अमरावती जिल्ह्यातील नदीनाल्यांमध्ये खोदणार चर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती : पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजलपातळीत वाढ व्हावी म्हणून गावच्या परिसरातून वाहणाऱ्या प्रत्येक नदी, नाल्यात आडवे चर खोदण्याचे निर्देश उद्योग राज्यमंत्री व पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले.

जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या वेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, महापालिका आयुक्‍त संजय निपाणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता एस. एस. चारथळ, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश ढवळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे उपस्थित होते. 

नदी, नाल्यांमध्ये आडवे बांध टाकण्याची ही संकल्पना जोरकसपणे राबविण्यात येईल, असा निर्धार या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला. चंद्रभागा, पूर्णा या मोठ्या नद्यांसह जिल्ह्यातील विविध नदी व नाल्यांत अडीच फूट चर ठिकठिकाणी खणल्यामुळे पाणी मुरायला मदत होईल व पाऊस येताच भूजलपातळीत सुधारणा होईल. ही मोहीम जिल्हाभर राबविण्याचे आवाहन पालकमंत्री पोटे यांनी केले.

पाणीटंचाई निवारणार्थ यंत्रणेकडून थेट गावात पोचून तेथील गरज लक्षात घेऊन कामे झाली पाहिजेत. जिथे विहिरी अधिग्रहित करणे, टॅंकर सुरू करणे आदी उपाययोजनांची आवश्‍यकता असेल, तिथे ती तत्काळ व्हावी, त्यासाठी सर्वांनी परस्परांशी समन्वय ठेवावा. केवळ कागदोपत्री कार्यवाहीत खोळंबून राहू नये. विनाविलंब कृती होणे आवश्‍यक आहे. नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घ्या व तत्काळ तोडगा काढा. प्रत्येक गावच्या सरपंच, ग्रामसेवकांशी रोज संपर्क ठेवा. केवळ तात्कालिक उपययोजना नकोत. पावसाळ्यात पाणी साठून राहण्यासाठी नदीत आडवे चर घ्यावे. रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये जलसंधारणाची कामे जोरदारपणे करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या वेळी जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यांतील पाणीटंचाईचा आढावा त्यांनी घेतला. 

अशी आहे स्थिती मोर्शी तालुक्‍यात ४४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. वरुडमध्ये अधिग्रहित विहिरींची संख्या २८ आहे. चिखलदरा तालुक्‍यात २० गावांत टँकर सुरू आहेत. अमरावती तालुक्‍यात ४४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, ३ गावांमध्ये टॅंकर सुरू आहेत. तिवसा तालुक्‍यात २१ विहिरी अधिग्रहित केल्या असून, २ टॅंकर सुरू आहेत. धामणगावमध्ये ११ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, एका टॅंकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. नांदगाव खंडेश्‍वरमध्ये ३३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. चांदूरबाजार तालुक्‍यातील घाटलाडकीत २ टॅंकर सुुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com