर भरशाश्वत ग्रामविकास, शेती, आरोग्य, शिक्षण आणि...
एका वर्षात दुबार द्राक्ष काढणीचा ‘आरा...द्राक्षशेतीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जोखीम वाढत...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...