काजू बीच्या दर निश्‍चितीसाठी समितीची स्थापना

जिल्ह्यातील दर्जेदार काजू बीला चांगला भाव मिळावा, या हेतूने काजू बी दरनिश्‍चितीसाठी १८ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली. या सभेत कमीत कमी १४० रूपये दर मिळावा, अशी मागणी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी केली.
Establishment of committee for fixing of cashew bee rates
Establishment of committee for fixing of cashew bee rates

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील दर्जेदार काजू बीला चांगला भाव मिळावा, या हेतूने काजू बी दरनिश्‍चितीसाठी १८ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली. या सभेत कमीत कमी १४० रूपये दर मिळावा, अशी मागणी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी केली. 

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात काजू उत्पादक, प्रकिया व्यावसायिक यांची संयुक्त बैठक जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला आमदार वैभव नाईक, बँकेचे संचालक प्रकाश मोर्ये, व्हिक्टर डान्टस, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे, सावंतवाडी-दोडामार्ग बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, डॉ. प्रसाद देवधर, संदीप राणे आदी उपस्थित होते. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजूला विशिष्ट चव आणि दर्जा आहे. तरीदेखील गेली दोन वर्षे काजूचे दर घसरले. काजूचा उत्पादन खर्च आणि काजू बीला मिळणार दर याचे गणित जमत नाही. त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहे. या संदर्भात अनेक उत्पादक शेतकऱ्यांनी आपली मते व्यक्त केल्यानंतर काजू बीचे दर नेमके ठरवितो कोण असा प्रश्‍न काही उत्पादकांनी उपस्थित केला. त्यावर चर्चा करताना काजू बीचे दर वरकरणी जरी व्यापारी ठरवीत असला असे दिसत असले, तरी प्रत्यक्षात कारखानदारच काजू बीचे दर ठरवितो हे स्पष्ट झाले. 

त्यामुळे उपस्थित काजू उत्पादक शेतकऱ्यांनी काजू बीचे दर ठरविण्याचा अधिकार हा शेतकऱ्याला असायला पाहिजे. सद्यःस्थितीला कमीत कमी १४० रुपये तरी दर मिळायला पाहिजे असे बहुतांशी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी मत व्यक्त केले. त्यानंतर जिल्ह्यातील जीआय मानांकन काजूचा दर निश्‍चित करण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

या समितीचे समन्यवक म्हणून संदीप राणे यांची निवड करण्यात आली. या १८ सदस्यीय समितीत विलास सावंत, दिवाकर म्हावळणकर, विजय सावंत, बाळकृष्ण गाडगीळ, अभिजित पवार, प्रदीप तळेकर, चंद्रशेखर सावंत, लक्ष्मण नाईक, डॉ. प्रसाद देवधर, सुधीर झाट्ये, बाबल नाईक, विलास देसाई, सखाराम ठाकुर, विलास बटाने, सतीश पालव, दीपक चव्हाण आदी सदस्यांचा समावेश आहे. या समितीची पहिली बैठक ९ एप्रिलला होणार आहे. 

जिल्हा बॅंक देणार सोसायट्यांना कॅश क्रेडिट  या बैठकीत जिलह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी कजूचे दर निश्तिच होईपर्यंत काजू विक्री करू नये, असे आवाहन करण्यात आले. या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी यावर्षी काजू खरेदी करणाऱ्या सोसायट्यांना बँक ९ टक्के व्याजाने कॅश क्रेडिट देणार आहे. गेल्या वर्षी साडेनऊ टक्क्यांनी देण्यात आले होते. गेल्या वर्षी ज्या सोसायट्याने काजू खरेदी केली त्यापैकी एकही सोसायटीचा तोटा झाला नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com