dheeraj kumar
dheeraj kumar

ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा : कृषी आयुक्त

कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप हंगामाचे नियोजन विस्कळीत होऊ नये यासाठी सर्व कृषी सहायकांसोबत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी पत्राद्वारे संवाद साधला आहे.

पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप हंगामाचे नियोजन विस्कळीत होऊ नये यासाठी सर्व कृषी सहायकांसोबत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी पत्राद्वारे संवाद साधला आहे. राज्यभरात यंदा तयार होणारे ग्राम कृषी विस्तार आराखडे शेतकरीभिमुख होण्यासाठी तातडीने ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. 

कृषी सहायकांसाठी या पत्रात ‘प्रिय मित्रांनो’ असे शब्द पहिल्याच ओळीत आयुक्तांनी लिहिले आहेत. ‘‘आपण अतिशय निष्ठा व तळमळीने काम करीत आहात. तुम्ही शेतकरी व खात्यांमधील खरा दुवा आणि कणा आहात. राज्यात आतापर्यंत राबविलेल्या सर्व कीड-रोग मोहिमा यशस्वी होण्यास कृषी सहायकांची भूमिका मोलाची होती. तसेच विक्रमी अन्नधान्य ही सहायकांच्या परिश्रमाची फलनिष्पत्ती आहे,’’ असे कौतुकही आयुक्तांनी केले आहे.  ‘‘गेल्या वर्षीपासून सुरू असलेली कोरोनाची साथ आणि निर्बंध या समस्यांमधून वाट काढत कृषी विभाग शेतकऱ्यांना सेवा देतो आहे. त्यात ग्रामस्तरावर कार्यरत असलेल्या कृषी सहायकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. शेती हा अविरत चालणारा व्यवसाय आहे. त्यामुळे निविष्ठा व योजनांचा लाभ योग्य वेळेत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी जबाबदारीने आपला विभाग कार्यरत असतो. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनपासून आपण शेतीमाल व निविष्ठांची विक्री व वाहतूक,त्या अनुषंगाने परिवहन व गृह विभागाचे परवाने उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना वेळेत खते देण्याचे काम केले आहे,’’ असेही आयुक्तांनी म्हटले आहे.  ‘‘शेतकऱ्यांसाठी घरच्या बियाण्यांचा वापर, उगवणक्षमता तपासणी मोहीम, बांधावर खत व बियाणेवाटप यासाठी आपण निविष्ठा विक्रेते व शेतकऱ्यांशी समन्वय साधला. याशिवाय टोळधाड नियंत्रण, फरदड निर्मूलन, बोंड अळी निर्मूलन, लष्करी अळी नियंत्रण या मोहिमा देखील यशस्वी केल्या. कृषी सहायकांच्या परिश्रमामुळेच २०२०-२१ च्या हंगामात कडधान्यात ८९९१० टन हरभरा आणि तेलबिया पिकांमध्ये ६२०११०० टन असे उच्चांकी उत्पादन आपल्या राज्याने घेतले. ही कृषी विभागासाठी सन्मानाची बाब आहे,” असे आयुक्तांनी नमुद केले आहे.  आयुक्तांनी केल्या अशा सूचना 

  • ग्राम कृषी विस्तार आराखडा लोकाभिमुख करा 
  • गावातील पीक उत्पादन, उत्पादकतेचे नियोजन करा 
  • गावात जमीन सुपीकता निर्देशांक फलक लावा 
  • शेतकऱ्यांमध्ये खताचा संतुलित वापराबाबत जागृती 
  • पाण्याच्या ताळेबंदानुसार पीक पद्धतीत बदल 
  • विकेल ते पिकेल या उद्देशानुसार लागवड करा 
  • गावांमध्ये सरळ वाण बीजोत्पादनाचे कार्यक्रम राबवा 
  • फळबाग लागवड व शेततळ्यांसाठी शेतकरी निवड करा 
  • खते, बियाणे, कीडनाशके वेळेत पुरवठ्यासाठी नियोजन करा 
  • पीकविमा, फळपीक विम्यासाठी कृती आराखडा तयार करा 
  • कृषी योजनांच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचा प्रसार प्रचार करा 
  • शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी समूह माध्यमांचा वापर करा 
  • प्रतिक्रिया  सोयाबीन पेऱ्यासाठी घरच्या बियाण्यांचा वापर, बियाण्यांची उगवणक्षमता तपासणी, रुंद सरी-वरंबा पद्धतीचा वापर, कपाशीत बोंड अळी नियंत्रण आणि रासायनिक खत वापर दहा टक्क्यांनी कमी करणे ही यंदाच्या खरीप मोहिमेतील प्रथम प्राधान्याची कामे असतील.  - धीरज कुमार, कृषी आयुक्त 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com