नगदी पिकांना खरिपात प्रोत्साहन द्या 

विकेल ते पिकेल धोरणांतर्गत पारंपरिक पिकांसोबतच शेतकऱ्यांना नगदी पिके घेण्यासाठी प्रोत्साहित केल्यास गावात समृद्धी नांदेल. खरिपात याकरिता कृषी विभागाने विशेष प्रयत्न करावेत, अशी सूचना पालकमंत्री नवाब मलिक यांनी केली.
नगदी पिकांना खरिपात प्रोत्साहन द्या  Encourage cash crops in kharif
नगदी पिकांना खरिपात प्रोत्साहन द्या  Encourage cash crops in kharif

गोंदिया : विकेल ते पिकेल धोरणांतर्गत पारंपरिक पिकांसोबतच शेतकऱ्यांना नगदी पिके घेण्यासाठी प्रोत्साहित केल्यास गावात समृद्धी नांदेल. खरिपात याकरिता कृषी विभागाने विशेष प्रयत्न करावेत, अशी सूचना पालकमंत्री नवाब मलिक यांनी केली. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित खरीप आढावा बैठकीत ते बोलत होते. खासदार सुनील मेंढे, आमदार अभिजित वंजारी, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, सहसराम कोरोटे, माजी आमदार राजेंद्र जैन, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुमार डांगे, पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे या वेळी उपस्थित होते. 

नवाब मलिक म्हणाले, ‘‘निविष्ठांचा दर्जा नसल्यास शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम वाया जातो. गेल्या हंगामात निकृष्ट सोयाबीन बियाण्याच्या माध्यमातून हा अनुभव अनेकांनी घेतला.

बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई द्यावी लागली. त्यामुळे येत्या खरिपाची तयारी करताना निविष्ठांचा दर्जा तपासावा. त्या करिता नियमानुसार नमुने घेण्यात यावे. पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जास्त शेतकऱ्यांना पीक विमा सहज आणि सुलभ पद्धतीने काढता येईल, या दृष्टीने नियोजन करावे. गेल्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी अनेक शेतकरी विमा कंपनीच्या धोरणापायी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत.

जिल्ह्यातील चार महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने चुकीची आकडेवारी वापरून भरपाईपासून वंचित ठेवल्याचा आरोप आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यात २ लाख २० हजार २४० हेक्टर क्षेत्रावर यंदाच्या खरिपात पीक लागवड होणार असल्याची माहिती दिली. त्यामध्ये १ लाख ९० हजार हेक्‍टर क्षेत्रावर धान घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.’’ 

निधी नसल्याचे कारण देत जिल्ह्यात महावितरणकडून वीज जोडणी देण्यास नकार दिला जात आहे. संरक्षित सिंचन स्त्रोतांमधील पाण्याचा वापर करून उत्पादकता वाढीचे प्रयत्न शेतकरी करीत आहेत. त्या प्रयत्नांना वीज वितरण कंपनीकडून वीज जोडणी न देण्याच्या माध्यमातून खीळ घातली जात असल्याचा आरोप खासदार सुनील मुंडे यांनी या वेळी केला.

जिल्ह्यातील ५ हजार २८१ शेतकऱ्यांचे कृषी पंप जोडणीचे अर्ज प्रलंबित आहेत. हा अनुशेष लवकरात लवकर भरून काढत शेतकऱ्यांना कृषिपंप वीज जोडणी मिळावी, अशी आग्रही मागणी खासदार मेंढे यांनी या वेळी केली. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नावीन्यपूर्ण योजना राबवाव्यात, अशी सूचना देखील त्यांनी केली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com