कर्मचाऱ्यांनी ‘क्रॉप डॉक्टर’ व्हावे : कृषी आयुक्त धीरज कुमार

राज्यातील शेतकरी कष्टपूर्वक शेती करताना मशागतीचे नवतंत्र किंवा कीड-रोगनियंत्रणासाठी सतत मार्गदर्शकांच्या शोधात असतो.
dheeraj kumar
dheeraj kumar

पुणे: राज्यातील शेतकरी कष्टपूर्वक शेती करताना मशागतीचे नवतंत्र किंवा कीड-रोगनियंत्रणासाठी सतत मार्गदर्शकांच्या शोधात असतो. नाशिक, पुणे, सांगलीसारख्या प्रयोगशील भागांमध्ये शेतकरी खासगी मार्गदर्शकांची मदत घेतात. शेतकरी त्यांना ‘डॉक्टर’ म्हणतात. अशा उदाहरणांमधून शेतकऱ्यांची नेमकी गरज दिसून येते. त्यामुळे आमच्या कृषी खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना बांधावर सतत जावे लागेल आणि शेतकऱ्यांचे सच्चे ‘क्रॉप डॉक्टर’ म्हणून पुढे यावे लागेल, असे मत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी व्यक्त केले. 

नवीन वर्षाच्या उपक्रमांबाबत ‘अॅग्रोवन’शी चर्चा करताना त्यांनी आपली काही मते मनमोकळेपणाने मांडली. विस्तार योजनांना गती, ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा अवलंब, गटशेतीला चालना आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन, तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विभागाची यंत्रणा जास्तीत जास्त कशी उपयुक्त ठरेल याविषयीचा पाठपुरावा हीच आपल्या कामाची दिशा राहणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

“शेती ही नाजूक आणि जोखीमपूर्ण होत असताना त्यातील नियमित घडामोडींशी आमच्या कर्मचाऱ्यांच्या संबंध येत नसतो. उदाहरणार्थ, द्राक्ष बागेतील आजच्या दिवसाला वातावरण किंवा बागेच्या अवस्थेनुसार नेमके काय काम करावे याविषयीचे मार्गदर्शन शेतकऱ्याला हवे असल्यास त्याला कृषी खात्याचे साधन उपलब्ध नाही. शेतकरी अशावेळी पूर्णतः खासगी ‘क्रॉप डॉक्टर’वर अवलंबून असतात. आमचे काही कृषी सहायक तसेच क्षेत्रीय कर्मचारी ‘फिल्ड’वर चांगली कामे करीत आहेत. मात्र शेतकऱ्यांसोबत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी अजून एकरूप व्हावे व त्यांनी ‘निडबेस्ड एजन्सी’ म्हणजेच वर्तमानातील गरजेनुसार मदत करणारी यंत्रणा बनावे. आमचा प्रयत्न तसा राहील,” असे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

आपल्याकडील तांत्रिक व शास्त्रीय माहिती योग्य वेळी शेतकऱ्याला पोहोचली तरच ती उपयुक्त असेल. कृषी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी बांधावर पोहोचविण्यासाठी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे, असे आवाहन करीत आयुक्त म्हणाले, की राज्याच्या कृषी विभागाने फलोत्पादन किंवा निर्यातीत चांगली कामे केली आहे. आता केवळ निर्यात हा विषय घेतल्यास त्यात गोविंद हांडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी निर्यातीमधील संपूर्ण बारकावे आत्मसात केले आहेत. हेच तांत्रिक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहे. अशा अधिकाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रोत्साहन देत राहू.  शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य  कृषी हा विषय आमच्या आवडीचा असला तरी प्रत्यक्षात आयुक्तालयात काम करताना विषयांची संख्या आणि त्याची व्याप्ती इतकी मोठी आहे, की अनेकदा आम्हाला ‘फायर फायटिंग’च्या ‘मोड’वर कामे करावी लागतात. केवळ एक पीकविम्याचा विषय घेतला तरी अनेक बाजूंनी तो विषय हाताळावा लागतो. असे किती तरी इतर विषय आहेत. अनेक ठिकाणी नियम किंवा कायदे वेगळ्या स्वरूपात कामकाजात समोर येतात. मात्र काहीही झाले तरी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यातून मार्ग काढण्याची भूमिका आपली राहील, असेही आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितले.  आयुक्त म्हणाले... 

  • दरदिवसाला पिकाच्या अवस्थेनुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नाही 
  • शेतकरी मोठ्या प्रमाणात खासगी ‘क्रॉप डॉक्टर’वर अवलंबून 
  • कर्मचाऱ्यांनी ‘निडबेस्ड एजन्सी’ बनावे 
  • कर्मचाऱ्यांनी स्वतःहून बांधावर पोहोचावे 
  • फलोत्पादन, निर्यातीत कृषी विभागाकडून चांगले काम 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com