'तुफानास आता मी पुरून उरेन म्हणते' 

मनात इच्छाशक्ती अन् आवड असेल, काम करण्याची लाज नसेल तर कुठलाही व्यवसाय वाढू शकतो. फक्त आपली स्वप्न छोटी न ठेवता सतत काम करत राहावे मान, अपमान व प्रतिष्ठा बाजूला केल्यास आपल्या जिद्दीतून तरुण व्यावसायिक घडू शकतो. हे नक्की आहे. - रूपाली शिंदे, संचालक, माऊली चहा कट्टा , सायखेडा, ता. निफाड
'तुफानास आता मी पुरून उरेन म्हणते' 
'तुफानास आता मी पुरून उरेन म्हणते' 

बीजामधले हिरवे पण मी जपेन म्हणते,  आज उद्या या खडकावरती रुजेन म्हणते,  लाख दिवे माझ्या ज्योतीने पेटून उठले,  तुफानास मी पुरून आता उरेन म्हणते'...  या कवितेच्या ओळी शिंगवे (ता. निफाड) जि. नाशिक येथील कृषी कन्या रूपाली शिंदे हिच्या कर्तृत्वाला तंतोतंत लागू पडतात. आज (ता.३) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. यानिमित्ताने सावित्रीच्या या लेकीने स्वतंत्र वाट चोखाळीत उद्यमशीलतेचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. 

आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीने रूपाली शिंदे या तरुणीने चहाविक्रीच्या छोट्याशा व्यवसायातून ओळख निर्माण केली आहे. शिंगवे येथील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब शिंदे यांची ती कन्या. २०१५ साली तिने केमिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळविली. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे खासगी कंपनीत नोकरीही केली. मात्र समाधानकारक पगार मिळत नसल्याने ती अस्वस्थ होती. अखेर नोकरी सोडून ती एक वर्ष घरीच राहिली. 

मात्र तिच्यातील उद्योजक तिला खुणावत होता. स्वस्थ बसून काहीच होणार नाही, आता नोकरी मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करावा असे तिच्या मनात आले. त्याच प्रेरणेतून समाजाची बंधने, वरवरची प्रतिष्ठा झुगारून तिने सायखेडा येथे १ नोव्हेंबर २०१८ रोजी 'माऊली चहा कट्टा' नावाने चहाविक्रीचा व्यवसाय सुरू केला. तंदूर व बासुंदी या चहा विक्रीतून तिने अनेक ग्राहक मिळवले आहेत. दररोज ती ५०० कपापर्यंत विक्री करते. या व्यवसायातून ती लाखांची उलाढाल करत असून दर महिन्याला साठ हजार इतका नफा मिळवीत असल्याचे रूपाली अभिमानाने सांगते. 

सुरुवातीला व्यवसाय चालू करण्यासाठी भांडवलाची अडचण, प्रतिकूल परिस्थिती व नातेवाइकांचा विरोध पत्करून या व्यवसायाचे धाडस केले. एका इंजिनिअर मुलीने चहा विक्री सुरू केल्याने अनेकांनी कडाडून विरोध केला तर अनेकांनी नावे ठेवली. मात्र खचून न जाता वा टिकांना न जुमानता खंबीर होऊन स्वतःला व्यवसायात सिद्ध केले आहे. तिच्या कुटुंबाने तिला दिलेली साथ लाखमोलाची ठरली. तिचा भाऊ, आईवडील यांचीही मदत तिला होत असते. कामाने मला ओळख मिळवून दिली असे ती अभिमानाने सांगते.  व्यवसायाचा केला विस्तार  अवघ्या एकच वर्षाच्या व्यवसायाच्या वाटचालीत दोन लाखांपर्यंत ती उलाढाल करत आहे. मात्र आता या व्यवसायाचा तिने विस्तार केला आहे. नाशिक शहरातील म्हसरुळ परिसरात अजून एक शाखा चालू केली आहे. या माध्यमातून दोन तरुणांना तिने रोजगार उपलब्ध करून दिला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com