नगर ः ‘रोहयो’च्या कामांवर निम्मे मजूर पारनेरचे !

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर   ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मागील आठवड्यात जिल्ह्यात ग्रामपंचायती व यंत्रणेमार्फत एकूण एक हजार १४२ कामे सुरू होती. या कामांवर सुमारे १५ हजार मजूर उपस्थित होते. दुष्काळाची तीव्रता वाढल्याने व लोकसभेची निवडणूक झाल्यामुळे आता या कामांवर मजुरांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. ग्रामपंचायत स्तरावर सुरू असणाऱ्या जिल्हातील कामांवरील एकूण मजुरांपैकी निम्मी मजूर संख्या ही पारनेर तालुक्‍यातील आहे. यावरून पारनेर तालुक्‍यातील दुष्काळाची तीव्रता स्पष्ट होते.

रोजगार हमी योजनेत नोंदणी केलेल्या कुटुंबांना आर्थिक वर्षात किमान १०० दिवस रोजगार दिला जातो. केंद्र सरकारकडून यासाठी निधीही मंजूर केला जातो. मजुरीचा भार राज्य सरकार उचलते. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या नावनोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांत सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या कामांवर मागील आठवड्यात १४ हजार ५९८ मजूर उपस्थित होते. त्यापैकी ग्रामपंचायत स्तरावरील ७५० कामांवर नऊ हजार ४७३ तसेच यंत्रणेमार्फत सुरू असणाऱ्या ३९२ कामांवर पाच हजार १२५ मजूर उपस्थित होते.

पारनेर तालुक्‍यात ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणाऱ्या कामांवर सर्वात जास्त मजूर आहेत. तेथे ४६ कामे सुरू असून गेल्या आठवड्यात उपस्थित मजुरांची संख्या तब्बल चार हजार ३३५ होती. जिल्ह्यात ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या एकूण ७५० कामांवर नऊ हजार ४७३ मजूर आहेत. म्हणजेच एकट्या पारनेर तालुक्‍यात जिल्ह्याभरातील एकूण मजुरांपैकी निम्मे मजूर कामावर आहेत.

रस्त्यांची कामे जोरात जिल्ह्यातील ३८७ ग्रामपंचायतींकडून रोहयोची कामे सुरू आहेत. ग्रामपंचायतीमार्फत घरकुल, वैयक्तिक विहीर, शौचालय, गाळ काढणे, कंपार्टमेंट बंडिंग, फळबाग लागवड, रस्ता दुरुस्ती, जनावरांचा गोठा आदींची कामे होत आहेत. त्यापैकी रस्ता दुरुस्तीच्या ५० कामांवर गेल्या आठवड्यात पाच हजार ५२२ मजूर कार्यरत होते. त्याखालोखाल घरकुलांच्या ५२४ कामांवर एक हजार ६७७ मजूर कामाला आहेत. गाळ काढण्याच्या सात कामांवरही तब्बल बाराशे मजूर गेल्या आठवड्यात कामावर होते.  

अशी आहे कामांची स्थिती
तालुका  एकूण कामे मजूर
अकोले  १७३ ६२९
जामखेड  ७७ ९७३
कर्जत  ६९ १,२७३
कोपरगाव ८२ २८२
नगर ७८ १,११८
नेवासे ४८ ३५४
पारनेर ९२  ६,०४५
पाथर्डी  ७६ ५०१
राहाता ९६  ३१६
राहुरी  ८५ ३१६
संगमनेर  ६१  ८१०
शेवगाव ८० ७८१
श्रीगोंदे    ८२ १,०३१
श्रीरामपूर   ४३ १७९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com