'जैतापूर प्रकल्पाच्या जागेत हापूस प्रक्रिया केंद्र उभारावे'

'जैतापूर प्रकल्पाच्या जागेत हापूस प्रक्रिया केंद्र उभारावे'
'जैतापूर प्रकल्पाच्या जागेत हापूस प्रक्रिया केंद्र उभारावे'

रत्नागिरी : संवेदनशील हापूस वातावरणातील बदलांच्या तडाख्यात सापडतो. हापूसला परदेशांत मोठी मागणी असून, अमेरिकेतील निर्यातीचा टक्‍का दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर प्रारण प्रक्रिया (irradiation) करून निर्यात होते. कोकणातून थेट निर्यातीसाठी प्रारण केंद्र जैतापूर येथे झाले, तर निश्‍चितच त्याचा फायदा होऊ शकतो, असे मत ॲड. विलास पाटणे यांनी व्यक्त केले. बंदरांमुळे समुद्रमार्गे हापूसची ही वाहतूक करणे शक्‍य आहे. त्यातून लाखो रुपयांचे परदेश चलन थेट येथील बागायतदारांच्या खिशात खेळू शकते, असेही ते म्हणाले.  श्री. पाटणे म्हणाले, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हजारो हेक्‍टर जमीन आंबा लागवडीखाली असून २,३२,०१४ मेट्रिक टन उत्पादन होऊन ३८,३२४ मेट्रिक टन आंबा निर्यात होतो. जीआय मानांकन मिळालेला हापूस जगाच्या बाजारात ‘राजा’ म्हणून स्थिरावेल. फळे, भाजीपाला जास्त काळ टिकत नसल्याने त्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते. आंब्यासारखी फळे ग्राहकापर्यंत पोचण्याच्या आधी पिकून खराब होतात. श्री. पाटणे म्हणाले, फळामधील कमी, कीटक यांना रोखायचे असेल, तर प्रारण प्रक्रियेचा वापर करणे श्रेयस्कर आहे. पारंपरिक प्रकारापेक्षा प्रारणांचा वापर करणे सुरक्षित, निर्जंतुक व उत्तम आहे. व्यावसायिक तत्त्वावर, प्रारण प्रक्रिया केंद्र २००३ मध्ये लासलगावला, त्यानंतर २००० मध्ये वाशी, नवी मुंबई येथे उपलब्ध झाले आहे. अलीकडे भाभा अणू संशोधन केद्रात यावर्षी १२८ मे. टन आंबा निर्यात करण्यापूर्वी प्रारण प्रक्रियेने निर्जंतुकीकरण केले गेले. प्रारणांच्या साहाय्याने फळ निर्जंतूक होऊन त्याचा ताजेपणा व दर्जा सुरक्षित राहतो. फळामधील आतील व बाहेरील कृमी, अळी मरून जाते. त्यामुळे फळ खराब होत नाहीत. प्रारणांमुळे फळामधील जीवनसत्त्वावर काही परिणाम होत नाही.  श्री. पाटणे म्हणाले, विक्री संबंधाने सुरक्षा कायद्यामध्ये सुधारणा केली आहे. देशभरात विक्रीकरणाची १५ केंद्रे कार्यान्वित आहेत. साधारणतः ५ ते १० टक्‍के खर्च वाढू शकतो; परंतु साठवणूक करण्याच्या खर्चात बचत होऊ शकते. भाभा ऍटोमिक एनर्जीच्या साहाय्याने १५ ते २० कोटी गुंतवणुकीत शासनाला हे केंद्र सुरू करता येते. सध्या जैतापूर येथे न्यूक्‍लिअर पॉवर कॉर्पोरेशनने टाऊनशिपकरिता घेतलेली जमीन वापरता येईल. तसेच जैतापूर केंद्र रत्नागिरी व देवगड येथील बागायतदारांना सोईचे होईल. भाभा अणू संशोधन केंद्र तसेच बोर्ड ऑफ रेडिएशन अँड इस्टोप टेक्‍ना (बीट) यांच्याकडून तांत्रिक सल्ला उपलब्ध होऊ शकतो.  भाभा अणू संशोधन केंद्राच्या मदतीने हापूस आंबा सुरक्षित, निर्जंतुके आणि उत्तम राहण्यासाठी जैतापूरमध्ये प्रारण प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केल्यास आंबा व्यवसायात ‘ग्रीन’ क्रांती होऊ शकते. येथे टाऊनशिपपैकी काही जमीन उपलब्ध करून प्रारण केंद्र सुरू करण्यासाठी सर्व आंबा उत्पादक व लोकप्रतिनिधी यांनी आग्रह धरला पाहिजे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com